नितीन देसाई यांच्या आत्महत्येपूर्वी ११ ऑडिओ क्लिप; पहिले वाक्य…

मुंबई: सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी आत्महत्येपूर्वी व्हॉईस रेकॉर्डरमध्ये 11 ऑडिओ क्लिप्स रेकॉर्ड केल्या असून ‘लालबागच्या राजाला माझा अखेरचा नमस्कार’ हे व्हॉईस रेकॉर्डरमध्ये रेकॉर्ड केलेले पहिले वाक्य आहे. तसेच एन.डी.स्टुडिओ कोणत्याही बँकेच्या ताब्यात जाऊ देऊ नका, असे आवाहन देसाई यांनी या ऑडिओ क्लिपमधून राज्य शासनाला केले आहे.

क्लिपमध्ये म्हटले आहे की, ‘राज्य शासनाने या एनडी स्टुडिओचा ताबा घेऊन कलावंतांना प्रोत्साहन देण्यासाठी एक भव्य कलामंच उभारावे अशी माझी इच्छा आहे, मराठी, हिंदी कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा. कारण, एन.डी.स्टुडिओ हे नितिन देसाई म्हणून नाही तर एका मराठी माणसाने उभे केलेले मोठे कलामंच आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या व्हॉईस रेकॉर्डरमध्ये नितीन देसाई यांनी रेकॉर्ड केलेल्या 11 ऑडिओ क्लिप असून त्याचा तपास पोलिस करणार आहेत. देसाई यांच्या सूचनेनुसार त्यांचे सहायक योगेश ठाकूर यांनी संबंधित ऑडिओ क्लिप ॲड. वृंदा विचारे यांना पाठविल्याचे समजते.

दरम्यान, पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. कलिना फॉरेन्सिक लॅबच्या अधिकाऱ्यांना पंचनाम्यावेळी बोलवण्यात आले. तसेच डिजिटल फॉरेन्सिक तज्ज्ञही उपस्थित होते. जे जे रुग्णालयात त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. एनडी स्टुडिओतच शुक्रवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार असल्याचे समजते. देसाई यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, २ मुली, जावई असा परिवार आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीहून एनडी स्टुडिओला परतल्यानंतर त्यांनी एका कर्मचाऱ्याला बंगल्याच्या आसपास कोणी फिरू नका, असे सांगितले. तसेच एक व्हॉईस रेकॉर्डर दिला आणि हा रेकॉर्डर बहिणीकडे सोपवावा असे देखील कर्मचाऱ्याला सांगितले. सकाळी आठ वाजेपर्यंत कर्मचाऱ्याला कोणतीही हालचाल दिसली नाही. त्याने पहिल्यांदा व्हॉईस रेकॉर्डिंग ऐकली आणि पहिल्या ऑडिओ क्लिपचे पहिले वाक्य ऐकून त्याला धक्काच बसला. लालबागच्या राजाला माझा अखेरचा नमस्कार असे पहिल्या ऑडिओ क्लिपमधील पहिले वाक्य होते. हे ऐकताच कर्मचाऱ्यांने बंगल्याच्या दिशेने धाव घेतली. तोपर्यंत उशीर झाला होता. ऑडिओ क्लिप्समध्ये देसाईंनी त्यांना मानसिक त्रास देणाऱ्या चार व्यावसायिकांची नावं घेतल्याचे समजते. या क्लिप्समधल्या देसाईंच्या आवाजाच्या नमुन्याची फॉरेन्सिक टीमकडून आधी तपासणी होईल. आणि त्यानंतरच पुढची कार्यवाही होईल, असे पोलिस सूत्रांनी सांगितले.

नितीन देसाईंच्या पार्थिवावर काल रात्री पोस्टमॉर्टम करण्यात आले. चार डॉक्टरांच्या टीमने पोस्टमॉर्टम केले. देसाई यांचा मृत्यू गळफास लावण्याने झाला, असा प्राथमिक निष्कर्ष पोस्टमॉर्टममधून समोर आला आहे.

नितीन देसाई यांच्या आत्महत्येची मित्राने सांगितली कहाणी; अहवाल समोर…

नितीन देसाई यांच्या आत्महत्येची मित्राने सांगितली कहाणी; अहवाल समोर…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!