
निलंबित केपीएससी अध्यक्ष शिवशंकरप्पा सावकार व सदस्य गीता यांना अटक; भरती घोटाळ्याप्रकरणी ईडीची कारवाई…
बंगळूर: अंमलबारी संचालनालयाने (ईडी) मनी लाँड्रिंग प्रकरणी कर्नाटक लोकसेवा आयोगाचे (केपीएससी) निलंबित अध्यक्ष शिवशंकरप्पा एस. सावकार आणि सदस्य बी. व्ही. गीता यांना अटक केली आहे. काही परीक्षांच्या आयोजनातील अनियमिततेशी संबंधित एका प्रकरणात चौकशीसाठी, अधिकाऱ्यांनी बुधवारी त्यांना अटक केली.
शिवशंकरप्पा सावकार आणि बी. व्ही. गीता यांना ६ ऑक्टोबर रोजी मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याच्या (पीएमएलए तरतुदींनुसार ताब्यात घेण्यात आले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. ४०० पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या भरतीसाठीच्या केपीएससी परीक्षेत झालेल्या कथित अनियमिततेच्या चौकशीसाठी राज्य पोलिसांनी दाखल केलेल्या अनेक एफआयआरशी ईडीचे हे प्रकरण संबंधित आहे.
केंद्रीय तपास यंत्रणेने या प्रकरणात यापूर्वी कर्नाटकचे माजी पीएससी परीक्षा नियंत्रक आणि आयएएस अधिकारी ज्ञानेंद्र कुमार गंगवार आणि मध्यस्थ बसवराज कन्नाले यांना अटक केली होती.
काही दलालांनी तक्रारदारासह उमेदवारांना फोन करून ४०० पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पदांसाठी प्रत्येक उमेदवाराकडे ७० ते ८० लाख रुपयांची लाच मागितली होती, असा आरोप ईडीने केला आहे.
पेपरफुटी, ओएमआर उत्तरपत्रिकांमध्ये फेरफार आणि अंतिम निवडीमध्ये केपीएससी अधिकाऱ्यांच्या नातेवाईकांना मदत केल्याच्या आरोपांसोबतच ईडीचे अधिकारी या प्रकरणाचीही चौकशी करत आहेत.

