
‘वर्षा’ बंगल्यावर नेऊन विश्वास संपादन केला अन् घातला तीन कोटींना गंडा; शिवाय…
मुंबई : राज्याच्या तत्कालीन मुख्यमंत्री कार्यालयात अधिकारी असल्याची बतावणी करून एकाने आपल्या साथीदारांच्या मदतीने झवेरी बाजारातील एका व्यापाऱ्याला तब्बल तीन कोटी रुपयांना गंडवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आरोपीने तक्रारदाराचा विश्वास जिंकण्यासाठी पिवळा दिवा लावलेल्या कारचा वापर केला आणि त्याला थेट मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ बंगल्याच्या बाहेरपर्यंत घेऊन गेल्याची माहिती समोर आली आहे.
व्यापारी शैलेश जैन यांनी एलटी मार्ग पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली आहे. जैन यांच्यासोबत नियमित व्यवहार करणाऱ्या बिरजू नावाच्या दलालाने त्यांची ओळख आरोपी वैभव ठाकर याच्याशी करून दिली. वैभवने आपण ‘वर्षा’ बंगल्यावर अधिकारी असल्याचे भासवले आणि जैन यांना त्यांच्या कामात मदत करण्याचे आश्वासन देऊन जाळ्यात ओढले.

विश्वास संपादन करण्यासाठी वैभव हा पिवळा दिवा असलेल्या कारमधून यायचा. एका वेळी त्याने जैन यांना आपल्या कारमधून मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’ बंगल्यावर नेले. मात्र, मुख्यमंत्री सध्या बंगल्यावर उपस्थित नसल्याचे कारण देत त्यांना बाहेरूनच यू-टर्न घेऊन परत आणले. या बनावमुळे जैन यांना तो मोठा अधिकारी असल्याचे वाटले.
विश्वास संपादन झाल्यानंतर वैभवने विविध कारणे देत जैन यांच्याकडून पैसे उकळण्यास सुरुवात केली. त्याने कस्टम विभागात जप्त केलेले सोने सात टक्के सवलतीच्या दरात उपलब्ध करून देतो, असे सांगितले. आपली पत्नी आणि सासू सोन्या-चांदीचे दागिने, हिऱ्यांची ऑनलाइन विक्री करतात, असे सांगून त्याने जैन यांच्याकडून अनुक्रमे १.१५ कोटी रुपये आणि १.३५ कोटी रुपये किमतीचे दागिने खरेदी केले. मात्र, ठरलेली कामे पूर्ण न करता त्याने पैसे परत देण्यास टाळाटाळ सुरू केली.
जैन यांनी पैशांसाठी तगादा लावल्यानंतर वैभवने त्यांना धमकावण्यास सुरुवात केली. एका राजकीय पक्षाच्या कार्यालयात जाऊन एका पदाधिकाऱ्याच्या उपस्थितीत जैन आणि त्यांच्या मुलाला धमकावले, असेही तक्रारीत नमूद आहे. जैन यांनी जेव्हा वैभवविरोधात पोलिसांत तक्रार करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा वैभवने उलट त्यांनाच डीआरआयकडे (DRI) तक्रार करून अडचणीत आणले. वैभवच्या तक्रारीच्या आधारे जैन यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आणि त्यांना दीड महिना तुरुंगात राहावे लागले होते. या प्रकरणात जामिनावर बाहेर आल्यानंतर जैन यांनी पुन्हा पोलिसांत धाव घेतली आणि तक्रार नोंदवली. या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी वैभव ठाकर, त्याची पत्नी, सासू आणि दलाल बिरजू या चार जणांविरुद्ध एलटी मार्ग पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
मुंबईच्या नवरदेवाच्या मानेत लग्न सुरु असतानाच बिहारमध्ये घातली गोळी…
मुंबईच्या पवई भागात 17 मुलांना ओलीस ठेवणाऱ्याचा एन्काऊंटर…
शीतल तेजवानी प्रकरणात सरकारी वकिलांचा कोर्टात मोठा युक्तीवाद…
तोतया IAS महिला अधिकाऱ्याचे चक्रावणारे कारनामे; राजकीय नेत्यांना…
महिला पोलिस कॉन्स्टेबलमुळे फूटपाथवर झाली सुखरुप प्रसुती…

