मुंबईत होणार कंत्राटी पोलिसांची भरती; सरकारच्या निर्णयाला विरोध…

मुंबईः कंत्राटी पोलिसांची भरती करण्याचा निर्णय गृह खात्याने घेतला असून, याची सुरुवात मुंबई पोलिस दलातून केली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात तीन हजार कंत्राटी पोलिसांची भरती केली जाणार आहे. मात्र, सरकारच्या या निर्णयाला विरोध होताना दिसत आहे. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी कंत्राटी पोलिस भरतीला विरोध केला आहे.

गृह विभागाने कंत्राटी पद्धतीने पोलिस भरतीत सहाय्यक शिपाई ते सहाय्यक निरीक्षक अशी 40 हजार 623 पदे मंजूर केली असल्याची माहिती दानवे यांनी परिषद सभागृहात दिली. एकीकडे केंद्र सरकार 2 कोटी रोजगार देण्याची घोषणा करते तर दुसरीकडे 9 खासगी संस्थाना वेगवेगळ्या पद्धतीने रोजगार देण्यासाठी नेमणूक सरकारने केली आहे. जगात स्कॉटलंड यार्ड धर्तीवर मुंबई पोलिसांची ओळख असताना कंत्राटी पद्धतीने तीन हजार पोलिसांची भरती करण्याचा निर्णय गृह विभागाने घेतलेला निर्णय हा चुकीचा आहे. पोलिस हे सरकारी अखत्यारीतच असले पाहिजे, अशी भूमिका मांडत अंबादास दानवे यांनी कंत्राटी पोलिस भरतीला कडाडून विरोध दर्शवला.

राज्यामध्ये बेरोजगारीचा गंभीर विषय असताना राज्यात कंत्राटी पद्धतीने तीन हजार पोलिसांची भरती करण्याचा निर्णय गृह विभागाने घेतला आहे. त्यामुळे राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त करत 289 अनव्ये कंत्राटी पद्धतीने पोलिस भरतीला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विधानपरिषदेच्या सभागृहात प्रखर विरोध दर्शविला आहे.

मुंबई पोलिस दलात नेहमी मनुष्यबळाची टंचाई असते. देशाची आर्थिक आणि महाराष्ट्र राज्याची राजधानी असलेल्या मुंबईत पोलिसांची वेगवेगळ्या कारणासाठी गरज भासत असते. त्यामुळे मुंबई पोलिस दलात नव्याने भरती करण्याची विनंती पोलिस आयुक्तांनी गृहविभागाकडे केली होती. दरम्यान या पार्श्वभूमीवर पोलिसांची कंत्राटी पदभरतीसाठी गृहखात्याने निर्णय घेतला आहे. ज्यात मुंबई पोलिस दलात पोलिस शिपाई ते पोलिस सहाय्यक निरीक्षकांची 40 हजार 623 पदे मंजूर केली आहेत. तर मुंबई, ठाणे आणि उपनगरांच्या भागात दहीहंडी, गणेशोत्सव सारख्या महत्वाच्या सणांच्या काळात बंदोबस्तासाठी पोलिसांची मोठी आवश्यकता असते. त्यामुळे अशावेळी या कंत्राटी पोलिसांची मदत होणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!