गणेश मिरवणुकीत कंटेनर शिरल्याने छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन गणेशभक्तांचा मृत्यू…

छत्रपती संभाजीनगरः गणेश मिरवणुकीत कंटेनर घुसून झालेल्या दुर्दैवी अपघातात, दोन गणेश भक्तांचा मृत्यू झाला आहे. चितेपिंपळगाव-कर्माड मार्गावरील पिंप्रिराजा गावाजवळ अपघातातची ही भीषण घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले. या अपघातात सात वर्षांच्या चिमुकल्यासह अन्य १२ जण जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

पिंप्रीराजा गावाजवळ ही मिरवणूक रस्त्याने जात असताना अचानक कंटेनर त्यात घुसला. या अपघातात विठ्ठल रामभाऊ जाधव (४९) आणि रमेश लहूजी बनसोडे (४५) या दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. तर सात वर्षांच्या चिमुकल्यासह १२ जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर इतरांवर उपचार चालू आहेत. या दुर्घटनेत चिमुकल्यासह दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे माहिती आहे. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. गणपती आनंदाच्या वातावरणात जमलेल्या भाविकांवर अचानक दुःखाचा डोंगर कोसळला आहे. विठ्ठल जाधव शेतातील काम संपवून घरी परत जात होते.

मिरवणूक पाहण्यासाठी हे सर्वजण रस्त्याच्या कडेला थांबले होते. त्याचवेळी भरधाव कंटेनर त्यांच्या अंगावर आला. विठ्ठल जाधव यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, २२ वर्षांची मुलगी, आई-वडील आणि भाऊ असा परिवार आहे. रमेश बनसोडे हेदेखिल शेतकरी होते. काम आटोपून घरी परतताना मिरवणूक पाहण्यासाठी थांबले होते. कंटेनर मिरवणुकीत घुसल्याने त्यांनाही गंभीर दुखापत झाली आणि त्यातच त्यांचे निधन झाले. जखमींपैकी काहींना प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारांसाठी घाटी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. जखमींमध्ये रमेश बनसोडे, मेहबूब पठाण, प्रकाश पाटरे आणि किशोर घुले यांचा समावेश आहे.

दरम्यान, मिरवणुकीत घुसल्यानंतरही काही अंतरापर्यंत कंटेनर गर्दीत पुढे गेल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या घटनेनंतर गावावर शोककळा पसरली असून, गणेशोत्सवावर दुःखाचे सावट पडले आहे. पोलिसांकडून पुढील तपास चालू आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!