पुणे पोलिसांनी वेळीच काळजी घेतली असती तर दोन जीव नक्कीच वाचले असते…

पुणेः पत्रकार संतोष धायबर यांनी ‘पुणे पोलिसांनी वेळीच काळजी घेतली असती तर दोन जीव नक्कीच वाचले असते…’ या शिर्षकाखाली एक लेख लिहीला आहे. संबंधित लेख मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, नेटिझन्स प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होत आहे. संबंधित लेख जसाची तसा पुढील प्रमाणे…

पुणे पोलिसांनी वेळीच काळजी घेतली असती तर दोन जीव नक्कीच वाचले असते…
पुणे शहरातील कल्याणीनगर परिसरात एका अल्पवयीन धनिकपुत्राने रविवारी (ता. १९) पहाटे अलिशान पोर्शे कारने युवक-युवतीला चिरडल्याची घटना घडली आणि पुणे शहरातील पब संस्कृती चर्चेत आली. Live Reporting! पुणे शहरात मध्य रात्रीस चाले तरुणाईचा झिंगाट खेळ… या शिर्षकाखाली सविस्तर असे वार्तांकन केले होते. पुणे पोलिसांनी जर वेळीच लक्ष घालून उशीरा पर्यंत चालणाऱ्या पबवर कारवाई केली असती तर नक्कीच दोन जीव वाचले असते…

पुणे शहरात विविध ठिकाणांहून नोकरी शिक्षणाच्या निमित्ताने युवक-युवती आलेले आहेत. सध्या तरुणाई मोठ्या प्रमाणात नशेच्या आहारी केल्याचे वास्तव आहे. पुणे शहरातील मध्यवर्ती भागात मध्यरात्रीच्या सुमारास तरुणाई झिंगाट झाल्याचे सर्सास पाहायला मिळतात. पुणे शहरातील कल्याणीनगर परिसरात एका अल्पवयीन धनिकपुत्राने रविवारी पहाटे अलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले आणि दोन कुटुंबाची स्वप्ने धुळीस मिळाली. अलिशान मोटारीने धडक देणारा हा धनिकपुत्र पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आणि ब्रम्हा कॉर्पचे संचालक विशाल अग्रवाल यांचा मुलगा आहे. त्याने बाईकवरुन जात असलेल्या अनिश अवधिया आणि अश्विनी कोस्टा यांना चिरडले. यावेळी पोर्शे गाडी इतक्या वेगात होती की, अश्विनी कोस्टा हवेत उंच फेकली जाऊन जमिनीवर आपटली होती. यामध्ये तिचा जागीच मृत्यू झाला होता. तर अनिस अवधिया याच्या बरगड्यांना जबर मार लागून त्याचाही मृत्यू झाला.

नियम धाब्यावर का?
– अलिशान मोटारीला नंबर नव्हता. मग ती रस्त्यावर आलीच कशी?
– अलिशान मोटारीचा वेग २०० किमी असल्याची माहिती पुढे आली आहे
– अलिशान मोटार अल्पवयीन मुलगा चालवत होता
– अल्पवयीन मुलगा होता तर त्याला पबमध्ये कसा प्रवेश देण्यात आला?
– अल्पवयीन मुलाने नशा केली होती का? याची माहिती अद्याप देण्यात आलेली नाही

धनिकपुत्राला 15 तासांमध्ये जामीन….
अपघातानंतर स्थानिकांनी विशाल अग्रवाल यांच्या मुलाला पोर्शे गाडीतून बाहेर काढले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. मात्र, त्यानंतर हा धनिकपुत्र अवघ्या 15 तासांमध्ये जामिनावर बाहेर आला. न्यायालयाने या धनिकपुत्राला 15 दिवस वाहतूक पोलिसासोबत चौकात उभे राहून काम करण्याची, वाहतुकीचे बोर्ड रंगवण्याची आणि अपघात या विषयावर 300 शब्दांचा निबंध लिहण्याचे ‘कठोर’ निर्देश दिले. या धनिकपुत्राचे मानसोपचार तज्ज्ञांकडून समुपदेशन करण्यासही सांगण्यात आले आहे.

पिझ्झा आणि बर्गर…
युवक आणि युवतीचा जीव गेल्यानंतर प्रचंड संताप व्यक्त होत असताना पोलिसांकडून विशाल अग्रवाल यांच्या मुलाला विशेष वागणूक देण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याबद्दल प्रचंड चीड व्यक्त केली जात आहे. ससून रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केल्यानंतर कारचालक मुलगा आणि त्याच्या मित्रांना दुपारी दीडच्या सुमारास येरवाडा पोलिस ठाण्यात आणण्यात आले. त्यावेळी त्याच्या कुटुंबीयांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या परवानगीने मुलांसाठी बाहेरून पिझ्झा आणि बर्गर मागवला होता. एका झिरो पोलिसाने हे खाद्यपदार्थ मागच्या बाजूने पोलिस ठाण्यात नेले, असे वृत्त महाराष्ट्र टाइम्स या दैनिकात प्रकाशित झाले आहे. धनिकपुत्रांना विशेष वागणूक आणि सर्वसामान्य नागरिकांवर कारवाईचा बडगा उगारला जातो, अशी चर्चा नागरिकांमध्ये आहे.

मृत युवतीच्या आईचा आक्रोश…
आलिशान मोटार आणि धनिकपुत्राच्या धडकेत दोन जीव गेले पण त्यांच्या कुटुंबियांची काय अवस्था झाली असेल? ससून रुग्णालयात मृत युवतीच्या आईचा आक्रोश हा हृदय पिळवटून टाकणारा होता. दोन्ही कुटुंबियांनी मुलांकडून किती स्वप्ने पाहिली असतील? एका सेंकदात स्वप्ने धुळीस मिळाली आहेत. शिक्षणावर मोठ्या प्रमाणात खर्च करून नुकतेच दोघेही कंपनीमध्ये कामाला लागले होते. मृत युवकाचे आई-वडिल तर वृद्ध आणि गरिब कुटुंबातील आहेत. पण, धनिकपुत्राच्या हौसेपोटी दोन कुटुंबे आज रस्त्यावर आली आहेत. बातम्या दोन दिवस, चार दिवस चालतील. पुढे विषय विसरला जाईल. पण, या दोन्ही कुटुंबाला आयुष्यभरासाठी दुःख असणार आहे.

पबसाठी नियमावली….
पुणे शहरातील हॉटेल आणि पब यांच्यासाठी पोलिसांनी नवी नियमावली जाहीर केली आहे. यानुसार, मध्यरात्री दीड वाजेपर्यंत व्यावसाय सुरू ठेवण्यास परवानगी असणार आहे. नियमावलीचे पालन न करता उशिरापर्यंत हॉटेल, पब सुरू ठेवणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्यात येणार आहे, असा इशारा पोलिसांनी दिला होता. पण, खरंच पबधारक नियमांचे तंतोतंत पालन करतात का? हा मुळ प्रश्न आहे. पालन करत असतील तर ही घटना एवढ्या उशिरा घडलीच नसती.
नियमावली पुढीलप्रमाणे…
– कोणत्याही प्रकारच्या हुक्क्याला पुण्यात बंदी असणार आहे.
– रूफ टॉप हॉटेलमधील साउंड सिस्टीम रात्री दहा वाजता बंद करावी लागणार आहे.
– परवाना नसलेल्या हॉटेलमध्ये दारू पिताना आढळल्यास दारू पिणाऱ्यावर आणि हॉटेल मालक अशा दोघांवर कारवाई करण्यात येणार आहे.
– पोलिसांनी गरज असेल तरच बार आणि पबच्या आतमध्ये प्रवेश करावा अन्यथा व्यवसायायात अडथळे आणू नयेत अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

सध्या तरुणाई मोठ्या प्रमाणात नशेच्या आहारी केल्याचे वास्तव आहे. पुणे शहरातील मध्यवर्ती भागात मध्यरात्रीच्या सुमारास तरुणाई झिंगाट झाल्याचे पाहायला मिळते. श्रीमंत घराण्यातील मुले ते आयटी कंपनीमध्ये नोकरी करणारे युवक-युवतींचे वास्तव्य पुणे शहरात आहे. नशेच्या आहारी गेलेल्यांचा आवडता दिवस म्हणजे शुक्रवार-शनिवारची रात्र. पबमध्ये जाऊन नशेच्या आहारी जातात. आपण शु्द्धीवर आहोत की नाही, याचे साधे भानही त्यांना नसते. यामधूनच विनयभंग, बलात्कार, मारामारी, अपघाताच्या घटना घडताना दिसत आहेत. युवतींचे तोडके कपडे, नशा केल्यामुळे भान हरपलेले. हातात सिगारेट आणि स्वतःचा तोलही न सांभाळता येणारी तरुणाई पाहायला मिळते. मोटारींमध्ये बसलेले कपल आणि त्यांचे अश्लिल चाळे पाहायला मिळतात. शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुणे शहरात सध्या ही वास्तव परिस्थिती आहे. नशेच्या आहारी गेलेल्या तरुणाईला पोलिसांचा धाक राहिलेला नाही. पोलिसांनी पकडलेच तर आर्थिक तडजोड करून सुटका करून निघून जातात, अशी माहिती नाव न सांगण्याच्या अटीवर एका पबच्या कर्मचाऱ्याने दिली.

विविध पबमध्ये तरुणाई येते. पबचे मोठ-मोठे दर आहेत. यामुळे सर्वसामान्य कुटुंबातील कोणीही दिसत नाही. तोडके कपडे घालून आलेल्या युवती आणि त्यांचा मित्र परिवार नशेत डुबून जातो. पबमध्ये जेवणाबरोबरच मद्य आणि नृत्य सुरू असते. कष्टाचा पैसा नसल्यामुळे जस-जशी रात्र होऊ लागते तसतशी यांची नशा चढू लागते. पहाटेपर्यंत यांचा खेळ चालतो. पब हे उशिरापर्यंत सुरू असतात. पोलिसांसोबत लागेबांधे असल्याशिवाय हे शक्य नाही, असे एका कर्मचाऱ्याने सांगितले.

आर्थिक देवाण-घेवाण…
पुणे शहरातील पब उशिरापर्यंत चालू राहण्याचे प्रमुख कारण म्हणजे आर्थिक देवाण-घेवाण. याशिवाय शक्य नाही. हॉटेल, मद्याची दुकाने, पब किती वाजेपर्यंत सुरू असावीत याबाबतची नियमावली आहे. पण, किती जण हे नियम पाळत आहेत, याबद्दल शंका आहे. मोठी दुर्घटना घडण्यापूर्वीच पोलिसांनी कारवाईचे धोरण आवलंबायला हवे, अथन्या वेळ निघून गेल्यावर हाती काही राहात नाही.

थोडक्यात, पुणे शहरात पब संस्कृतीमुळे अनेक युवक-युवती नशेच्या आहारी गेल्याचे वास्तव पाहायला मिळत आहे. पोलिसांनी वेळीच काळजी घ्यायला हवी, अन्यथा निष्पाप नागरिकांचे जीव किड्या-मुंग्याप्रमाणे जातील.

– संतोष धायबर, पत्रकार
santosh.dhaybar@gmail.com
20/05/2024

हिट अँड रन! पुणे शहरात दोघांचा जीव घेतल्याप्रकरणी होणार कारवाई…

पुणे शहरात दोघांचा जीव घेणाऱ्या बिल्डरच्या पोराला 15 तासांत जामीन मंजूर…

पुणे शहरात मध्यरात्री पार्टी करून जात असलेल्या युवकाने घेतला २ जणांचा जीव…

पुणे शहरात ‘रात्रीस खेळ चाले’; १० हॉटेल्सवर कारवाई; पाहा नावे…

Live Reporting! पुणे शहरात मध्य रात्रीस चाले तरुणाईचा झिंगाट खेळ…

Live Reporting! पोलिसकाकांना सलाम आणि पाठीमागचे दार उघडे…

पोलिस अधिकारी व्हायचंय?; Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक!

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!