
आयपीएस अतुल कुलकर्णी: जमिनीवर राहून काम करणारा अधिकारी…
धाराशिव जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक अतुल विलास कुलकर्णी यांची नुकतीच भेट झाली. यावेळी त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा झाली. एक आयपीएस अधिकारी पण जमिनीवर राहून सर्वसामान्य नागरिकांसाठी मोठ्या प्रमाण काम करत असल्याचे पाहायला मिळाले. पोलिस अधीक्षकपदाची जबाबदारी घेतल्यापासून त्यांच्या कामाचा वेग अतुलनीय आहे. कामापेक्षा कृतीवर भर दिल्यामुळे पोलिस कर्मचाऱ्यांसह जिल्ह्यातील नागरिकही त्यांच्या प्रेमात पडल्याचे पाहायला मिळाले. त्यांच्याविषयी थोडक्यात…
पोलिसकाकाचे सहसंपादक उमेशसिंग सुर्यवंशी यांच्या तोंडून अनेकदा २०१५च्या बॅचचे आयपीएस अधिकारी अतुल कुलकर्णी यांचे नाव ऐकत होतो. शिवाय, अतुल कुलकर्णी यांच्या बातम्या पोलिसकाका साईटवर येत असल्यामुळे त्यांचे काम बातम्यांच्या माध्यमातून पाहायला मिळत होते. वर्धा येथील रहिवासी असलेले उमेशसिंग सुर्यवंशी काही कामानिमित्त पुणे शहरात आले होते. दुपारच्या दरम्यान त्यांचा फोन आला. धाराशिव जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांना उद्या भेटायला जाऊयात, असे म्हणाले.
पोलिसकाकाचे पत्रकार संदीप कद्रे, महेश बुलाख, सुनिल सांबारे, उमेशसिंग सुर्यवंशी आणि मी. आम्ही पाच जणांनी दुसऱ्या दिवशी पहाटे चारच्या सुमारास जाण्याचे नियोजन केले. दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे एकत्र भेटलो आणि सोलापूर महामार्गावरून तुळजापूरच्या दिशेने निघालो. सकाळची रम्य सकाळ, पाच पत्रकरा एकत्र आल्यामुळे विविध विषयांवरील रंगलेल्या गप्पा आणि खरं म्हणजे कित्येक दिवसांनी छान असा सुर्योदय पाहायला मिळाला. मोटार अंतर कापत होती… इंदापूर जवळ असलेल्या एका हॉटेलमध्ये सकाळी-सकाळी मिसळवर ताव मारला आणि पुढच्या प्रवासाला निघालो…
तुळजापूरमध्ये काही तासांच्या प्रवासानंतर पोहचलो होतो. तुळजामातेचे मनोभावे दर्शन घेतले. मंदिर परिसरात असलेले वरीष्ठ पोलिस निरीक्षक सुरेश दलवे यांच्यासोबत चर्चा झाली. फोटो काढले. मंदिर परिसरात वाहतूक नियोजनाची जबबादारी असलेले मित्र अनुप गायकवाड यांच्यासोबत चहा घेऊन धाराशिवच्या दिशेने निघालो. खरंतर धाराशिवला प्रथमच जात होता. गुगल मॅप असल्यामुळे काही अडचण नव्हती. दरम्यानच्या काळात उमेशसिंग सुर्यवंशी आणि अतुल कुलकर्णी यांच्यात चर्चा होत होती.
धाराशिव शहरात प्रवेश झाला होता. मे महिन्यातील कडक उन होते. पण, पोटाची खळगी भरण्यासाठी अनेकांची धडपड पाहायला मिळत होती. उन्हामुळे रस्त्यावर वाहनांची विशेष अशी गर्दी नव्हती. काही वेळातच पोलिस अधीक्षक कार्यालयात दाखल झालो. कुलकर्णी सरांना भेटण्यासाठी वेटींग रुममध्ये बसलो. नागरिक आपले प्रश्न घेऊन थांबलेले होते. काही वेळानंतर सरांनी भेटायला बोलावले. कार्यालयात गेल्यानंतर आदरपूर्वक स्वागत केले. प्रत्येकाची ओळख करून घेतली. अुतल कुलकर्णी मुळचे बेळगावचे. त्यामुळे ते मराठी बोलत असताना ऐकायला छान वाटत होते. विविध विषयांवर चर्चा झाल्या. खरंतर, पहिल्याच भेटीत एक आगळं-वेगळ व्यक्तीमत्व अनुभवायला मिळाले.
पोलिस अधीक्षक पदाची जबाबदारी, नागरिकांचे प्रश्न, मिटिंगा होत्या. आम्हाला बंगल्यावर पाठवले आणि परिसर फिरून दाखव्यासाठी सोबत एक सहकारी दिला. कडक उन पण बंगल्याच्या परिसरात गेल्यानंतर छान गारवा अनुभवायला मिळाला. बंगल्याचा परिसर म्हणजे साधारण तीन एकर असावा. हिरवीगार झाडी. आंब्याला लागलेले प्रचंड आंबे, पक्षांचा चिवचिवाट ऐकून मन प्रसन्न झाले. प्रवासाचा थकवा कुठल्या कुठे पळून गेला होता, समजलेही नाही…
बंगल्याच्या परिसरात असलेल्या बागेबद्दल त्यांच्या सहकाऱ्याकडून माहिती घेत होतो. ते सांगत होते, सरांनी जागेचा पूर्ण कायापालट केला आहे. तीन एकरच्या परिसरात शेती पिकवली आहे. शंभरहून अधिक झाडे लावली आहेत. पंचवीस वर्षात प्रथमच आंब्याच्या झाडांना फळं लागली आहेत. यापूर्वी कधी आंबे दिसले नव्हते. पण, सरांनी परिसराचा कायापालट केला आहे. सर, सकाळी आणि संध्याकाळी बागेत फिरतात. माहिती घेतात. प्रत्येक गोष्टीवर त्यांचे बारीक लक्ष असल्यामुळेच बाग फुलली आहे. कामामुळे रात्री उशीर झाला तरी बॅटरी घेऊन ते चक्कर मारून येतातच. अतिशय नियोजबद्द अशी बाग त्यांनी फुलवली आहे.
जिलेबी बाग…
पोलिस अधीक्षक बंगल्याच्या परिसरात त्यांनी जिलेबी बाग तयार केली आहे. जिलेबी बाग म्हणजे जिलेबीच्या आकाराची असते. जिलेबीच्या आकाराप्रमाणे विटांची नक्षी असते. त्यामध्ये त्यांनी झाडे लावली आहेत. पहिल्या झाडाकडे जाताना जिलेबीच्या आकाराप्रमाणे गोल-गोल फिरतच जावे लागते. उत्कृष्ठ अशी जिलेबी बाग पाहायला मिळते. विविध झाडे असल्यामुळे मन रमून जाते, हे झाले बागेबद्दल…
नागरिकांसाठी वेळ…
पोलिस अधीक्षक पदाची जबाबदारी असली तरी एक वाजेपासून ते पाच वाजेपर्यंत ते नागरिकांना भेटत असतात. त्यांचे प्रश्न सोडवत असतात. थेट, साहेबांनापुढेच प्रश्न मांडल्यामुळे अनेकांचे प्रश्न मार्गी लागल्याचे एक आजोबा सांगत होते. साहेबांच वय लहान आहे. पण, माझ्यासारख्या नव्वदीच्या अडाणी माणसाला भेटतात. बोलतात आणि प्रश्न सोडवतात. साहेब लय मोठ्या मनाचे हाय बघा… असे आजोबा सांगताना त्यांची तळमळ पाहायला मिळते.
गुन्हेगारी कमी…
पोलिस अधीक्षक पदाची जबाबदारी घेतल्यानंतर गुन्हेगारी कमी कशी होईल, याकडे प्रथम लक्ष केंद्रीत केले. जिल्ह्यात कायदा-सुव्यवस्था राखली गेली पाहिजे, यासाठी अधिकाऱ्यांना सांगण्यात आले. विशेष म्हणजे काही दिवसातच चित्र दिसू लागले. धाराशिव शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत केली. पथदिवे सुरू केले. थोडक्यात, विस्कळीत झालेली घडी बसवण्यावर लक्ष दिले आणि अंमलबजावणी सुद्धा केली.
पोलिसांना दंड…
पोलिस अधीक्षक पदाची जबाबदारी म्हटल्यावर अनेकदा कटू निर्णय घ्यावे लागतात. कारण, तसे केल्याशिवाय शिस्त लागत नाही. प्रेम, कठोरता, आपुलकी, जिव्हाळा या सर्व गोष्टी ते आंमलात आणत असल्याचे समजले. एखाद्या कर्मचाऱ्याला दंड करायचा असेल तर तो म्हणजे ५०-१०० झाडे लावण्याचा दंड करत असल्याचे समजले. कर्मचाऱ्यांपासून ते पोलिस अधिकारी मनमोकळे पणाने त्यांच्याशी बोलतात. आपले प्रश्न मांडतात. दोन्ही बाजूंनी संवाद होत असल्यामुळे आदरयुक्त भिती आणि त्यापेक्षा प्रेमाणेच ते जिंकत असल्याचे अनेकांनी सांगितले. निसर्गप्रेमी असलेले श्री. कुलकर्णी यांचा जिल्ह्यात विविध प्रकारची लाखो झाडे लावण्याचा त्यांचा मानस आहे.
फासेपारधी…
पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी हे फासेपारधी नागरिकांसाठी मोठ्या प्रमाणात काम करत आहेत. फासेपारध्यांकडे कोणतीही कागदपत्रे नाहीत. ना भारताचा रहिवासी, ना आधार कार्ड ना रेशन कार्ड. त्यांच्या साठी काम करण्याचे ठरवल्यानतंर पोलिसांना पाहून फासेपारधी पळून जात. पण, अतुल कुलकर्णी हे स्वतः त्यांच्या मिसळले. त्यांच्याशी बोलू लागले. त्यांना आधार दिला. विशेष म्हणजे फासेपारधी आता स्वतः त्यांच्याकडे येऊ लागले आहेत. अनेक फासेपारध्यांची कागदपत्रे तयार करून दिली आहेत. युवकांना चोरीतून बाहेर काढून नोकऱ्या लावून दिल्या आहेत. त्यांच्यामध्ये एक आत्मविश्वास निर्माण केल्यामुळे फासेपारधी आणि पोलिसांमध्ये एक नाते निर्माण झाले आहे. आमच्या पिढ्या चोऱ्या-माऱ्या करण्यात गेल्या. पण, आमच्या मुलांचे तसे होऊ नये म्हणून अनेकजण पुढे येऊ लागले आहेत. अतुल कुलकर्णी यांनी पुढाकार घेऊन फासेपारध्यांसाठी मोठे काम केल्याचे दिसत आहे.
पोलिस अधीक्षक कार्यालय…
पोलिस अधीक्षक कार्यालयाची इमारत जुनी झाली आहे. पण, अतुल कुलकर्णी यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अनेक कामे मार्गी लावली आहेत. पोलिस अधिक्षक कार्यालयाची नवीन अशी सुसज्ज अशी इमारती उभारली जात आहे. मोकळ्या मैदानाचा कायापालट केला आहे. इमारत उभारण्यापूर्वी त्या जागेवर फक्त कचरा होता. तब्बल २०० ट्रक करचा त्या जागेवरून काढण्यात आला आहे. सध्या छान मैदान आणि त्या जागेत मोठी इमारत उभी राहात आहे. अतुल कुलकर्णी हे स्वतः लक्ष घालून हे काम करून घेत आहेत.
कँटीन…
पोलिस अधीक्षक कार्यालय म्हटल्यावर वर्दळ असतेच. जिल्हातून नागरिक भेटीसाठी येत असतात. शिवाय, पोलिस कर्मचारी आहेत. पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या परिसारत छान असे कॅंटीन सुरू केले आहे. पदार्थांचा दर्जा उत्तम आहे. नागरिकांची उपासमार होऊ नये म्हणून ते सतत काळजी घेत असतात. शिवाय, कॅंटनला अचानक भेट देऊन पदार्थांच चव तपासत असतात. यामुळे स्वच्छ आणि छान कँटीनची सुविधा उपलब्ध आहे.
जमिनीवरचा अधिकारी…
पोलिस अधीक्षक कार्यालयात गेल्यानंतर अतुल कुलकर्णी यांच्याशी सुद्धा विविध विषयांवर चर्चा करता आली. धार्मिक आणि सकारात्मक विचार घेऊन पुढे जाणारा अधिकारी अनुभवायला मिळाला. महत्त्वाचे पद असल्यामुळे बहुतांश वेळ नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी देण्याकडे लक्ष आणि विशेष म्हणजे जमिनीवर राहून काम करत असलेला अधिकारी अनुभवायला मिळाला.
– संतोष धायबर,
संपादक, 9881242616
editor@policekaka.com