
जळगाव! आंतरराष्ट्रीय बनावट कॉल सेंटरचा पोलिसांनी केला पर्दाफाश…
जळगाव: माजी महापौर ललित कोल्हे यांच्या मालकीच्या एल के फार्महाऊसवर सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय बनावट कॉल सेंटरचा जळगाव पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या ठिकाणाहून परदेशातील (अमेरिका, कॅनडा व युरोपातील) नागरिकांना फोन करून हजारो डॉलरची ऑनलाइन फसवणूक केली जात होती.
या टोळीचे नेटवर्क देशपातळीवर असून, या माध्यमातून मिळणारी फसवणुकीची रक्कम प्रथम क्रिप्टोकरन्सीमध्ये रूपांतरित केली जायची आणि त्यानंतर हवालामार्फत भारतात पाठवली जात होती. दिल्ली येथून मिळालेल्या माहितीवरून ही कारवाई करण्यात आली असून, यामध्ये देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय सायबर गुन्ह्यांचा समावेश असल्याचे स्पष्ट झाले आहे. ललित कोल्हे हे शिवसेना शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांचे निकटवर्तीय मानले जातात.
ममुराबाद येथील कॉल सेंटरमध्ये ‘व्हीपीएन’च्या माध्यमातून एक आयपी पोर्टल लॉग इन करून, अॅमेझॉनच्या ग्राहकांचा डेटा मिळवला जात होता. त्यानंतर ‘एक्सलाइट’ या कॉलिंग अॅपच्या सहाय्याने विदेशातील ग्राहकांना कॉल करून, त्यांच्या खात्यांमध्ये काहीतरी अडचण आहे, असे सांगून फसवले जात होते. यामध्ये भारताचा कंट्री कोड दिसत नसे, त्यामुळे फसवणूक लक्षात येणे कठीण होते. या कॉल सेंटरमध्ये महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि राजस्थान येथून आणलेले कर्मचारी काम करत होते.
अमेरिका व कॅनडामधील वेळेनुसार कॉलिंग चालू राहावे, यासाठी रात्री ७ ते पहाटे ३ पर्यंत कॉलिंग चालायचे. ही संपूर्ण यंत्रणा संगणकीय तंत्रज्ञानाच्या साहाय्याने चालवली जात होती. या कॉल सेंटरचे मुख्य व्यवस्थापन राकेश आगारिया व नरेंद्र आगारिया या दोघांकडे होती. त्यांच्याकडे ललित कोल्हे यांच्या एल.के. फार्मवर रेकीचेही काम होते. या दोघांचा ललित कोल्हे यांच्याशी घनिष्ठ संबंध असल्याचेही तपासात समोर आले आहे.
जळगाव सायबर पोलिस ठाण्याचे पो.उ.नि. मुस्तफा बेग हिसाबेक मिर्झा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ११ जणांविरोधात विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यात राकेश चंदू आगारिया (रा. वाघ नगर, जळगाव), ललित कोल्हे (रा. कोल्हे नगर), नरेंद्र चंदू आगारिया (रा. वाघ नगर), आदिल सैय्यद (मालाड, मुंबई), इम्रान खान (कांदीवली, मुंबई), मोहम्मद जिशान, शाहबाज आलम, साकीब आलम, मोहम्मद हाशिर (सर्व हावडा, पश्चिम बंगाल), तसेच ‘अकबर’ व ‘ऋषी’ (पूर्ण नाव माहित नाही)
दरम्यान, न्यायालयाने आरोपींना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. जळगावमधील ही कारवाई आंतरराष्ट्रीय सायबर गुन्हेगारीचं एक मोठं रॅकेट असल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
मोठा निर्णय! बिश्नोई गँग दहशतवादी संघटना म्हणून घोषित…
कुख्यात गुंड निलेश घायवळ याचे लोकेशन सापडलं! लंडनमध्ये नव्हे तर…
वैष्णवी हगवणे प्रकरण! आरोपींचा जामीन फेटाळताना न्यायालयाने म्हटले की…
विद्यार्थीनींचे लैंगिक शोषण करणाऱ्या बाबा चैतन्यनंदच्या आवळल्या मुसक्या…
Video: अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी, 33 जणांचा श्वास गुदमरून मृत्यू…

