बनावट नोटा बनविणाऱ्या टोळीचा बनावट नाण्यांची अवैध टांकसाळ; सहारनपूरमध्ये टोळी जेरबंद…

सहारनपूरः बनावट नोटा तयार करून त्या चलनात आणणाऱ्या हरियाणातील सहारनपूर येथील एका टोळीने नाणी पाडण्याची अवैध टांकसाळ सुरू केली होती. नाण्यांची टंचाई लक्षात घेऊन त्यांनी ही नवी शक्कल लढविली, परंतु हा व्यवहार टोळीसाठी आतबट्ट्याचा ठरला आहे. टोळीचा म्होरक्या उपकार लुथरा याने कारस्थानाचे जाळे अधिक पसरविण्यासाठी तरुणांना कमिशन देण्याचा मार्ग अवलंबिला होता. मात्र, पोलिसांनी मागोवा घेऊन या टोळीच्या सदस्यांना अटक केली आहे.

पोलिसांच्या तपासात असे उघड झाले आहे की, टोळीतील सदस्य तरुणांना बनावट नाण्यांचा साठा पुरवत आणि ती बाजारात चलनात आणण्याचे काम त्यांच्यावर सोपवत. त्या बदल्यात, त्यांना बनावट नाण्यांच्या मूल्यावर आधारित कमिशन दिले जात असे. तरुणांना ४,००० रुपयांची बनावट नाणी चलनात आणण्यासाठी ४०० रुपये कमिशन दिले जात होते. सहज कमाईच्या अमिषाला बळी पडून अनेक तरुण या टोळीत सामील झाले आणि हळूहळू बनावट नाण्यांच्या विक्रीचे जाळे विस्तारले.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, या टोळीचा उद्देश केवळ स्थानिक पातळीवर बनावट नाणी चलनात आणणे हाच नव्हता, तर विविध राज्यांमध्ये आपले जाळे प्रस्थापित करणे हाही होता. या टोळीतील बहुतेक सदस्य ३० ते ४० वयोगटातील असल्याचे सांगितले जाते.

पोलिसांचा तपास जसजसा पुढे जाईल, तसतसे टोळीतील इतर सदस्य आणि त्यांच्या नेटवर्कबद्दल महत्त्वपूर्ण खुलासे समोर येण्याची शक्यता आहे. बनावट नाण्यांची पुरवठा साखळी तोडण्यावर आणि कमिशनच्या अमिषाने या अवैध व्यापारात ओढल्या गेलेल्या तरुणांपर्यंत पोचण्यावर अधिकाऱ्यांचे लक्ष केंद्रित आहे.

बनावट नाणी बनवणाऱ्या आरोपी उपकार लुथराने हरियाणाच्या सोनीपत जिल्ह्यातील राय येथे आपला कारखाना उभारला होता. ९ सप्टेंबर रोजी, त्याच्या टोळीतील सदस्य पारस याला दिल्ली पोलिसांनी बनावट नाण्यांसह अटक केली. पारसच्या अटकेच्या भीतीने आरोपी उपकार लुथराने आपला कारखाना टिट्रो परिसरात हलवण्याची योजना आखली होती.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!