नितीन देसाई यांच्या आत्महत्येची मित्राने सांगितली कहाणी; अहवाल समोर…

मुंबई: प्रख्यात कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई (५७) यांनी त्यांच्या कर्जत येथील एनडी स्टुडिओमध्ये बुधवारी (ता. २) पहाटे गळफास घेऊन आत्महत्या केल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.

नितीन देसाई यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन जे जे रुग्णालयात करण्यात आले. प्राथमिक निष्कर्षानुसार मृत्यूचे कारण फाशीमुळे झाल्याचे रायगड पोलिसांनी सांगितले. एनडी स्टुडिओतच त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार असल्याचे समजते. देसाई यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, २ मुली, जावई असा परिवार आहे.

नितीन देसाई यांचे जवळचे सहकारी दिलीप पिठवा हे त्यांच्यासोबत स्टुडिओमध्ये उपस्थित होते. त्यांनी 1 ऑगस्टच्या रात्रीची संपूर्ण परिस्थिती प्रसारमाध्यमांसोबत बोलताना सांगितली. ते म्हणाले, ‘आम्ही दिल्लीहून आलो आणि थेट स्टुडिओत गेलो. देसाई यांनी त्यांच्या अटेंडंटला थोडा वेळ आराम करायचा आहे,े असे बोलून बंगला उघडण्यास सांगितले. काही वेळ विश्रांती घेतल्यानंतर ते बाहेर आले. काही काम असल्याचे सांगून दुसऱ्या मजल्यावर गेले आणि तिथे जाऊन आत्महत्या केली. नितीन देसाई आर्थिक अडचणीत होते. त्यांनी आपले पवईचे कार्यालय विकल्याचे देखील कधी सांगितले नाही.’ दरम्यान, दिलीप हे फक्त नितीन देसाई यांचे चांगले मित्र नाहीत, तर त्यांनी जोश, मेला, देवदास, हम दिल दे चुके सनम या चित्रपटात देसाई यांच्यासोबत एकत्र काम केले आहे.

रायगडचे पोलिसांनी सांगितले की, ‘सेटवर काम करणाऱ्या एका कामगाराने याबाबत पोलिसांना माहिती दिली. सेटवर पोहोचलो तेव्हा नितीन देसाई यांचा मृतदेह लटकलेला होता.’ या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करत आहेत. नितीन देसाई यांनी स्व:कष्टाने आणि मेहनतीने उभारलेल्या एनडी फिल्म स्टुडिओमध्येच त्यांनी आत्महत्या केली. देसाई यांना आर्थिक चणचण भासत असल्याने त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी ११ ऑडिओ क्लिप रेकॉर्ड केल्या. त्या त्यांनी परिवारातील सदस्य, मित्र आणि वकिलांना पाठवल्याची माहिती पोलिसांच्या हाती आली आहे.

कर्ज देणाऱ्या कंपन्यांकडून आपली आर्थिक फसवणूक आणि छळ झाल्याचे त्यांनी क्लिपमध्ये म्हटल्याचे सूत्रांनी सांगितले. कर्ज देणाऱ्या संस्थांकडे एनडी स्टुडिओचा ताबा देऊ नये. हा स्टुडिओ सरकारने ताब्यात घावा, अशी विनंती त्यांनी पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना ऑडिओ क्लिपद्वारे केली आहे. देसाई यांच्या सूचनेनुसार त्यांचे सहायक योगेश ठाकूर यांनी संबंधित ऑडिओ क्लिप ॲड. वृंदा विचारे यांना पाठविल्याचे समजते.

नितीन चंद्रकांत देसाई कलाविश्वातील सर्वात मोठे नाव. २००५ साली हिंदीलाही टक्कर देईल असा आपला एक खाजगी स्टुडिओ त्यांनी कर्जत येथे उभारला. मराठी प्रेक्षकांना अभिमान वाटेल असा भव्य ‘एनडी स्टुडिओ’ त्यांनी सुरु केला. याठिकाणी अनेक सुपरहिट हिंदी चित्रपटांचे चित्रीकरण झाले आहे. शिवाय, ‘परिंदा’, ‘डॉन’, ‘लगान’, ‘देवदास’, ‘जोधा अकबर’, ‘हम दिल दे चुके नम’ अशा अनेक चित्रपटांचे कलादिग्दर्शन त्यांनी केले. ‘बालगंधर्व’ सारख्या मराठी चित्रपटाचेही कलादिग्दर्शन केले. ‘देवदास’,’खामोशी’ या चित्रपटांसाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला होता.

मोठी बातमी! सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांची आत्महत्या…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!