
ठाण्यात पुन्हा गोळीबार; प्रसिद्ध युट्यूबरची गोळ्या घालून हत्या…
ठाणे: ठाण्याच्या मनपाडा परिसरात काही दिवसांपूर्वीच शिवसेना ठाकरे गटाचे नेते प्रदीप पूर्णेकर यांची ऑफिसमध्ये घुसून त्यांच्यावर गोळीबार करत निर्घृण हत्या करण्यात आली होती. ही घटना ताजी असताना आता ठाण्यात पुन्हा एकदा गोळीबाराचा थरार घडला आहे. उल्हासनगर रेल्वे स्टेशनबाहेरील अत्यंत वर्दळीच्या रस्त्यावर बुधवारी रात्री सव्वा आठच्या सुमारास एका प्रसिद्ध युट्यूबरची हत्या करण्यात आली आहे. हल्लेखोरांनी स्थानिक युट्युबर हरीश गजवानी यांच्यावर पाठीमागून येऊन बेछूट गोळीबार केला. या घटनेत गजवानी यांचा जागीच मृत्यू झाला असून, या हत्याकांडाने परिसरात खळबळ उडाली आहे.
प्रसिद्ध युट्युबर हरीश गजवानी हे उल्हासनगर रेल्वे स्टेशन परिसरातील रस्त्यावरून जात असताना अज्ञात हल्लेखोरांनी अगदी जवळून डोक्यात २ गोळ्या झाडल्या, ज्यामुळे ते जागीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. अत्यंत गर्दीच्या आणि वर्दळीच्या ठिकाणी अचानक झालेल्या या गोळीबारामुळे परिसरात पळापळ झाली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
View this post on Instagram
दरम्यान, हरीश गजवानी यांच्या या निर्घृण हत्येमागचे नेमके कारण काय आहे, हे अद्याप अस्पष्ट आहे. हत्येमागे वैयक्तिक वाद, जुने वैमनस्य, आर्थिक व्यवहार की अन्य कोणते कारण आहे, याबाबत पोलिसांकडून सर्व शक्यतांची पडताळणी केली जात आहे. पोलिसांच्या सखोल तपासानंतरच या हत्येमागील खरे कारण समजू शकेल. शिवाय, या हत्येला चार वर्षांपूर्वीच्या एका हल्ल्याची पार्श्वभूमी असल्याचं सांगण्यात आहे. चार वर्षांपूर्वी संशयित आरोपी अविनाश नायडू याच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता आणि त्या प्रकरणात हरिश गजवानी हा आरोपी होता. त्यामुळे हा प्रकार जुन्या वैमनस्यातून घडला आहे का, याचा पोलीस शोध घेत आहेत.
ठाणे शहरात दारुड्या गावगुंडाने गस्तीदरम्यान केली पोलिस अधिकाऱ्याची हत्या…
प्रदीप पूर्णेकर हत्याकांडप्रकरणी सुभाष शिंदेच्या कोठडीत वाढ; शस्त्रे पुरवल्याचा पोलिसांना संशय…

