पाक महिला प्रियकराला भेटण्यासाठी मुलांसह आली भारतात अन् पुढे…

नवी दिल्ली: पबजी गेममुळे पाकिस्तानी महिला सीमा हैदर आणि भारतातील युवक सचिन यांची ओळख झाली. मैत्रीचे रुपांतर नंतर प्रेमात झाले. यानंतर सचिनला भेटण्यासाठी सीमा हैदर तिच्या चार मुलांसह सीमेपलिकडे भारतात आली आहे. एक सीमापार घडलेली प्रेमकथा व्हायरल होत आहे. पाकिस्तानी महिला बेकायदेशीरपणे भारतात आल्याने कायदेशीर अडचणीत सापडली असून यादरम्यान तिने हिंदू धर्म स्वीकारल्याचा दावा केला आहे. त्यांनी आपल्या मुलांची नावेही हिंदू धर्मानुसार बदलली आहेत.

सीमा आणि सचिन गेमिंग अ‍ॅप PUBG वर बोलू लागले आणि नंतर प्रेमात पडले. सचिनच्या प्रेमासाठी सीमा पाकिस्तान सोडून भारतात आली. यानंतर दोघांनी लग्नासाठी वकिलाशी चर्चा केली असता सीमाकडे व्हिसा नसून ती बेकायदेशीरपणे भारतात दाखल झाल्याचे निष्पन्न झाले. वकिलाच्या तक्रारीवरून सचिन, त्याचे वडील आणि सीमा यांना अटक करण्यात आली. अवैधरित्या भारतात प्रवेश केल्याच्या आणि वैध कागदपत्रांशिवाय ग्रेटर नोएडामध्ये राहण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. स्थानिक न्यायालयाने मंगळवारी तिला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. तिची 4 मुले त्यांच्या आईसोबत तुरुंगात राहण्याचे आदेश दिले, असे पोलिसांनी सांगितले.

सीमा हैदर या महिलेने सांगितले की, तिने हिंदू धर्म स्वीकारला आहे आणि सचिनसोबत राहण्यासाठी तिचे मुस्लिम आडनाव सोडले आहे. या महिलेने असाही दावा केला आहे की, तिने तिच्या नवीन धर्माला अनुरूप मुलांची नावे बदलली आहेत. ती म्हणाली, ‘सीमा हे हिंदू आणि मुस्लिमांमध्ये समान नाव आहे आणि त्यामुळे मला माझे पहिले नाव बदलण्याची गरज नाही, असे सचिन म्हणाला. मी स्वतःला सीमा किंवा सीमा सचिन म्हणू शकते. आम्ही आमच्या मुलांची नावे बदलून राज, प्रियांका, परी आणि मुन्नी अशी ठेवली आहेत.

पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील खैरपूर जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या या महिलेने 13 मे रोजी पब-जीवर भेटलेल्या प्रियकराला भेटण्यासाठी पहिल्यांदा नेपाळ गाठले. त्यानंतर वैध कागदपत्रांशिवाय भारतात प्रवेश केला. महिलेने तिच्या प्रवासासाठी तिच्या जमिनीचा एक तुकडा विकला, ज्याची किंमत सुमारे 12 लाख रुपये होती. प्रियकरासह तिच्या कुटुंबियाने सीमाला तिच्या मुलांसह स्वीकारले आहे. त्यांनी पंतप्रधान मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना आपल्या पत्नीला भारतीय नागरिकत्व देण्याची विनंती केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!