मणिपूर विवस्त्र धिंड आणि सामूहिक बलात्कार पीडिता कारगील हीरोची पत्नी…

इंफाळ: मणिपूरमध्ये दोन महिलांची विवस्त्र धिंड काढून त्यांच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. यामधील एक पीडिता कारगील युद्धातील हीरोची पत्नी असल्याचे समोर आले आहे.

युद्धात देशासाठी लढलो, पण माझ्या पत्नीची अब्रू वाचवू शकलो नाही. कारगिलच्या युद्धापेक्षाही हे युद्ध मला भयंकर वाटतेय, अशा शब्दांत पीडितेचा पती आणि कारगिल युद्धातील हीरोने आपली वेदना मांडली. माझे सर्वस्व उद्ध्वस्त झाले आहे, असा आक्रोश करत या निवृत्त जवानाने भीषण प्रसंग कथन केला. 4 मे रोजी हजारोंचा जमाव आमच्या गावात आला. या जमावाने गावातील घरे पेटवून देण्यास सुरुवात केली. अख्खे गाव भयभीत झाले होते. जिवाच्या आकांताने पळत होते. त्यात माझी पत्नीही होती. आमची ताटातूट झाली. जवळच्या जंगलात पत्नीने आसरा घेतला. हल्लेखोर तीथपर्यंत पोहचले. त्यांनी माझ्या पत्नीसह अनेकांना पकडले. त्यांचा प्रतिकार करणाऱया वडिलांना आणि भावाला मारण्यात आले. पत्नीसोबत एक अन्य महिला, मूल आणि एका कुटुंबातील तीन सदस्य होते. पोलिसांना न जुमानता जमावाने अमानुष कृत्य केले.

माझ्या पत्नीसह तीन महिलांना बंदुकीचा धाक दाखवून कपडे उतरवण्यास भाग पाडले. त्यानंतर त्यांची विवस्त्र धिंड काढण्यात आली. त्या अवस्थेत त्यांना नाचायला लावले. मी काही अंतरावर होतो, पण काहीच करू शकत नव्हतो. हतबल होतो. दोन ते तीन तास या महिला जमावाच्या कब्जात होत्या. त्यांच्यावर भयंकर अत्याचार केले गेले. त्यानंतर रात्री उशिरा नागा गावात माझ्या पत्नीला सोडून देण्यात आले, असे सांगत या जवानाने आपला संताप व्यक्त केला. माझी पत्नी या सगळ्या प्रकाराने हादरली आहे, असे या जवानाने सांगितले.

दरम्यान, मणिपूरच्या घटनेवर देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. राज्य आणि केंद्र सरकारविरोधात नागरिक रस्त्यावर उतरली आहे. दुसरीकडे मणिपूर भाजपचे मुख्यमंत्री बीरेंद्र सिंह हे मात्र मी राजीनामा देणार नाही, असे सांगत आहेत. माझ्या राजीनाम्यापेक्षा आता मणिपूरची शांतता महत्त्वाची आहे, असे ते म्हणाले.

पश्चिम बंगालच्या हिंसाचारावर प्रश्न विचारले जातात, पण आज मणिपूरसह संपूर्ण देश जळत आहे. लेकींना पेटवून दिलं जात आहे. त्यांची अब्रू लुटली जात आहे. दलित, अल्पसंख्याकांवर अत्याचार सुरू आहेत. पंतप्रधान मोदींना याचे जराही दुःख होत नाहीय का? तुम्ही ‘बेटी बचाव’चा नारा दिला होता त्याचे काय झाले, असा खरमरीत सवाल करतानाच देशातील याच महिला तुम्हाला राजकारणातून हद्दपार करतील, अशी टीका पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मोदी सरकारवर केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!