
लग्न लागले अन् नवरदेवावर केला चाकूने हल्ला; हल्लेखोर निघाला…
अमरावती : लग्न सोहळ्यामध्ये नवरदेवावर एकाने चाकूने हल्ला केल्याची घटना घडली असून, हा प्रकार ड्रोन कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. हल्ला करणारा युवक हा नवरदेवाचा मित्र निघाला आहे. दोघांमध्ये क्षुल्लक कारणावरून वाद झाला होता, त्यामुळे हा प्रकार घडल्याचे तपासादरम्यान समोर आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसाार, अमरावती शहरात बडनेरा रोडवर साहिल लॉनमध्ये बुधवारी रात्री ही घटना घडली. सुजल राम समुद्रे असे हल्ला झालेल्या नवरदेवाचे नाव आहे. लग्न आटोपल्यानंतर स्वागत समारंभ सुरू असतानाच त्याच परिसरातील आरोपी राघव बक्षी याने लग्न मंडपात स्टेजवर जाऊन नवरदेवाच्या मांडीवर चाकूने वार केले. त्यानंतर आरोपी पळून जात असताना सुजल समुद्रे यांच्या वडिलांनी आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला, असता त्यांच्यावर देखील आरोपीने हल्ला केला. हा संपूर्ण घटनाक्रम ड्रोन कॅमेराच्या माध्यमातून कैद झाला आहे.
हल्लेखोर राघव बक्षी आणि नवरदेव सुजल समुद्रे हे दोघे शेजारी राहात असून, एकमेकांचे चांगले मित्र आहेत. दोन दिवसांपूर्वी सुजल समुद्रे याने राघव बक्षी याला लग्नात डीजे आणण्यास सांगितले होते. सुजल याने अचानक डीजे रद्द केल्यामुळे राघव बक्षी हा चिडला. मी समोर डिजेवाल्याला शब्द दिला होता, त्याला आता मला पैसे द्यावे लागतील. माझा हा अपमान झाला आहे, असे म्हणत राघव याने सुजयसोबत दोन दिवसांपूर्वी वाद घातला होता. त्यावेळी सुजल याने राघवचा मोबाईल फेकून दिला होता. याचाच राग धरून त्याने हे कृत्य केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
दरम्यान, राघव बक्षी याच्यावर याआधीही वेगवेगळ्या पोलिस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहे. सुजलवर हल्ला केल्यानंतर राघव हा फरार झाला आहे. पोलिस त्याचा शोध घेत आहे. राघवला अटक करावी अशी मागणी सुजल समुद्रे यांच्या वडिलांनी केली आहे. आरोपी राघव बक्षी याच्यावर बडनेरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपीच्या शोधासाठी पोलिसांचे पथक पाठवण्यात आले असून लवकरच आरोपीला अटक केली जाईल, अशी माहिती पोलिस उपायुक्त गणेश शिंदे यांनी दिली.
अमरावती! पोलिस अधिकाऱ्याच्या हत्येचे कारण आलं समोर…
अमरावती हादरली! जागेच्या वादातून आई आणि मुलाची पहारीने हत्या…
अमरावतीत भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू…
अमरावतीमध्ये महिला पोलिस अधिकाऱ्याला वाळूच्या ट्रकने चिरडलं…
अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर पोलिसकाकाचा अपघाती मृत्यू…

