
इंडस्ट्री हादरली! प्रसिद्ध गायकाची गोळ्या झाडून निर्घृण हत्या, भररस्त्यात अंदाधुंद गोळीबार…
लखनऊः प्रसिद्ध लोकसंगीत गायक आणि कलाकार अंकित बालियान याची अज्ञात हल्लेखोरांनी अत्यंत क्रूरपणे अंदाधुंद गोळीबार करून हत्या केली.
बुधवारी संध्याकाळी उत्तर प्रदेशातील शामली शहरात मूळ हरियाणाचे निवासी आणि प्रसिद्ध गायक व कलाकार अंकित बालियान यांच्यावर हल्ला करण्यात आला. अज्ञात हल्लेखोरांनी अंदाधुंद गोळीबार करून त्याची हत्या केली. अंकित जिममधून घरी परतत असताना चार मारेकऱ्यांनी तब्बल २० गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात अंकितचा जागीच मृत्यू झाला. या भीषण हल्ल्यानंतर देशात खळबळ उडाली आहे.
यासंदर्भात अधिक माहिती देताना पोलिसांनी सांगितले, की बाबरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बंतीखेडा गावातील रहिवासी असलेला अंकित बालियान संध्याकाळी साडेचारच्या सुमारास कोतवाली परिसरातील आर्यपुरी येथील मसल्स जिममध्ये व्यायामासाठी आला होता. संध्याकाळी ६:४८ वाजता तो वर्कआउट संपवून जिमबाहेर येऊन नाल्यालगत उभ्या असलेल्या आपल्या पांढऱ्या स्कॉर्पिओ गाडीत बसणार, त्याच क्षणी दुचाकीवरून आलेल्या चार अज्ञात हल्लेखोरांनी त्याला घेरले आणि तुफान गोळीबार सुरू केला.
अंकित यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. हा हल्ला कोणी केला, त्याचे कोणाशी वैर होते की हा व्यावसायिक सूड होता, याचा पोलिस तपास करत आहेत.

