
पोलिस कर्मचाऱ्याला म्हणाला दोन दिवसांत बघून घेतो अन् रस्त्यावरच झोपला…
छत्रपती संभाजीनगर : पोलिस कर्मचारी वाहतूकीचे नियंत्रण करत असताना मद्यधुंद दुचाकी चालकाने कानशिलात लगावल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. त्याने पत्नीलाही घटनास्थळी बोलवून धिंगाणा घातला. शिवीगाळ करत तुला दोन दिवसात बघून घेतो असे म्हणत पोलिसाच्या अंगावर हात उचलला. रस्त्यावर जाऊन झोपला. या सगळ्या प्रकारानंतर पती-पत्नीच्या विरोधात पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सोमनाथ मुरलीधर गिरी असे गुन्हा झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
पोलिस कर्मचारी संतोष खरात हे हायकोर्ट सिग्नल परिसरात वाहतूक नियमनासाठी ड्युटीवर होते. यावेळी सोमनाथ गिरी हा दुचाकीने डिव्हायडरजवळून वाहन चालवत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. संशय आल्याने खरात यांनी त्याला थांबवून चौकशी केली. तपासणीदरम्यान तो मद्यधुंद अवस्थेत असल्याचे उघड झाले. यानंतर सोमनाथने पोलिसांशी हुज्जत घालत शिवीगाळ सुरू केली.

वाद वाढताच सोमनाथने “तुम्हाला दोन दिवसांत बघून घेतो” अशी धमकी देत संतोष खरात यांच्या अंगावर हात उचलला. इतक्यावर न थांबता त्याने आपल्या पत्नीला घटनास्थळी बोलावून घेतले. पत्नी आल्यानंतर दोघांनी मिळून पोलिस कर्मचाऱ्याशी जोरदार वाद घालत शिवीगाळ केली आणि चापट मारली.
दरम्यान, सोमनाथ हा रस्त्यावर जाऊन झोपल्याने काही काळ वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. परिस्थिती बिघडत असल्याचे लक्षात येताच नियंत्रण कक्षाला माहिती देण्यात आली. त्यानंतर पुंडलिकनगर पोलिस आणि दामिनी पथक घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिकांनीही पती-पत्नीला समजावण्याचा प्रयत्न केला. शेवटी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात आणले. या प्रकरणी संबंधित पती-पत्नीविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.
पुणे! पेट्रोलिंग करणाऱ्या पोलिसांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण…
वाहतूक पोलिसांना जमिनीवर पाडून लाथाबुक्यांनी मारहाण…
पुणे शहरात भररस्त्यात पोलिसाला युवकाने केली मारहाण…
पुणे शहरात गाडी अडवली म्हणून दोघांची पोलिसाला जबर मारहाण…

