सॅल्युट करताना पोलिसांना संशय आला अन् अलगद सापडला…
अकोला : राज्यात बुधवारपासून (ता. २१) बारावीच्या परीक्षेला सुरुवात झाली आहे. शिक्षण विभागाकडून गैरप्रकार टाळण्यासाठी भरारी पथके, बैठी पथके याशिवाय पोलिसांचा फौजफाटाही तैनात केला आहे. मात्र, तरीही बारावीच्या पेपरला कॉपी पुरवण्यासाठी आगळी वेगळी शक्कल लढवल्याचा प्रकार समोर आला आहे. बहिणीला कॉपी पुरवण्यासाठी भाऊ चक्क ‘पोलिस’ बनून परीक्षा केंद्रावर पोहोचला पण पोलिसांच्या जाळ्यात तो अलगद अडकला.
अनुपमन मदन खंडारे असे ताब्यात घेण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे. अकोला जिल्ह्यातल्या पातूर शहरातील शाहबाबू उर्दू हायस्कूलमध्ये बारावीच्या परीक्षेदरम्यान तोतया पोलिसाचे भिंग फुटले आहे. २१ फेब्रुवारी रोजी इंग्रजीचा पेपर होता. बहिणीला कॉपी पुरवण्यासाठी अनुपम खंडारे पोलिसाच्या गणवेशात परीक्षा केंद्रावर आला होता. त्याच वेळी पातूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक किशोर शेळके हे ताफ्यासह परीक्षा सेंटरवर बंदोबस्ताला पोहोचले. त्यावेळी अनुपम खंडारे हा सुद्धा घटनास्थळी उपस्थित होता.
वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना पाहताच तोतया पोलिस बनलेल्या अनुपम खंडारे याने पोलिस अधिकाऱ्यांना सॅल्यूट केला. सॅल्युट करताना पोलिसांना त्याच्यावर संशय आला. अनुपमने घातलेला गणवेश, त्यावर असणारी नेमप्लेट चुकीची असल्याचे लक्षात आले. पोलिसांनी त्याची चौकशी करण्यास सुरवात केल्यानंतर तो अडखळू लागला. शिवाय, त्याच्याकडे इंग्रजीच्या विषयाच्या कॉप्या सापडल्या. पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत.
आमदार अनिल भोसले यांच्या पत्नीला तोतया ईडी अधिकाऱ्याचा फोन; म्हणाला…
पोलिस अधिकाऱ्यांच्या मिरवणुका, फेटे बांधणे, पुष्पवृष्टीवर बंधने…
धक्कादायक! पोलिस भरतीच्या तयारीसाठी अकॅडमीत गेलेल्या युवतीची आत्महत्या…
हृदयद्रावक! शाळेतील तिसऱ्या मजल्यावरून पडून विद्यार्थ्याचा मृत्यू; वडिलांचा आक्रोश…