दारिद्रय नशिबी यायला भाग्य लागते…
दारिद्रय नशिबी यायला भाग्य लागते… कारण खरी आयुष्यातील कष्टाची कमाई झोपताना सुखाने झोप देते… स्वप्ने पण पडत नाही… फक्त सुखी जीवनातील इतर व्यक्तीकडे पाहताना.. खदखदुन रडु येतं… कुठे पर्यंत सोसावे… आणि कुठं पर्यत सोसत रहावे.. मग काबाड कष्ट करणाऱ्या घाम गाळणाऱ्या त्या झिजणाऱ्या देहाकडे पाहुन… गप्प बघत बसावे… पहा मिळेल का… आनंद…? फुटेल का पाझर… या कठोर मनाला….. राहु दे..?…गरीबाला माज असतो… आणि असणारच….घामाचा पैसा कमविण्यासाठी घामच गाळत असतो अंगातून….!…
एक एकदा मला पण गरीब असल्याची चिड यायची… कुठे पर्यंत सोसावे… दुसऱ्याच्या घरात खमंग वास आला कि…. घरात आईला सांगण्यासाठी धुम ठोकत असे… पण काय उपयोग… “चुलीवर पैजेचा आधान..” असे मी दिवस भोगलेले आहेत… पण आहे त्या परिस्थिला सामोर गेलं पाहिजे हे मात्र शिकविले…. मुलांची जोपासना करताना आईची पण तारांबळ होत असे तेव्हा आई म्हणायची.. ” शेनातलो किडो शेनात रव्हंत नाय..”…शेती करत असल्याने तांदुळ या वर्षीचा दुसऱ्या वर्ष पर्यंत पुरत असे…पण एक एकदा वर खर्चाला पैसा नसायचा….त्यावेळी आम्ही गरिबीच्या पोटाला चिमटा लावण्यासाठी तेल लावून मसाले-भात खुप आवडीने खाल्लेला आहे…माझ्या आवडीचा पदार्थ नसेल तेव्हा आई ओरडुन सांगायची..”लय लाडात येवु नको..केशा(केशव)…पेज खा आणि ढोरा(जनावरे) सोड जा.”..!….सकाळ झाली कि…माझा दिवस सुरु झाला…
शाळेत एकच ड्रेस त्याला पण ईस्त्री ही नाहीच..तसाच घडी पडलेला…चुरगळलेला शाळेत घालुन जात असे…तोच ड्रेस माझे चुलते नानांच्या(सुभाष पवार)लग्नात घातलेला…लग्न होवुन..पाहुणे घरी जाई पर्यंत लाजेने पडवित लपुन बसलेलो….आई ओरडली मला..
सुरवातीला शाळेत बिना चपलीचा गेलेलो आहे….हातात बाजाराच्या पिशवीत दप्तर…अशा परिस्थितीत आमच्या सांगवेकर इंदु आत्येने आम्हाला कपडे, शैक्षणिक साहित्य, साड्या देवुन आपल्या संख्या भावाच्या परिस्थितीला मोलाचा हातभार पण लावलेला आहे….आर्थिक मदत पण केलेली….सांगवेकर काका मुंबईतुन मिठाई चांगली गोड चविष्ट घेवुन यायचे… मुंबईतुन येताना हे आपल्याला मिठाई घेवुन येणार ही आर्तुतेनेवाट पाहत होतो… आता हौस म्हणून आता वुडलॅंड कंपनीचा 4000/- रू.चा बुट माडीवर पडुन आहे…
कोकणात गणेश चतुर्थी चांगली उत्साहात साजरी करतात.. …याच पहिल्या दिवशी मी गुरे घेवुन रानात … जीजी पटेल यांच्या कुंपणात घालुन मी दुपार पर्यंत रानात… गणपतीचे पुजन होवुन.. नैवैद्य देवुन आरती पण झालेली असायची…. चांगले कपडे घालण्यासाठी नसल्याने.. माझा तो बहाना पण असायचा… मला हसतील… गर्दी कमी झाली कि माझे पुजन….
एकदा तर परिस्थितीने कहरच केला… सर्व वाडीत चार दिवस आधिच बाजार भरला जायाचा… आमच्याजवळ पैसे नसल्याने तो गणेश चतुर्थीचे पहीले दोन दिवस तांदळाची पेज खावुन दिवस कसे तरी घालविले… नंतर बाबांचा घरगुती चप्पल शिवायचा धंदा असल्याने गावात जावुन ते विकुन घरात बाजार आणलेला… मग दोन दिवस काळ्या वाट्यान्याची उसळ व बटाटिची भाजी जेवत होतो….
गणेश चतुर्थी म्हणजे कोकणात दिवाळीच… फटाके, एटमबॉंम, लक्ष्मीबाॅम, चेपा,चक्री, सुतळीबाॅंम, लवंगीफटाकि, फुलबाजा,पाऊस… हे माझे चुलत भाऊ समोर लावुन… आनंद घेत असत… कोणी मला एक तरी देईल का…?.. हिच माझी उत्कंठा.. .परिस्थितीने कधि खरेदी करायला दिलेच नाही…. म्हणुन.. नोकरी लागल्यानंतर… जत्रेमधुन ताईच्या (प्रतिभा)मुलीला खेळण्याचा मोठा ट्रकच घेवुन आलो… “अरे कशाक आणलं.. तन्वीसाठी (ताईची मुलगी).. कशाक आणलं एवढा मोठा..” प्रतिभा ओरडली…. तिच्यासाठी घेवुन ईलय माझी पण बालपणाची हौस भागवू दे माका..”… अंगणात तन्वी सोबत लहान होवुन खेळत राहीलो…
दहावी पर्यतचे शिक्षण गावातच झाले…पार्ट टाईम मंजुरी करुन बारावी कनेडी हायस्कूल येथे झाली…..मासिक 50 रु.पासा करिता खुप झगडावे लागत होते……नंतर मात्र परिस्थिती बिकट असल्याने पदवी पर्यतच्या शिक्षणा करीता कणकवली काॅलेजला प्रवेश घेतला…राहण्यासाठी काकडे हाॅल मधिल डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहात प्रवेश घेतला… तिन वर्ष वसतिगृहात होतो… वेगुर्लेकर, दिपक कोंडविलकर, लोकरे, कदम, साळुंखे, दिपक मुणगेकर, संदिप पवार, हे माझे वसतिगृहातील मित्र… तांबे , पोईपकर,खांमकर मॅडम हा जेवन करणारा स्टाफ… कदम, वाघाटे, दाठे.. शिपाई स्टाफ.. मोकळया वेळेत चहा पिण्यासाठी सुधीर जाधवच्या (आत्येचा मुलगा)घरी वारंवार फेरी असायची… माझी मावशी व काकी..सुनिता पवार यांच्या घरी कलमठ येथे पण जात असे….हाॅस्टेल जीवनात मी मजुरीची कामे पण केलेली… तेवढीच मदत शिक्षणातील साहित्य खरेदी करायला……
पदव्युत्तर शिक्षण झाल्यानंतर चिऱ्याची(जांभा दगड)कामे करण्यासाठी मजुरीला जात असे… दादा(बाळा पवार) पण सोबत असायचा… तो चिवट असला तरी त्याला त्रास होत असे…पण घरात वडील भाऊ असल्याने सहन करत असे… पण मला जास्तच त्रास झाल्याने दोन दिवस मजुरीला गेलोच नाही… आई समजुन गेली…” घरात फुकटचं खायाला मिळाचा नाय…मेहनत करुक होई…आपली काय बाबजात ईस्टेट नाया.. लोळत रव्हण्यापेक्षा त्योंड घेवुन जा..”… हे दादांचे बालणे परिस्थितीला पकडुन होते…दादाचे पण बरोबर.. यात मी वाद न घालता…” मी माझा बघतयं.. “.. असे बोलुन सरळ मुंबईत चुलते नाना जवळ आलो… येथेच या रागाचा उपयोग झाला….. म्हणजे सरळ पोलीस भरतीचा काॅल आला…नानांना सांगितले…. नानांनी पैसे पण भरपुर दिले…..रेल्वेत बसवायला आलेले…पाया पडलो…उतरलो कणकवलीत… आणि कष्टाला फळ आले…पोलीस शिपाई म्हणून निवड पण झाली….
नानां जवळ काम करत असताना बोरीवली साईबाबा चौकातून सिमेंटचे पोत डोक्यावर घे… झुला, सामानाची पिशवी भर गर्दीत वाहतुक केलेली आहे… एकदा तर मला संडासच्या पाईपचे लिकेज काढण्याचे काम सांगुन नाना निघुन गेले… मी काम करण्याच्या अगोदर बिल्डिंग मध्ये सर्वाना सांगुन आलेलो.. बाहेरच्या पाईप लाईनच्या लिकेजचे काम चालू आहे… बाथरूमचा कोणी वापर करु नका…!… माझ्या सोबत एक बिहारी कामगार होता… त्याने झुला धरला मी झुल्याने खाली उतरलो…. पाईप खोल्ला.. पण एक रुम मधील व्यक्तीने संडासचा वापर केल्याने वरुन सर्व संडास माझ्या अंगावर… हा वास सहन करत फिटींगचे काम करुनच खाली उतरलो…अजुनही आठवतंय… दोन क्लिनिक प्लस शापुचे पाकिटे… दोन वेळा आंघोळी करुन संपविले.. कपडे कचरापेटीत टाकुन दिले… त्यानंतर आउॅंट लाइनचे काम मी केले नाही… कामगार लावूनच काम करुन घेत असे……
बिहारी लोक खुप कष्टाची आणि मेहनती…सकाळीच जेवन करुन यायचे…..आमचा त्यावेळी नाष्टा… नानांनी काँक्रीट फोडायचे काम दिलेले.. सकाळी फोडायला सुरवात केली ते दुपारचे चार वाजले.. उपाशी पोटी फोडत होतो…. नाना कामाच्या व्यापामुळे विसरले.. किंवा माझ्या जवळ पैसे असणार या कारणाने चार नंतरच आले…. मी रडुन- रडुन.. मोठ-मोठ्यात रागाने बोलत होतो… नानांची…चुकि असल्याने गप्प ऐकुन घेत होते… परत मात्र माझ्याजवळ काम सोपविले कि आदी पैसे विचारायचे… आणि हटकुन पैसे द्यायचे पण. ..
आता नोकरी लागली ….. तीच परिस्थितीराहीली नाही…. पगार होतो तशी वाटणी होते…पण आई-वडील ,भाऊ बहिण, मित्र ,पाहुणे -सोयरे यांना पण बाकी पैसातुन मदत करतो…… पहिले दहा तारीख पर्यंत श्रीमंत असतो… दहा ते वीस तारीख पर्यंत गरीब असतो… विस तारीख नंतर खिसा खाली असतो…. असे प्रत्येक नोकरदाराचे दिवस असतात…नोकरी असुन मी माज न येणारा अजुन श्रीमंतीत जगणारा गरीबच आहे…पण ते गरिबिचे दिवस विसरता येणार नाहीत…एक-एकदा सुखाचे दिवस बघताना दुःखाच्या काळातील पाठिमागिल दिवस डोळ्यात पाणी आणतात…. दुसऱ्यांना मदत कर असंच सांगतात….
माझे चुलते गणपत पवार (माझे काका) आम्ही आवडीने “आना” म्हणतो….. त्यांनी मला एक चांगला मंत्र दिलेला..”केशव नोकरी मिळवणे सोपे आहे पण टिकविणे अवघड आहे..”..असे थोरांचे विचार नोकरीला चांगले वळण देतात…यातुनही नोकरीमुळे मी सुखी आहेच पण माझ्या पुर्ण कुटुंबाचा कणा म्हणुनच ठाम पणे उभा आहे…मला कळत-नकळत ज्यांनी-ज्यांनी मदत केली…आर्शिवाद दिले त्यांच्यामुळेच सुखी व समाधानाचे नोकरी करत आहे……मी कोणालाही मदत करायला पाठ फिरवत नाही… माझ्या परिस्थिती नुसार निसंकोच मदत करतो……
कृतघ्न लोकांच्या काळजाला असाच पाझर फुटुन मदत करण्याच्या भावना मनातुन हातात येवुदे हीच प्रार्थना करेन.
– शंकर (केशव) वसंत पवार
निवृत्त पोलिसांना लेखक होण्याची सुवर्णसंधी!
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…
पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!