माजी जवान चंदू चव्हाण यांच्या विरुद्ध पुन्हा गुन्हा दाखल….

पुणे : पाकिस्तानातून भारतात परतलेले आणि भारतीय लष्करातून बडतर्फ केलेले जवान चंदू चव्हाण यांच्या विरोधात भारतीय सैन्यदलाची प्रतिमा मलिन होईल, अशी विधाने करून व्हिडिओ लिंक प्रसारित केल्याबद्दल नाशिकच्या देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत नायब सुभेदार एमटेक बी व्हेईकल्स ज्युनिअर कमिशन्ड ऑफिसर सचिन गंगाधर गुंजाळ यांनी फिर्याद दिली आहे. त्यात म्हटले, की आरोपी बडतर्फ जवान चंदू बाबूलाल चव्हाण यांनी भारतीय सैन्यदलाची प्रतिमा होईल, अशी विधाने केली आहेत. सैन्यदलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांविषयी वारंवार अपशब्द वापरून आरोप केले आहेत. सेवेत असलेल्या जवानांना कर्तव्यापासून विचलित करण्याचा व वरिष्ठांविरुद्ध चिथावणी देण्याचा प्रयत्न केला आहे, तसेच वारंवार सोशल मीडियाचा वापर करून जनतेची दिशाभूल करीत आहेत. बडतर्फीनंतरही सैन्यदलासारखा गणवेश वापरून लोकांना भारतीय सेनेविषयी चुकीची माहिती देऊन सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न केला आहे, तसेच बडतर्फ जवानांना एकत्र येऊन शासनाविरुद्ध आंदोलन करण्याचे आवाहन केले आहे. या बाबींची निष्पक्ष चौकशी करून लागू कायद्यानुसार कारवाई करण्यात यावी म्हणून देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात चंदू बाबूलाल चव्हाण (रा. मोहाडी, ता. जि. धुळे) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बैसाणे करीत आहेत.

गुन्हा दाखल झाल्यानंतर चंदू चव्हाण यांनी म्हटले आहे की, ‘माझ्यावरील अन्यायाविरोधात आणि सैन्यातून निष्कासित केलेल्या जवानांच्या हक्कासाठी मी सातत्याने कायदेशीर व शांततापूर्ण मार्गाने लढा देत आहे. देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात माझ्यावर जो एफ.आय.आर. (गु.रं. क्र. 0297/2026, कलमे 353(1)(a), 168 BNS) दाखल करण्यात आला आहे, तो पूर्णपणे चुकीचा आणि माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे. मी स्पष्ट करू इच्छितो की, माझा उद्देश कोणतेही बंड किंवा विद्रोह करण्याचा नाही, तसेच मी जवानांना कर्तव्यापासून विचलित करत नाही किंवा भडकवत नाही. मी फक्त माझ्यावर झालेल्या अन्यायाविरुद्ध आणि देशासाठी प्राण पणाला लावणाऱ्या माजी व बडतर्फ जवानांच्या न्याय्य मागण्यांसाठी आवाज उठवत आहे. एफ.आय.आर.मध्ये ज्या यूट्यूब व्हिडिओचा संदर्भ देण्यात आला आहे, तो व्हिडिओ माझ्या अधिकृत चॅनलवरून अपलोड केलेला नाही, तर तो अन्य कोणीतरी दुसऱ्या चॅनलवरून पोस्ट केला आहे, ज्याच्याशी माझा कोणताही थेट संबंध नाही.’

‘देशासाठी पाकिस्तानमध्ये तीन महिने २१ दिवस यातना भोगल्या आहेत. लष्कराची ११ वर्षे सेवा केल्यानंतर मला बडतर्फ करण्यात आले. मला कुठल्याही प्रकारची पेन्शन लागू करण्यात आलेली नाही. त्यामुळे माझ्यावर कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे. घरात लहान मुलगा आहे. न्यायाची भीक मागण्यासाठी रस्त्यावरच आंदोलन सुरू केले आहे. पण, जवानांच्या विषयांकडे कोणीही लक्ष देत नाही. माझा लढा हा एकट्यासाठी नाही तर देशातील लाखो जवानांसाठी आहे. देशात जवानांचा सन्मान करण्याचे सोडून उपरे असल्यासारखी वागणूक दिली जात आहे. दुसरीकडे पाकिस्तानमधून आलेल्या सीमा हैदर हिला पायघड्या घातल्या जात आहेत. आतंकवाद्यांना मुख्य प्रवाहात घेतले जात आहे. पण, आम्ही देशासाठी लढूनही आम्हाला ना पेन्शन ना कुठे नोकरी मिळत. कारण, लष्करातून बडतर्फ केल्यामुळे खासगी कंपन्यांमध्ये नोकरी मिळत नाही. मग, अशा वेळी करायचे तरी काय? आम्ही देशासाठी लढून असा काय गुन्हा केला आहे, हेच समजत नाही. कुटुंब चालवायचे कसे? असा प्रश्न पडला आहे. जवळ पैसे नाहीत, काम करावे तर तेही मिळत नाही. सरकार कोणतीही मदत करायला तयार नाही. खूप काही प्रश्न आहेत,’ असेही चंदू चव्हाण यांनी म्हटले आहे.

दरम्यान, चंदू चव्हाण यास गेल्या जुलै महिन्यात देवळाली कॅम्प पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर नाशिक रोड सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. त्यावेळी अॅड. अपर्णा पाटील यांनी सरकारपक्षातर्फे, तर अॅड. प्रतीक ताजनपुरे यांनी बचाव पक्षातर्फे बाजू मांडली होती.

जवान चंदू चव्हाण यांच्या मागण्या पुढीलप्रमाणे…
१) जवानांना चुकीच्या पद्धतीने सेवेतून बडतर्फ करू नये. यासाठी ओडिओ, व्हिडिओ रेकॉर्डिंग व्हावी.
२ सेवेतून बडतर्फ केलेल्या जवानांना पेन्शन मिळावी, त्यांनी जोपर्यंत देशाची सेवा केली आहे त्याचा मोबदला मिळावा.
३) लष्करातून बडतर्फ केल्याने पोलिस व्हेरीफिकेशेमध्ये बडतर्फ येत असल्याने नोकरी मिळत नाही. त्यामुळे भारतीय संविधानातील आर्टिकल १६ प्रमाणे त्यांना काम करण्याचा अधिकार आहे, त्यासाठी आर्टिकल २१ प्रमाणे राज्य सरकारने बडतर्फ जवानांना आदर सन्मान देऊन शासकीय सेवेत घ्यावे.
४) बडतर्फ केलेल्या जवानानंना एक्स सर्विस मॅनचा दर्जा देण्यात यावा.
५) देशातील बडतर्फ केलेल्या जवानांची राज्य व केंद्र सरकारने आकडेवारी जाहिर करावी.

दरम्यान, पाकिस्तानमधून परत आलेले आणि भारतीय लष्करातून बडतर्फ केलेले चंदू चव्हाण यांची लष्करामध्ये ११ वर्षे नोकरी झाली आहे. चंदू चव्हाण यांची जीवन जगण्यासाठी पेन्शन सुरू करावी, ही प्रमुख मागणी आहे. लष्करातून काढल्यानंतर पेन्शन नाही, नोकरी मिळत नाही मग करायचे काय? असा सवालही चंदू चव्हाण यांनी उपस्थित केला आहे.

चंदू चव्हाण नाशिक कारागृहात; कुटुंबियांसाठी मदतीचे आवाहन…chandu-chavan-bank-qr-code

जवान चंदू चव्हाण! सीमापार छळ, लष्करी बडतर्फी, आंदोलन, कारावास आणि पुन्हा उभारीचा लढा…लष्करातील बडतर्फ जवान चंदू चव्हाणला जामीन मंजूर…

माजी जवान चंदू चव्हाण यांना पालिका कर्मचाऱ्यांकडून बेदम मारहाण…

पाकिस्तानमधून परतलेले जवान चंदू चव्हाण यांची आर्थिक फसवणूक…

Book Online Shop: जवान चंदू चव्हाण (पाकिस्तानमधील छळाचे 3 महिने 21 दिवस)

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!