महाराष्ट्रातील टोलनाक्यांवर ईडीचे छापे; टोल वसुली अन्यत्र वळवल्याचा संशय…

मुंबईः अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बुधवारी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या टोल नाक्यांवर बनावट टोल वसुली आणि टोल महसुलातील गैरव्यवहाराच्या मनी लाँड्रिंग प्रकरणाच्या तपासाचा भाग म्हणून, महाराष्ट्रातील विविध ठिकाणी असलेल्या टोल नाक्यांवर छापे घातले. हे छापे विविध राज्यांमधील एकूण १४ ठिकाणी घातलेल्या छाप्यांच्या मोठ्या कारवाईचा एक भाग आहे.

मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायदा, २००२ च्या कलम १७ अंतर्गत ‘ईडी’च्या लखनौ विभागीय कार्यालयाने घातलेले हे छापे उत्तर प्रदेश, राजस्थान, दिल्ली आणि कोलकाता येथील ठिकाणांवरही सुरू आहेत.

हा तपास जानेवारी २०२५ मध्ये नोंदवलेल्या एका प्रकरणावरून सुरू झाला आहे. ‘ईडी’च्या तपासात समोर आले, की मान्यताप्राप्त प्रणालीबाहेर बनावट टोल पावत्या तयार करण्यासाठी टोल-वसुली प्रणालीसोबतच अवैध सॉफ्टवेअरचा वापर होत होता.

तपास अधिकाऱ्यांना संशय आहे, की या हिशोबात नसलेल्या रोख रकमा नंतर वळवण्यात आल्या आणि वेगवेगळ्या बँक खात्यांद्वारे तसेच इतर आर्थिक माध्यमांतून पुढे पाठवण्यात आल्या. हे कथित नेटवर्क १४ राज्यांतील किमान ४२ टोल नाक्यांवर सक्रिय असल्याचा संशय आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!