मुंबईमध्ये इमारतीच्या पार्किंगमध्ये भीषण आग; सात जणांचा होरपळून मृत्यू…

मुंबई : गोरेगावमधील इमारतीच्या पार्किंगमध्ये मध्यरात्री तीन वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. या भीषण आगीत सात जणांचा होरपळून मृत्यू झाला असून, 40 जण जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले असून, सध्या कुलिंगचं काम सुरु आहे. आगीचे कारण अद्याप समोर आले आहे. स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल आहे.

गोरेगाव पश्चिमेकडील जी रोडवरील जय भवानी इमारतीमधील नागरिक झोपेत असतानाच मध्यरात्रीच्या सुमारास ही आग लागली होती. ग्राउंड प्लस पाच मजल्याची ही इमारत होती. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळ जाऊन आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. या आगीत अडकलेल्या 30 पेक्षा अधिक नागरिकांना सुखरूप बाहेर काढले आहे. पण, सात जणांचा मृत्यू झाला असून,40 जण या आगीमध्ये जखमी झाले आहेत. जखमींमध्ये सात महिला आणि सात पुरुषांचा समावेश आहे. जखमींना अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ बाहेर काढून मुंबईच्या ट्रॉमा केअर आणि कुपर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. या आगीत तळमजल्यावर वरील काही दुकाने आणि समोर पार्क असलेल्या गाड्या जळून खाक झाल्या आहेत.

नागरिकांनी सांगितले की, ‘मध्यरात्री तीन वाजता मोठा स्फोट झाला. स्फोटाच्या आवाजाने आम्ही जागे झालो आणि खाली पाहिले तर आग लागली होती. घरातील सर्वांना उठवले आणि बाहेर पडताना इमारतीतील सर्व सदनिकांच्या बेल वाजवल्या आणि लवकर घराबाहेर पडण्यास सांगितले. पार्किंगमध्ये भंगाराचे दुकान आणि जुने कपडे ठेवण्यात आले आहे. त्यामुळेच आग भडकल्याचा अंदाज आहे. या घटनेत नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.’

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!