समृद्धी महामार्ग एक Live अनुभव अन् बरंच काही…

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते समृद्धी महामार्गाचे लोकार्पण करण्यात आले आणि अगदी दुसऱ्याच दिवसापासून या महामार्गावरून सुरू झालेल्या अपघाताची मालिका अद्यापही सुरूच आहे. वाशिममधील कारंजाजवळ झालेल्या अपघातात मायलेकीला जीव गमवावा लागला. समृद्धी महामार्गाबद्दल अनेक बातम्या आणि सोशल मीडियावर विविध लेख वाचण्यात आले होते. अगदी तेंव्हापासून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाबद्दल कुतुहुल निर्माण झाले होते. समृद्धी महामार्गावरील शिर्डी ते नागपूर असा दौरा नुकताच केला. यावेळी आलेला अनुभव…
पत्रकार संतोष धायबर यांनी त्यांच्या फेसबुकवर समृद्धी महामार्गावर लिहीलेला अनुभव जसाची जसा पुढीलप्रमाणेः

नागपूरला हिवाळी अधिवेशनादरम्यान एका कार्यक्रमासाठी जाण्याचे ठरले होते. मित्र महेश बुलाख यांनी कारने जाण्याचे नियोजन केले. पुण्यातून कसे जायचे याबद्दल त्यांनी माहिती घेतली होतीच. पुणे शहरातून नाशिक रोडने शिर्डीला जायचे आणि शिर्डीतून समृद्धी महामार्गाला मिळून पुढे नागपूरला जायचे. पुणे शहरातून दुपारी दोनच्या सुमारास आम्ही दोघे शिर्डीच्या दिशेने निघालो. अर्थात, महेशजीच सुरवातीला कार चालवत होते. मला, पुढील अनुभव घ्यायचा होता आणि तो शब्दबद्ध पण करायचा होता. हे मनोमन ठरवलेले…

शिर्डीजवळ सायंकाळच्या सुमारास पोहचल्यानंतर एका ठिकाणी मस्त गरमागरम चहा घेतला. चहा पिल्यामुळे एकदम फ्रेश झालो होतो. महेशजींनी कारची चावी हातात टेकवली. त्यावेळी साधारण सायंकाळचे साडेसहा वाजले होते. हॉटेलपासून पुढे काही अंतर गेल्यानंतर समृद्धी महामार्गावर कारने प्रवेश केला. टोल नाक्यावर टोल कट झालाच नाही. आम्हालाही काही कळले नाही. पैसे नंतर कट होतील असे वाटलेले. पण, तसे नाही…

अंधार दाटून आला होता. भला मोठा आठ पदरी महामार्ग. जायला चार पदरी आणि यायला चार पदरी. महामार्गावर अगदी तुरळक वाहने. मोटारीची लाईट दूरपर्यंत जात होती. स्टेरिंग हातात घेतल्यापासून एक ठरवले होते. काही झाले तरी ८०-१०० च्या पुढे मोटारीचा वेग वाढवायचा नाही. मोटार अंतर पार करत होती. नजर जाईल तिथपर्यंत फक्त एका रेषेत अगदी सरळ रस्ताच दिसत होता. कुठे वळण नाही की कुठे खाच खळगा. खरंतर, अशा रस्त्याची सवयच नाही. पण, हा रस्ताच तसा बनवला आहे. किती तरी छान. मोटारीमधून प्रवास करताना विमानात बसल्याचा अनुभव येत होता. प्रवासादरम्यान रस्त्याच्या बाजूला विविध गावांची लाईट चमचम करत होती. अगदी स्मशान शांतता. एखादे वाहन शेजारून गेले की बुंग.. एवढाच आवाज येयाचा. विरुद्ध दिशेने येणाऱया वाहनांचा प्रकाश आणि रस्त्यांवरून जाताना चमचमणारे पट्टे आणि काजव्यांप्रमाणे लुकलुकणारे ब्लिंकर्स…

मोटारीची स्टेरिंग हातात घेतल्यापासून काहीच करायचे नव्हते. फक्त ऍक्सिलेटर… खेळण्यातील कॉम्प्युटर गेमप्रमाणे फक्त स्टेरिंग धरायचे आणि पुढे पुढे जात राहायचे. फक्त एवढेच चालकाचे काम. रात्रीच्या वेळी प्रवास करताना एका वेगळ्या दुनियेत आहोत की काय असेही वाटत होते. एवढे छान वाटत होते. खरंच किती छान रस्ता बनवला आहे, अशी चर्चा सुरू होती. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे व्याख्यान ऐकत होतो. प्रवास करताना चालकाने बोलत राहिलेच पाहिजे, असा माझा तरी अनुभव आहे. कारण, चालकाला झोप येण्याची शक्यता नाकारता येत नाही. एखाद्या समुद्र किनारी गेल्यानंतर नजर जाईल तिथपर्यंत फक्त पाणीच दिसते. त्याप्रमाणे महामार्गावरून प्रवास करताना नजर जाईल तिथपर्यंत फक्त एका रेषेत रस्ताच दिसत राहतो…

मोटार अंतर पार करत होती. नऊ वाजले, दहा वाजले. पोटात कावळे काव काव करायला लागले. महामार्गावर कोठेही थांबायची सुविधा नाही. साधे चहाचे हॉटेल पण नाही. प्रवासादरम्यान काहीच माहित नव्हते. मोटारीमध्येही पाण्याशिवाय काहीच नव्हते. कोणाला विचारण्याची सोयही नव्हती. महामार्गावर थांबताही येत नाही. मोटारीची काच खाली केल्यानंतर फक्त सुसाट जाणाऱया मोटारीचा आवाज एवढेच काही त्या महामार्गावर…

भूक तर लागलेली. काय करावे कळत नव्हते. मोटार ८०-१०० च्या वेगाने पळत होती. काही अंतर पार केल्यानंतर पेट्रोलंपंप जवळ असल्याची खून दिसली. बरं वाटले. तिथे काहीतरी खाण्याची व्यवस्था असेल असे वाटलेले. पण, नाही. एका झाडाखाली एक चहावाला होता. त्यांना पाहून खूप बरं वाटले. पेट्रोलपंपावर अनेक वाहने थांबलेली. आमच्या प्रमाणेच प्रत्येकाची अवस्था दिसत होती. चहा-बिस्कीट खाल्ले आणि पुढील प्रवासाला निघालो. पुढे हॉटेलमध्ये जाऊन जेवण करायचे ठरवलेले. पण, हॉटेल कुठेच नव्हते. मोटारीने ४०० किमी अंतर पार केले होते. भूक लागेलेली. नागपूर येण्याला आजून दोनशे किलोमीटर दिसत होते. त्यामुळे अमरावतीमधून बाहेर पडायचे ठरवले.

अमरावती जवळ आल्यानंतर मुख्य रस्त्यावरून बाहेर आलो आणि टोल नाका लागला. तेथे पैसे कट झाले. सहज चौकशी म्हणून विचारले तर त्यांनी सांगितले की, मोटारीने प्रवेश केल्यानंतर इन होते आणि बाहेर पडताना आउट होते. १ रुपया ७१ पैसे पर किलोमीटर प्रमाणे टोलचे पैसे कट होतात. हे आम्हाला माहितच नव्हते. किंवा कोठे वाचण्यातही आले नव्हते. आभार मानून पुढे निघालो. पुढेही ४० किमी अंतर पार केल्यानंतर एका ढाब्यावर जेवण मिळाले. त्यावेळी रात्रीचे सव्वा एक वाजले होते.

दोन दिवसांनी पुन्हा परतीचा प्रवास होताच. पण, एक अनुभव आला होता. रात्रीच्या वेळी जेवण करून प्रवास सुरू केला. शिवाय, प्रवासादरम्यान खाण्यासाठी काही पदार्थही घेतले होते. जाताना दोघे होतो. येताना सोबत मित्र संदीप कद्रे होते. यामुळे परतीच्या प्रवासादरम्यान तिघेही आळीपाळीने चालकाच्या भूमिकेत होतो. नियम फक्त एकच. ८०-१०० च्या पुढे काटा न्यायचा नाही. अनेक वाहने सुसाट वेगाने जात असल्याचे पाहून आपणही तसे जावे, असे कोणालाही वाटेल. किंवा एक्सिलेटरवरील पाय हळूहळू दाबला जातो आणि वेग वाढत जातो. पण, काट्यावर लक्ष ठेवायलाच हवे.

मध्यरात्री तीन-साडेतीनच्या सुमारास आम्ही मोटार थांबवून आराम करण्याचे ठरवले. एका पेट्रोलपंपावर मोटार थांबवली आणि आराम करण्याचा निर्णय घेतला. सकाळी पावणे सहाच्या सुमारास पुन्हा पुढील प्रवासाला निघालो. वाहने वेगाने जात होती. आजूबाजूची हिरवीगार शेत दिसत होती. दाट धुके पडले होते. धक्कादायक म्हणजे महामार्गावरून काही जण वॉर्मिंग वॉक करत होते. यामध्ये काही महिलाही दिसल्या. खरंतर हे जीवावर बेतण्यासारखे आहे. संबंधित अधिकाऱयांनी याची दखल घ्यायला हवी. नागपूरवरून निघाल्यानंतर शिर्डीमध्ये आलो आणि बाहेर पडलो… पण, किती तरी अनुभव येऊन गेले होते. खरा अनुभव शब्दबद्ध करायचा होता…

राज्यातील १० जिल्हे आणि २६ तालुक्यांमधून समृद्धी महामार्ग जात असून, एकूण २४ जिल्ह्यांना फायदा होत आहे. समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी खुला झाल्यापासून ३५ अपघात झाले आहेत. आतापर्यंत झालेल्या अपघातांची वेगवेगळी कारणे आहेत. यामध्ये वाहनांचा वेग हे यामागचे प्रमुख कारण समजले जात आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी समृद्धी महामार्गावरील वेगमर्यादेच्या संदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर गाडीचा वेग ताशी १०० किमी, इतर मार्गांवर ताशी ८० किमी असताना समृद्धी महामार्गावर १५० किमी ठेवण्यात आला आहे. ही तफावत का आहे? हा फरक करण्यामागचे निकष काय आहेत?, असा सवाल अजित पवार यांनी केला होता. हिवाळी अधिवेशनात या संदर्भातील प्रश्नाला उत्तर देताना महामार्गावर वेगमर्यादा ताशी १२० किलोमीटर असेल, असे सरकारच्या वतीने सांगण्यात आले होते. तसंच, अपघात रोखण्यासाठी अन्य उपाय करण्याची ग्वाही देखील देण्यात आली होती. मात्र, त्यानंतरही अपघाताचे सत्र सुरूच आहे. पण, प्रत्येकाने काळजी घेतली तर प्रवास नक्कीच सुखाचा होईल…

काय काळजी घ्यावी…
१) मोटारीचा वेग ८० ते १०० ठेवावा.
२) मोटारीचे टायर चांगले असायला हवेत.
३) मोटारीची सर्व्हिसींग झालेली अथवा सुस्थितीत असावी.
४) सलग मोटार चालवल्यामुळे टायर गरम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पेट्रोलपंपावर मोटार काही वेळ थांबवावे.
५) मोटारीमध्ये पाणी आणि खाण्याचे पदार्थ ठेवायलाच हवेत.

महामार्गावर काय हवे?
१) मोटारीच्या वेग मर्यादेसाठी तरतूद हवी.
२) काही तासांच्या अंतरावर खाण्याची सुविधा हवी. (नंतर होईल) पण, तोपर्यंत अनेकांचे हाल होतात.
३) काही किलोमीटर अंतरावर तरी स्पीड ब्रेकर हवेत.
४) पेट्रोल पंपावर हवा तपासण्याची सुविधा हवी. (सध्या तरी नाही)
५) दुचाकी, मॉर्निंग वॉकला जाणाऱयांना पायबंद हवा.

अपघाताची कारणे..
१) एक सलग प्रवास केल्यामुळे टायर गरम होऊण फुटण्याची शक्यता
२) चालकाला डुलकी लागल्यामुळे अपघात होण्याची शक्यता
३) मोटारीच्या वेगामुळे अपघात होण्याची शक्यता

दरम्यान, अनुभव लिहीण्यामागचे कारण म्हणजे प्रवास करताना काळजी घेतली जाईल. किमान खाण्या-पिण्याचे तरी हाल होणार नाहीत. विना अपघात प्रवास व्हावा, हिच इच्छा आहे. वाहन चालकाने अथवा नागरिकांनी काळजी घेतली आणि एक अपघात टळला तरी खूप मोठे समाधान मिळेल. आपला प्रवास सुखाचा होवो…

धन्यवाद!
संतोष धायबर, पत्रकार
santosh.dhaybar@gmail.com

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!