
भरधाव वेगाने जाणाऱ्या दोन व्हॅनच्या धडकेत माळशेजजवळ पिता-पुत्रासह तीन जण मृत्यूमुखी…
ठाणेः ठाणे जिल्ह्यातील माळशेज घाटाजवळ महामार्गावर दोन भरधाव वाहनांच्या अपघातात वडील, मुलगा आणि आणखी एका व्यक्तीचा मृत्यू झाला, तर दोघे जण जखमी झाले आहेत, अशी माहिती पोलिसांनी येथे दिली.
रविवारी सकाळी मुरबाड तालुक्यात राष्ट्रीय महामार्ग ६१ वर हा अपघात झाला. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, खेडेले-तळवाले गावातून तीन जणांना घेऊन जाणारी एक पिकअप व्हॅन कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या पोल्ट्री व्हॅनला धडकली.
धडकेचा परिणाम इतका जोरदार होता, की दोन्ही वाहनांच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले. पिकअप व्हॅनमधल्या तिन्ही व्यक्तींचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये मारुती तुकाराम खापरे (वय ५५), त्यांचा मुलगा अजित मारुती खापरे (वय २५) आणि ४० वर्षीय चालक राम मालू सपटे यांचा समावेश आहे.
टोकावडे पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक शीतलकुमार नाईक यांनी सांगितले की, या प्रकरणाचा तपास सुरू आहे. पोलिसांनी सध्या पोल्ट्री व्हॅनच्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

