
फ्लायदुबईच्या सहवैमानिकाने जुलैमध्येच आखली होती इस्राएलवर हल्ल्याची योजना…
अबू धाबी: तेल अवीवला जाणारे विमान पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या फ्लायदुबईच्या सहवैमानिकाने इस्रायलच्या बेन गुरियन विमानतळावर, विमान धडकवण्याची योजना आखली होती. अटकेत असलेल्या ओमानचा दहशतवादी सहवैमानिक हमाम अल-हम्मामी याने संयुक्त अरब अमिरातीच्या तपास अधिकाऱ्यांना सांगितले.
दरम्यान, विमानाचे कॅप्टन स्मित मच्छार यांची हत्या करून, संशय निर्माण होऊ न देता विमान उतरविण्यासाठी सर्व आवश्यक परवानग्या मिळवायच्या आणि फ्लायदुबई फ्लाइट १०७३ नेहमीप्रमाणे एकट्याने पुढे नेत इस्राएलच्या बेन गुरियन विमानतळावर ९/११ सारखा हल्ला करण्याची योजना होती. विमानतळावरील एखाद्या इमारतीवर किंवा एखाद्या थांबलेल्या विमानाला धडकवडण्याचा त्याचा इरादा होता, असे इस्रायलच्या हिब्रू माध्यमांनी दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.
सूत्रांच्या हवाल्याने ‘वायनेट’ या इस्राएली वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे, की अल-हम्मामीने तपास अधिकाऱ्यांना सांगितले की, आपली योजना प्रत्यक्षात आणण्यासाठी, विमान इस्राएलच्या दिशेने येत असताना त्याने विमान जॉर्डनच्या हवाई हद्दीत असताना मच्छारवर हल्ला केला.
कॅप्टन मच्छार यांच्यावर हल्ला करताना काय घडते आहे हे कोणाच्याही लक्षात येणार नाही आणि त्यांना सावध करण्याची किंवा त्याची योजना पार पाडण्यापासून रोखण्याची संधी कोणालाही मिळणार नाही, असा अल-हम्मामीचा विश्वास होता. विमानतळावरील हल्ला यशस्वी झाला नसता, तर त्याने तेल अवीवमधील एखाद्या गगनचुंबी इमारतीवर किंवा जॉर्डनमधील अमेरिकेच्या लष्करी तळांपैकी एकावर विमान आदळवले असते, असेही वृत्त आहे.
भारतीय वैमानिकाने जखमी असूनही प्रतिकार करत संकटाचे संकेत पाठवले आणि कॉकपिटचा दरवाजा उघडला, ज्यामुळे त्याची योजना अयशस्वी ठरली. यामुळे विमानातील कर्मचारी आणि प्रवाशांना सहवैमानिकाला ताब्यात घेऊन विमानाचा ताबा परत मिळवता आला. त्यानंतर, कर्तव्यावर नसलेल्या दोन वैमानिकांनी ते विमान सौदी अरेबियामध्ये सुरक्षितपणे उतरवले.
गेल्या आठवड्यात, अबू धाबी येथील रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कॅप्टन मच्छार यांनी इस्राएलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांना सांगितले की, अल-हम्मामीने त्यांच्या डोक्यावर कॉकपिटमधील कुऱ्हाडीने प्रहार करण्याच्या काही मिनिटे आधी त्याने नमाज पढण्यासाठी वेळ द्यावा अशी विनंती केली होती.
सूत्रांनी इस्राएलच्या चॅनल १२ ला सांगितले की, अल-हम्मामीचा सुरुवातीला जुलैमध्ये आपली योजना अंमलात आणण्याचा इरादा होता, परंतु तो क्रू सदस्यांपैकी एक जण त्याचा मित्र असल्याने, त्याला शेवटच्या क्षणी आपली मोहीम पुढे ढकलावी लागली.
अहवालानुसार, फ्लायदुबईमध्ये सामील झाल्यापासून अल-हम्मामी गेल्या काही महिन्यांत अनेक वेळा बेन गुरियन विमानतळावर गेला होता. त्याने तपास अधिकाऱ्यांना सांगितले की, जूनमध्ये इस्राएलच्या दौऱ्यादरम्यान त्याने गुप्त माहिती गोळा करणे आणि आपल्या हल्ल्याचे नियोजन करण्यावर आपले संपूर्ण लक्ष केंद्रित केले होते.
चॅनल १३ च्या एका अहवालानुसार, इस्रायल आणि संयुक्त अरब अमिराती दरम्यान विमानसेवा चालवणाऱ्या फ्लायदुबई या कमी खर्चाच्या अमिराती एअरलाइनमध्ये सामील होण्यापूर्वीच ओमानच्या सहवैमानिकाने या हल्ल्याचे नियोजन केले होते .
तेल अवीवला कोणती एअरलाइन जाते हे आपण तपासले. म्हणूनच फ्लायदुबईची निवड केली. आपली निवड होण्यापूर्वीच हे नियोजन केले होते, असे त्याने तपास अधिकाऱ्यांना सांगितले.
इटालियन वृत्तपत्र ‘कॉरिअर डेला सेरा’ने वृत्त दिले की, कॅप्टन मच्छार यांच्यावर हल्ला केल्यानंतर, अल-हम्मामीने विमानाची इंजिने बंद केली आणि सुकाणू पुढे ढकलले, ज्यामुळे विमान एका मिनिटापेक्षा कमी वेळात १६ हजार फूट खाली आले आणि जवळजवळ ध्वनीचा वेग गाठला.
फ्लायदुबई घटनेची चौकशी सुरू असताना, प्राथमिक तपशिलातून अनेक मोठ्या सुरक्षा त्रुटी समोर आल्या आहेत. अधिकाऱ्यांनी आधीच सांगितले आहे की, त्या ओमानच्या सहवैमानिकाच्या अतिरेकी विचारांबद्दलच्या चिंतेमुळे त्याच्याच देशाने त्याच्यावर विमान उडवण्यावर बंदी घातली होती.
इस्रायलशी कोणतेही राजनैतिक संबंध नसलेल्या ओमानसारख्या अरब देशाच्या नागरिकाला विमानातून इस्राएली नागरिकांना तेल अवीवला घेऊन जाण्याची परवानगी कशी देण्यात आली, हे देखील अस्पष्ट आहे.
अल हम्मामी (वय २९) हा ओमानचा नागरिक असून, त्याचे वडील ओमानचे आणि आई सीरियाची आहे. गृहयुद्धाच्या काळात तो सीरियामध्ये राहात होता आणि त्याने अल-कायदाच्या समर्थनार्थ ऑनलाइन संदेश पोस्ट केल्याचे वृत्त आहे.
फ्लायदुबईला ओमानच्या वैमानिकाला सुरक्षेसाठी धोकादायक म्हणून ओळखण्यात अपयश कसे आले, हे देखील अस्पष्ट आहे. प्रादेशिक अधिकाऱ्यांनी असोसिएटेड प्रेसला सांगितले की, संयुक्त अरब अमिरातीच्या अधिकाऱ्यांनी प्रवासी आणि कर्मचाऱ्यांविषयी, त्यांच्या राष्ट्रीयत्वांसहित, माहिती दिली होती.

