रांजणगाव देवस्थानमध्ये विश्वस्तांच्या अनुपस्थितीत गुंड गजानन मारणेचा सत्कार…

शिरुर (तेजस फडके) : अष्टविनायकापैकी एक असलेल्या श्री क्षेत्र रांजणगाव गणपती येथील महागणपती मंदिरात 16 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणे याचा रांजणगाव गणपती येथील महागणपती मंदिरात देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्तांच्या अनुपस्थितीत गजानन मारणे याचा दर्शन घेतल्यानंतर सत्कार करण्यात आला. मात्र गुंड मारणेचा हा सत्कार गावातील काही नेत्यांना ऐन ग्रामपंचायत निवडणुकीच्या तोंडावर चांगलाच महागात पडला असुन रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनला हेलपाटे मारण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.

सध्या शिरुर तालुक्यामध्ये काही गावातील ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरु असुन उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया चालु आहे. त्याचबरोबर साम, दाम, दंड, भेदाने मतदारांना आजमावन्याचा प्रयत्न चालु आहे. त्यातच सध्या रांजणगाव ग्रामपंचायतचीही निवडणुक प्रक्रिया सुरु असुन कुख्यात गुंड गजा मारणेचा रांजणगाव गणपती येथील महागणपती मंदिरात पाचही विश्वस्तांच्या अनुपस्थितीत सत्कार करणे, त्याचे फोटो काढणे, तसेच त्याच्याबरोबर चालण्याचे व्हिडिओ काढणे आणि जाणीवपूर्वक सोशल मीडियावर व्हायरल करणे यापाठीमागे मतदारांमध्ये दहशत पसरविण्याचा तर हेतू नाही ना अशी दबक्या आवाजात रांजणगाव मध्ये चर्चा सुरु आहे.

त्यातच हि खबर पोलिसांना कळताच रांजणगाव MIDC पोलिसांनी या सर्व राजकीय नेत्यांना पोलिस ठाण्यात चौकशीला बोलावून खरडपट्टी काढली आहे. पोलिसांनी या राजकीय नेत्यांना चांगलेच फैलावर घेतल्याने “नको तो गजा आणि नको तो बेंडबाजा” अशी या नेत्यांची परिस्थिती झाली आहे. याबाबत पोलिस निरीक्षक महेश ढवाण यांच्याशी संपर्क साधला असता. ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने गुंड प्रवृत्तीच्या लोकांना गावात आणुन दहशत निर्माण करण्याचा जर कोणी प्रयत्न केला. तर त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई प्रस्तावित करण्यात येईल असे ढवाण यांनी सांगितले.

मंदिरातील दानपेटी मोजण्याचे काम चालु असल्यामुळे मी सत्काराच्या ठिकाणी उपस्थित नव्हतो.
ओंकार देव
मुख्य विश्वस्त, रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्ट

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!