
समृद्धी महामार्ग ते पुण्यापर्यंत ६ तास पाठलाग करून १.१३ कोटींचा गुटखा एफडीएकडून जप्त…
मुंबई: समृद्धी महामार्गापासून पुण्यापर्यंत चाललेल्या सहा तासांच्या थरारक पाठलागानंतर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) शुक्रवारी चाकण-तळेगाव चौकात एका ट्रक अडवून १.१३ कोटी रुपयांचा प्रतिबंधित गुटखा आणि पानमसाला जप्त केला.
१८ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे, एफडीएच्या पथकांनी मध्य प्रदेशातून अवैध गुटख्याची वाहतूक करणाऱ्या एका टाटा ट्रकचा पाठलाग सुरू केला. हा ट्रक समृद्धी महामार्गावरून भिवंडी कडे जात होता, मात्र अचानक मार्ग बदलून तो संगमनेरमार्गे पुण्याच्या दिशेने रवाना झाला. मार्ग बदलल्याचे समजताच एफडीएच्या पथकांना संभाव्य मार्गावर तैनात करण्यात आले. ठाणे विभागाचे पथक मुरबाडच्या दिशेने रवाना झाले, तर पुणे विभागाचे पथक राजगुरुनगर येथे तैनात करण्यात आले. राजगुरुनगर टोल प्लाझावर अन्न सुरक्षा अधिकारी लक्ष्मीकांत सावळे यांनी आपली गाडी ट्रकच्या आडवी लावून तो थांबवण्याचा प्रयत्न केला. परंतु, चालकाने गाडी न थांबवता पुढे पळवली.
स्थानिक पोलिसांच्या मदतीने रात्री ८ वाजण्याच्या सुमारास चाकण-तळेगाव चौकात ट्रकला अखेर गाठण्यात आले. हा पाठलाग तब्बल सहा तास चालला. तपासणीदरम्यान अधिकाऱ्यांना विविध ब्रँडचा बंदी घातलेला पानमसाला आणि सुगंधी तंबाखूसह वाहतुकीसाठी वापरलेले वाहन जप्त केले. जप्त केलेल्या मालात २९.९५ लाख रुपयांचा ‘रजनीगंधा’ फ्लेवर्ड पानमसाला, २४.९४ लाख रुपयांचा ‘तानसेन’ फ्लेवर्ड पानमसाला, २६.४० लाख रुपयांचा ‘आर. एम. डी.’ पानमसाला, ९.६० लाख रुपयांचा ‘तुलसी रॉयल जाफरानी’ जर्दा आणि २.६४ लाख रुपयांचा ‘टी. ओ.’ प्रीमियम जर्दा समाविष्ट आहे. वाहनासह एकूण जप्त केलेल्या मालाची किंमत १,१३,५४,६०० रुपये आहे.
१९ सप्टेंबरला सकाळी १० वाजता पुणे अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी चाकण पोलीस ठाण्यात ‘भारतीय न्याय संहिता’ आणि ‘अन्न सुरक्षा आणि मानके कायदाच्या तरतुदींनुसार पाच जणांविरुद्ध तक्रार दाखल केली. आरोपींमध्ये चालक नफीस खान मालक आणि पुरवठादार नीलेश राठी व अरुण पाटील, वाहन मालक जे. एम. डी. एंटरप्रायझेस आणि ट्रान्सपोर्टर संजय माता यांचा समावेश आहे.

