Live Reporting! पुणे शहरात मध्य रात्रीस चाले तरुणाईचा झिंगाट खेळ…
पुणे तिथे काय उणे
पुणे शहरात विविध ठिकाणांहून नोकरी शिक्षणाच्या निमित्ताने युवक-युवती आलेले आहेत. सध्या तरुणाई मोठ्या प्रमाणात नशेच्या आहारी केल्याचे वास्तव आहे. पुणे शहरातील मध्यवर्ती भागात मध्यरात्रीच्या सुमारास तरुणाई झिंगाट झाल्याचे पाहायला मिळाले. विशेषतः राजा बहादुर मिल, कोरेगाव पार्क आणि मुंढवा परिसरात असलेल्या विविध हॉटेलमध्ये नशेच्या आहारी गेल्याचे आणि भान हरपलेले युवक-युवती पाहायला मिळाल्या…
स्थळः पुणे शहरातील राजा बहादुर मिल, कोरेगाव पार्क, मुंढवा परिसर
दिनांकः ०८ जुलै २०२३
वेळः रात्री साडेबारा ते पहाटे चार
पुणे शहरामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये गुन्हेगारीने डोके वर काढले असून, गुन्हेगारांकडून थेट पोलिसांवरच हल्ला करण्यापर्यंत मजल गेली आहे. नागरिकांचे संरक्षण करणारे पोलिसच जर सुरक्षित नसतील तर सर्वसामान्य नागरिकांचे काय? हा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. गुन्हेगारीने डोके वर काढण्यामागे विविध कारणे असू शकतात. पण, गुन्हेगारांवर वचक ठेवायचा असेल तर पोलिसांचा धाक असायलाच हवा.
पुणे शहर आणि परिसरामध्ये विविध ठिकाणांहून युवक-युवती शिक्षणासाठी, नोकरीसाठी आलेल्या आहेत. श्रीमंत घराण्यातील मुले ते आयटी कंपनीमध्ये नोकरी करणारे युवक-युवतींचे वास्तव्य पुणे शहरात आहे. नशेच्या आहारी गेलेल्यांचा आवडता दिवस म्हणजे शुक्रवार-शनिवारची रात्र. पबमध्ये जाऊन नशेच्या आहारी जातात. आपण शु्द्धीवर आहोत की नाही, याचे साधे भानही त्यांना नसते. यामधूनच विनयभंग, बलात्कार, मारामारी, अपघाताच्या घटना घडताना दिसत आहेत.
राजा बहादूर मिल परिसर…
राजा बहादूर मिल परिसरामध्ये विविध पब आहेत. या पबमध्ये तरुणाई झिंगाट झालेली पाहायला मिळाली. युवतींचे तोडके कपडे, नशा केल्यामुळे भान हरपलेले. हातात सिगारेट आणि स्वतःचा तोलही न सांभाळता येणारी तरुणाई पाहायला मिळाली. मोटारींमध्ये बसलेले कपल आणि त्यांचे अश्लिल चाळे सुरू होते. शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुणे शहरात सध्या ही वास्तव परिस्थिती आहे. नशेच्या आहारी गेलेल्या तरुणाईला पोलिसांचा धाक राहिलेला नाही. पोलिसांनी पकडलेच तर आर्थिक तडजोड करून सुटका करून निघून जाताता, अशी माहिती नाव न सांगण्याच्या अटीवर एका कर्मचाऱ्याने दिली.
पहाटेपर्यंतची झिंग…
विविध पबमध्ये तरुणाई येते. पबचे मोठ-मोठे दर आहेत. यामुळे सर्वसामान्य कुटुंबातील कोणीही दिसत नाही. तोडके कपडे घालून आलेल्या युवती आणि त्यांचा मित्र परिवार नशेत डुबून जातो. पबमध्ये जेवणाबरोबरच मद्य आणि नृत्य सुरू असते. कष्टाचा पैसा नसल्यामुळे जस-जशी रात्र होऊ लागते तसतशी यांची नशा चढू लागते. पहाटेपर्यंत यांचा खेळ चालतो. जी-२० मुळे पब वेळेच्या नियमानुसार बंद होऊ लागले आहेत. पण, राजा बहादुर परिसरातील पब हे गेल्या महिन्यांपर्यंत पहाटेपर्यंत सुरू होते. पोलिसांसोबत लागेबांधे असल्याशिवाय हे शक्य नाही, असे एका कर्मचाऱ्याने सांगितले.
सामाजिक सुरक्षा विभाग…
राजा बहादूर मिल परिसरामध्ये सामाजिक सुरक्षा विभागाचे पथक दिसले. पथकाकडे चौकशी केल्यानंतर पुणे शहरात यावेळी कुठेच काही सुरू नसल्याचे सांगितले. शिवाय, आम्ही नुकताच फेरफटका मारून आल्याचेही त्यांनी सांगितले. सर्व काही बंद असल्याचे छातीठोकपणे सांगितले. पण, मनात शंकेची पाल चुकचुकली होती. राजा बहादूर मिल परिसरानंतर कोरेगाव पार्क परिसरात जाण्याचे ठरवले.
कोरेगाव पार्क…
कोरेगाव पार्क परिसरात विविध हॉटेल्स, पब पाहायला मिळाले. सामाजिक सुरक्षा विभागाने सांगितलेला विश्वास काही प्रमाणात खोटा ठरला. मध्यरात्री दोनच्या सुमारास काही पब सुरू होते. पबच्या बाहेर मोटारींची मोठी गर्दी होती. यावरूनच अंदाज आला होता. राजा बहादूर मिल परिसराप्रमाणेच तरुणाई झिंगाट झाली होती. दारू, सिगारेट आणि हुक्काचे मोठ्या प्रमाणात सेवन केले जात होते.
मुंढवा…
मुंढवा परिसरातही पब रात्री अडीच-तीन पर्यंत सुरू होते. तरुणाईचे अश्लिल चाळे सुरू होते. मोठ्या प्रमाणात युवक-युवती बाहेर पडताना दिसत होते. पण, त्यांना कसलेही भान राहिले नव्हते. पबमधून बाहेर पडल्यानंतर रस्त्यांवरही त्यांचे अश्लिल चाळे सुरू होते. मोटारीत बसल्यानंतर मोटारी रेस करून आवाज वाढवणे. वेगाने मोटारी चालवणे सुरू होते. मोठ्या साहेबांचे हे पब आहेत, त्यामुळे पोलिस काही करत नाहीत, असेही ऐकायला मिळाले.
पोलिसांची नाकेबंदी…
कोरेगाव पार्क परिसरात पोलिसांनी नाकेबंदी केली होती. पोलिस मोटारी थांबवून कारवाई करत होते. पण, कायदे तेवढ्या पळवाटा म्हणतात तशा पळवाटा झिंगाट तरुणाईने शोधल्याचे पाहायला मिळाले. झिंगाट तरुणाई स्वतःच्या मोटारीमधून जाण्याऐवजी रिक्षा, ओला-उबेरच्या मोटारींचा वापर करताना पाहायला मिळाल्या. यामुळे कारवाईच्या जाळ्यातून ते अलगद सुटताना पाहायला मिळाले.
आर्थिक देवाण-घेवाण…
पुणे शहरातील पब उशिरापर्यंत चालू राहण्याचे प्रमुख कारण म्हणजे आर्थिक देवाण-घेवाण. याशिवाय शक्य नाही. हॉटेल, मद्याची दुकाने, पब किती वाजेपर्यंत सुरू असावीत याबाबतची नियमावली आहे. पण, किती जण हे नियम पाळत आहेत, याबद्दल शंका आहे. मोठी दुर्घटना घडण्यापूर्वीच पोलिसांनी कारवाईचे धोरण आवलंबायला हवे, अथन्या वेळ निघून गेल्यावर हाती काही राहात नाही.
(क्रमशः)
– संतोष धायबर, संदीप कद्रे
editor@policekaka.com
Live Reporting! पुणे शहरात मध्य रात्रीस चाले तरुणाईचा झिंगाट खेळ…https://t.co/Yw3PcTCZHi@PuneCityPolice @PuneCityTraffic @CPPuneCity @AjitPawarSpeaks @Dev_Fadnavis @PMCPune @CMOMaharashtra @SantoshDhaybar pic.twitter.com/tv7mq84l4T
— policekaka News (@policekaka) July 10, 2023