टोमॅटोच्या सुरक्षेसाठी दोन बाऊन्सर तैनात; Video Viral…

वाराणसी (उत्तर प्रदेश): टोमॅटोचे दर गेल्या काही दिवसांपासून गगनाला भिडले आहेत. वाराणसीमध्ये एका दुकानदाराने टोमॅटोच्या सुरक्षेसाठी दोन बाऊन्सर ठेवले आहेत. संबंधित व्हिडिओ आणि छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी संबंधित व्हिडिओ शेअर केला आहे.

वाराणसीच्या लंका भागातील हा व्हिडीओ आहे. एका भाजी विक्रेत्याने टोमॅटोचा साठा सुरक्षित ठेवण्यासाठी दोन बाऊन्सर तैनात केले आहेत. अजय फौजी असे या विक्रेत्याचे नाव असून तो समाजवादी पक्षाचा कार्यकर्ता आहे. त्याने टोमॅटोचा साठा सुरक्षित ठेवण्यासाठी बाऊन्सर तैनात करण्याच्या त्याच्या कल्पनेची जोरदार चर्चा सुरु आहे.

अजय फौजी म्हणाले की, ‘बाऊन्सर तैनात केले आहेत, कारण टोमॅटोची दरवाढ तुम्ही पाहतच आहात. टोमॅटोसाठी मारामारी आणि लूटमार होत आहे. अशा घटना अनेक ठिकाणी घडल्या आहेत. आम्ही टोमॅटो मागवले आहेत. येथे मारामारी होऊ नये म्हणून आम्ही बाऊन्सर तैनात केले आहेत. टोमॅटोच्या वाढत्या किमतीमुळे टोमॅटो खरेदी करताना लोकांमध्ये जोरदार बाचाबाची झाल्याच्या चर्चा माझ्या कानावर आल्या होत्या. आमच्या दुकानात आलेल्या लोकांनीही तसाच प्रयत्न केला. त्यामुळे मी ठरवलं आता बास झालं, त्यानंतर मी माझ्या दुकानात बाऊन्सर तैनात करण्याचा निर्णय घेतला.”

फौजी पुढे म्हणाले की, या महिन्याच्या सुरुवातीला त्यांनी त्यांच्या दुकानात साध्या कपड्यांमध्ये बाउन्सर तैनात केले होते, परंतु जेव्हा टोमॅटो खरेदी करण्यासाठी आलेल्या ग्राहकांनी दरांवरुन बाचाबाची करण्याचा प्रयत्न केला तेव्हा गणवेशधारी बाऊन्सर तैनात केले. सध्या 140 ते 160 रुपये किलो दराने टोमॅटोची विक्री करत आहे. दुकानात तैनात असलेले दोन्ही बाऊन्सर सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत ड्युटीवर असतात. मात्र, त्यांना किती पगार दिला याची माहिती देण्यास त्यांनी नकार दिला. कोणतीही एजन्सी मोफत बाऊन्सर देणार नाही.’

‘जोपर्यंत माझ्याकडे टोमॅटोचा साठा आहे तोपर्यंत मी माझ्या दुकानात बाऊन्सर तैनात ठेवेन. ग्राहक दुकानात येतात, किंमत विचारतात. ते बाऊन्सर्सकडे पैसे देतात आणि त्यांच्याकडून माल घेतात. काही जण तर कुतूहलाने बाऊन्सर्सना पाहण्यासाठी दुकानातही येतात, कारण भाजीच्या दुकानात बाऊन्सर तैनात करणं ही त्यांच्यासाठी नवीन गोष्ट आहे,’ असेही फौजी म्हणाले.

दरम्यान, टोमॅटोच्या वाढलेल्या दरावरुन समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव भाजपला टोला लगावला आहे. अखिलेख यादव यांनी अजय फौजी यांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. ट्विटरवर व्हिडीओ शेअर करताना अखिलेश यादव यांनी लिहिले आहे की, “भाजपने टोमॅटोला ‘Z+’ सुरक्षा द्यावी.” तत्पूर्वी, 1 जुलै रोजी अखिलेश यादव यांच्या वाढदिवसानिमित्त, अजय फौजी आणि पक्षाच्या इतर कार्यकर्त्यांनी टोमॅटोच्या आकाराचा केक कापला होता आणि टोमॅटोचे वाढलेले भाव लक्षात घेऊन लोकांना टोमॅटो वाटले होते.’

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!