समृद्धी महामार्गावर २५ होरपळून मृत्यू; चालकाबाबत धक्कादायक माहिती समोर…
बुलढाणाः समृद्धी महामार्गावरील बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा जवळ विदर्भ ट्रॅव्हल्सच्या बसला झालेल्या अपघाताबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. अपघातात 25 जणांचा होरपळून मृत्यू झाला. अपघातावेळी बसचालक मद्यधुंद अवस्थेत होता, अशी माहिती फॉरेन्सिक अहवालात उघड झाली आहे.
समृद्धी महामार्गावर 1 जुलै रोजी भीषण बस अपघात झाला. बसचालकाचा फॉरेन्सिक अहवाल समोर आला आहे. या अहवालात बसचालकाच्या रक्ताच्या नमुन्यामध्ये अल्कोहोल असल्याचे निष्पन्न झाले आहे. रिजनल फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी (RFSL) अमरावतीच्या रासायनिक विश्लेषण अहवालानुसार, ड्रायव्हर शेख दानिशच्या अपघाताच्या दिवशी गोळा केलेल्या रक्ताच्या नमुन्यात कायदेशीर अल्कोहोल मर्यादेपेक्षा 30 टक्क्यांपेक्षा जास्त होते.
अमरावती मधील रिजनल फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीने दिलेल्या अहवालाप्रमाणे, ड्रायव्हर शेख दानिशच्या रक्तात मान्य प्रमाणापेक्षा 30 टक्के जास्त अल्कोहोल आढळले आहे. महाराष्ट्रात ब्लड अल्कोहोल कंटेंट (BAC) म्हणजेच रक्तात अल्कोहोलचे मान्य प्रमाण 100 मिलिलीटर रक्तात 30 मिलीग्राम अल्कोहोल एवढे आहे. मात्र, रिजनल फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीच्या अहवालानुसार, दानिश शेखच्या रक्तात त्यादिवशी 30 टक्के जास्त अल्कोहोल आढळले आहे. त्यामुळे 1 जुलैच्या मध्यरात्री घडलेला तो अपघात समृद्धी महामार्गामुळे नव्हे तर ट्रॅव्हल्स चालवणाऱ्या ड्रायव्हरच्या मद्यपानामुळे घडला होता का अशी शंका निर्माण झाली आहे.
दरम्यान, पुराव्यांवरून असे समोर आले आहे की, अपघातावेळी ड्रायव्हर झोपला होता आणि त्यामुळे बस मध्यभागाच्या भिंतीवर आदळली होती आणि बसला आग लागून अपघात घडला. आयपीसी कलम 304 अन्वये बसचालकावर दोषी हत्येसाठी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ड्रायव्हर दानिशच्या रक्त अहवालामुळे त्याला दोषी ठरवले जाऊ शकते, परिणामी त्याला 10 वर्षे तुरुंगवास आणि दंड होऊ शकतो.