शालेय विद्यार्थिनींशी शिक्षकाकडूनच अश्लील चाळे; खरपूस चोप देऊन गावकऱ्यांनी दिले पोलिसांच्या ताब्यात…

वाशिमः महाराष्ट्रात महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. महिलानंतर आता चिमुकल्या मुलींसोबत अत्याचाराच्या घटना घडू लागल्या आहेत. काही दिवसांपूर्वी नवी मुंबईत एका बस चालकाने चिमुकल्या विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याची घटना घडली होती. त्यानंतर आता वाशिममध्ये शिक्षकी पेशाला काळीमा फासणारा प्रकार उघडकीस आला आहे. एका ५६ वर्षीय शिक्षकानेच वर्गातील विद्यार्थिनींवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या घटनेने पालकांमध्ये खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वाशिम तालुक्यातील सरकारी शाळेत शिक्षकानेच चिमुकल्या मुलींचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. वाशिम पोलीस स्टेशन अंतर्गत नराधम शिक्षकावर रात्री उशिरा पॉक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करत शिक्षकाला अटक केली आहे. दिलीप नावाच्या नराधम शिक्षकाने तिसरी आणि चौथीतील अनेक विद्यार्थिनींना मांडीवर बसवून अश्लील चाळे केल्याचा आरोप आहे.

गेल्या अनेक महिन्यांपासून हा प्रकार सुरू असल्याची माहिती पीडित मुलीने पालकांना दिली. घाबरलेल्या चिमुकलीने काल एका शिक्षिकेकडं आपली व्यथा सांगितल्यानंतर संपूर्ण प्रकरण उघडकीस आलं. ही घटना समोर येताच संतप्त ग्रामस्थांनी आरोपी शिक्षकाला चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केले. या प्रकरणी पोलिसांनी पीडित आणि इतर मुलींचे इन-कॅमेरा जबाब नोंदवले आहेत. या प्रकरणी पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!