अब्जाधीश सासऱ्याला संपवण्यासाठी ५ महिन्यांपासून कट, प्लॅन ‘ए’ फसला, प्लॅन ‘बी’ अयशस्वी; अखेर प्लॅन ‘सी’ नुसार…

कानपूरः उत्तर प्रदेशच्या कानपूरमधील एका अब्जाधीश औषध व्यापाऱ्याच्या हत्येची सुपारी घेणाऱ्या आरोपींनी अखेर तोंड उघडले. त्यांनी या प्रकरणी अनेक थरारक खुलासे केले आहेत. व्यापाऱ्याच्या सुनेने आपल्याच सासऱ्यांना संपवण्यासाठी एक-दोन नव्हे तर तब्बल ३ प्लॅन आखले होते. प्लॅन ए हा घराबाहेरचा होता. त्यामुळे तो अमलात आणण्याचा सर्वात जास्त धोका सुपारी किलरला होता. त्यामुळे त्यांनी त्यास नकार दिला. प्लॅन बी आणि सी हे घरातच अंमलात आणण्याची योजना होता. मात्र व्यापारी मिनोचा घरी आले आणि त्यांनी सुनेच्या खोलीचा दिवा लावल्याने तो प्लॅनही फेल झाला. अखेर प्लॅन सी प्रमाणे आरोपींनी चाकूने त्यांची हत्या केली. या हत्याकांडासाठी तब्बल पाच महिन्यांपासून तयारी चालू होती, अशी माहिती समोर आली आहे.

कल्याणपूरच्या रतन ऑर्बिटमध्ये राहणारे औषधांचे व्यापारी विनीत मिनोचा यांची गेल्या शनिवारी रात्री चाकूने वार करून हत्या करण्यात आली होती. पहाटे चारच्या सुमारास त्यांचा मुलगा सुब्रत आणि सूनबाई शालू घरी पोचल्यानंतर, विनीत यांचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी वेगाने तपासाची तक्र फिरवित अवघ्या ८ तासांमध्ये हत्याकांडाचा तपास पूर्ण करून आरोपींना बेड्या ठोकल्या. त्यांच्या कबुलीजबाबातून धक्कादायक माहती समोर आली. विनीत यांच्या हत्येची सुपारी, त्यांचीच सून शालू हिने दिल्याचे उघड झाले. तिने फेथफुलगंजच्या नुनिया मोहालचे निवासी विशाल गौतम आणि राजकिशोर यांना ६ लाखांची सुपारी दिली होती. विशाल हा आधी याच घरात नोकर म्हणून काम करत होता. सासरे विनीत यांचे टोकणे आणि खर्चाचा प्रत्येक पैशांचा हिशोब मागणे, यामुळे शालू वैतागली होती. त्यामुळेच तिने त्यांच्या हत्येचा कट रचला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आधी विनीत मिनोचा यांना रस्त्यावर धडक देऊन ठार करण्याची योजना आखण्यात आली होती. मात्र आरोपी विशाल तयार झाला नाही. त्याने सांगितले, की धडक देताना त्याचेही प्राण जाऊ शकतात आणि घटनास्थळी पकडले गेले तर लोक त्याला मारू शकतात. दुसऱ्या योजनेनुसार घरात येऊन उशीचा वापर करून तोंड दाबून विनीत यांना ठार करायचं होते. ते मरण पावल्यावर हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाल्याचे कारण सांगण्यात येणार होते.

तथापि, दुसरी योजना पार पाडता आली नाही, तर प्लॅन सी वर काम करायचे होते. आरोपीच्या सांगण्यानुसार ९.३६ वाजता शालू आपल्या नवरा सुब्रत आणि मुलगा श्रीजय सोबत बाहेर निघाली होती. त्यानंतर आठ मिनिटांनी, ९.४४ वाजता दोन्ही आरोपी हे डुप्लिकेट चावीने दरवाजा उघडून फ्लॅटमध्ये आले. प्लॅननुसार ते थेट सून शालूच्या खोलीत गेले आणि व्यापारी विनीत यांच्या येण्याची वाट पाहू लागले. ते दरवाज्याचा हँडल धरून उभे राहिले होते कारण विनीत हे बाहेरून दरवाजा बंद करू शकतात आणि ते आतच अडकतील अशी त्यांना भीती होती.

सुमारे ७४ मिनिटांनंतर विनीत मिनोचा हे फ्लॅटचा दरवाजा उघडून आत गेले. त्यांनी कपडे बदलले आणि जेवण केले. त्यानंतर फ्रिजमधून मिठाई खाल्ली आणि पाणी प्यायले. सून शालूच्या खोलीचा दरवाजा किंचितसा उघडा असल्यामुळे त्यांना संशय आला. ते तिच्या खोलीत गेले आणि दिवा लावला. तिथे दोन्ही आरोपींना पाहून ते अवाक् झाले. तुम्ही इथे काय करत आहात, असे त्यांनी आरोपींना विचारले. मात्र त्याच वेळी विशालने विनीत यांच्यावर चाकूने एका मागोमाग अनेक वार केले. ते खाली पडल्यावर त्यांनी त्यांच्या हृदयाचे ठोके तपासले. त्यानंतर दोघे बाहेर पडले आणि विरुद्ध दिशेने वेगळे गेले आणि पार्कच्या रस्त्याने भिंत ओलांडून बाहेर निघाले.

फ्लॅटमध्ये प्रवेश करताच ते कॅमेर्‍यांच्या नजरेत आले, त्यामुळे हत्येसारखा गंभीर गुन्हा केल्यावरही वाचू शकतील असे का वाटले, असे पोलिसांनी दोघांनाही विचारले. त्यावर विशाल म्हणाला, जो प्लॅन त्यांनी आखला होता त्यात पकडले जाण्याची शक्यता नव्हती. आम्हाला विनीत झोपेपर्यंत वाट पाहावी लागणार होती. त्यानंतर उशीने तोंड दाबून त्यांची हत्या करायची होती. मात्र त्यांचा मृत्यू हार्ट अटॅकने झाला असे सून शालू भासवणार होती. त्यामुळे संशय येण्याचा आणि कॅमेरा तपासण्याचा प्रश्नच नव्हता. म्हणून पकडले जाण्याची भीती नव्हती. या घटनेत पोलिसांची एंट्री होईल, याचा आम्हाला अंदाजच नव्हता असं आरोपींनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!