
पुणे शहरात पालखी सोहळ्यात चोरट्यांचा धुमाकूळ; खाजेची पावडर टाकायचे अन्…
पुणे: संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यादरम्यान चोरट्यांनी धुमाकूळ घातला. पालखी सोहळ्यातील गर्दीचा फायदा उठवत चोरट्यांच्या टोळीने वारकऱ्यांना लुटले आहे. एका वयोवृद्ध वारकऱ्याच्या अंगावर चक्क खाज येणारी पावडर टाकून, मदतीचा बहाणा करत त्यांचे पैसे लुटल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यानंतर वृद्ध वारकऱ्याला भर वारीत अश्रू अनावर झाले होते.
किसन काळे हे वयोवृद्ध वारकरी पालखी सोहळ्यात सहभागी झाले होते. ते अंघोळ करत असताना एका चोरट्याने त्यांच्या अंगावर तीव्र खाज येणारी केमिकल पावडर टाकली. काही क्षणांतच काळे यांच्या अंगाला खाज सुटली. त्या माऊलीला त्रासात पाहून तिथे उपस्थित असलेल्या चोरट्याने मदतीचा मोठा आव आणला. काळे हे स्वतःचा जीव वाचवण्याच्या गोंधळात असताना, याच संधीचा फायदा घेऊन चोरट्याने त्यांच्या खिशातील ५ हजार रुपयांची रोकड लंपास केली आणि गर्दीत पसार झाला. खाज शमल्यानंतर पैसे चोरीला गेल्याचे लक्षात येताच काळे यांना प्रचंड धक्का बसला आणि वारीच्या वाटेवरच त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले.
View this post on Instagram
वारकऱ्यांना लुटण्याची ही एकमेव घटना नाही. दुसऱ्या एका घटनेत रुक्मिणीबाई बोबडे या महिला वारकरी अंघोळीसाठी गेल्या असताना चोरट्यांनी त्यांच्या साहित्यावर पाळत ठेवली. त्या अंघोळ करत असताना चोरांनी त्यांचे कपडे आणि सामानाजवळ ठेवलेला मोबाईल आणि रोकड घेऊन पोबारा केला. वारीदरम्यान एक ना अनेक घटना घडल्या आहेत. एका घटनेत ओंकार जोशी यांनी एका चोरट्याला रंगेहाथ पकडले. श्री. जोशी यांनी चार शब्द सुनावताच चोरट्याने धूम ठोकली. पालखी सोहळ्यात गर्दीचा गैरफायदा घेऊन चोरटे वारकऱ्यांच्या साहित्यावर आणि पैशांवर मोठ्या प्रमाणात डल्ला मारल्याचे उघड झाले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वारीच्या काळात पुण्यातील विविध पोलिस ठाण्यांमध्ये चोरीचे गुन्हे दाखल झाले आहेत. यात समर्थ पोलिस ठाण्यात २, शिवाजीनगर पोलिस ठाण्यात १ आणि स्वारगेट पोलिस ठाण्यात एक गुन्हा दाखल झाला आहे. याशिवाय अनेक वारकऱ्यांचे मोबाईल, रोकड आणि इतर मौल्यवान वस्तू चोरीला गेल्याच्या तोंडी तक्रारीही आल्या आहेत. या वाढत्या चोऱ्यांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सर्व वारकऱ्यांना आवाहन केले आहे की, त्यांनी वारीत चालताना आपल्या मौल्यवान वस्तूंची विशेष काळजी घ्यावी. तसेच, गर्दीच्या ठिकाणी कोणाचीही संशयास्पद हालचाल दिसल्यास तात्काळ जवळच्या पोलिस कर्मचाऱ्याला किंवा नियंत्रण कक्षाला माहिती द्यावी.
पुणे! सियाची लाय डिटेक्टर टेस्ट नाकारली; जामिनाचा मार्ग मोकळा…
पुणे! जेसीबी मालकाने मजुरांना तोंड उघडल्यास गंभीर परिणामाची दिली धमकी अन् पोलिसांनी…
पुण्याचा ‘धडाकेबाज गन मॅन’ निर्दोष; खोट्या तक्रारींचे षड्यंत्र अखेर उधळले…
Cyber Crime! नात्याचा मुखवटा घालून आला आणि घात केला…

