
पुणे! मैत्रिणीशी बोलल्याच्या रागातून युवकाचं अपहरण; पोलिस अधिकाऱ्याचे 21 कॉल अन् थरारक पाठलाग…
पुणे : पुणे शहरातील मध्यवर्ती भागातील नारायण पेठ परिसरातून एका युवकाचे अपहरण करण्यात आले होते. पोलिसांनी पाठलाग करून युवकाची सुखरूप सुटका केली आहे. पोलिसांनी दोघांना अटक केली असून, पुढील तपास करत आहेत.
View this post on Instagram
एका स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या २८ वर्षीय तरुणाचे एका हॉटेल व्यावसायिकाने आपल्या साथीदारांच्या मदतीने गुरुवारी मध्यरात्री गाडीत कोंबून अपहरण केले होते. तपासादरम्यान अपहरणामागचं कारण समोर आलं आणि पोलीसही चक्रावले. अभ्यासिकेत एकत्र शिकणाऱ्या मैत्रिणीशी बोलल्याच्या रागातून हे अपहरण झाले होते. या प्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी धडक कारवाई करत सागर रमेश बोराडे (वय ३१) आणि किशोर सावंत (वय ३२) या दोघांना अटक केली आहे. शक्ती हिच्यासह अन्य दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. पीडित तरुण प्रसाद सूर्यवंशी (वय २८, रा. बारामती) आणि शक्ती हे दोघेही पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करतात. दोघेही नारायण पेठ पोलीस चौकीजवळील एकाच इमारतीत राहून एकाच अभ्यासिकेत जात होते. मात्र, शक्तीचा मित्र असलेला हॉटेल व्यावसायिक सागर बोराडे याला प्रसादने तिच्याशी बोललेले अजिबात आवडत नव्हते. “शक्तीसोबत बोलायचे नाही,” अशी धमकी सागरने प्रसादला दिली होती.
प्रसाद दुचाकीवरून गुरुवारी मध्यरात्री १२:३० च्या सुमारास निघाला असताना सागरने साथीदारांसह त्याला रस्त्यात गाठले आणि बेदम मारहाण करत जबरदस्तीने कारमध्ये कोंबले. सुदैवाने, हा संपूर्ण थरार प्रसादच्या रूममेटने पाहिला आणि तात्काळ मोबाईलमध्ये चित्रीकरण करून पोलिसांना कळविले. घटनेची माहिती मिळताच विश्रामबाग पोलिसांची पथके तयार केली. एका पोलीस अधिकाऱ्याने अपहरणकर्त्या सागर बोराडेला समजावण्यासाठी तब्बल २१ वेळा फोन लावला. मात्र, सागरने एकही कॉल उचलला नाही. पोलीस तांत्रिक तपासाद्वारे मागावर असल्याचे समजताच आरोपींनी सिंहगड रस्त्यावर पहिली कार सोडून प्रसादला दुसऱ्या गाडीत कोंबले आणि कात्रजच्या दिशेने पळाले. अपहरण सुरू असतानाही सागर शक्तीच्या संपर्कात होता आणि “मी प्रसादला मारहाण करत आहे,” याचे थेट अपडेट्स तिला फोनवरून देत होता.
View this post on Instagram
पोलिसांचा चारही बाजूंनी घेराव कडक झाल्याचे आणि सुटका होणे अशक्य असल्याचे लक्षात आल्यानंतर घाबरलेल्या आरोपींनी शहराच्या दिशेने माघार घेतली. अखेर त्यांनी प्रसादला टिळक चौकात फेकून दिले आणि पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, आधीच सापळा रचून बसलेल्या विश्रामबाग पोलिसांनी थरारक पाठलाग करून मुख्य सूत्रधार सागर बोराडे आणि त्याच्या साथीदाराला बेड्या ठोकल्या.
दरम्यान, सागर बोराडे याचे टिळक चौकात हॉटेल आहे. तांत्रिक तपासात प्रसाद आणि शक्ती हे गेल्या ६ महिन्यांपासून संपर्कात असल्याचे स्पष्ट झाले आहे. या अपहरणामागील मूळ हेतू काय होता, याचा कॉल रेकॉर्ड्सद्वारे सखोल तपास सुरू असून मुलीलाही जबाबासाठी पाचारण करण्यात आले आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त (परिमंडळ-१) ऋषिकेश रावळे यांनी दिली.
Video! पुणे शहरात MPSCच्या विद्यार्थ्याचे मैत्रिणीच्या प्रियकरानं केले अपहरण अन्…
पुणे हादरलं! प्रेयसीनंच फिल्मी स्टाईलने केलं प्रियकराचं अपहरण; कारण…
पुणे! भिगवण अपहरण प्रकरणात ट्विस्ट; ‘सदैव एकनिष्ठ’ स्टेटस ठेवणारा गजाआड…
पुणे! इन्स्टाग्रामवरील मुलीच्या माध्यमातून मुलाचे अपहरण अन् निर्घृणपणे हत्या…
पुणे! युवकाचे अपहरण करून विवस्त्र करत बेदम मारहाण अन् काढला व्हिडिओ…
पुण्यात MPSC ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याने संपवलं जीवन; शेवटच्या नोटमध्ये लिहिलं…

