
कृष्णा आंदेकरच्या खुनाचा कट; पुणे पोलिसांच्या वाहनाचा शिवाजीनगर कोर्ट ते चाकण थरारक पाठलाग…
पुणे: ‘मकोका’अंतर्गत अटकेत असलेल्या कृष्णा आंदेकर आणि त्याच्या साथीदारांना शिवाजीनगर न्यायालयातून कारागृहात परत नेत असताना वाटेतच त्यांची निर्घृण हत्या करण्याचा कट ‘ठोंबरे टोळी’ने रचला. यासाठी त्यांनी थेट आंदेकर असलेल्या पोलिसांच्या गाडीचाच पाठलगा सुरू केला. शिवाजीनगर न्यायालयापासून ते थेट चाकणपर्यंत पोलिसांच्या गाडीचा थरारक पाठलाग केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मात्र, हा मोठा कट पुणे पोलिसांच्या सतर्कतेमुळे ऐनवेळी उधळला गेला आहे.
अक्षय म्हस्के याच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याच्या तपासासाठी ‘मकोका’चा आरोपी कृष्णा आंदेकर आणि त्याचा भाचा स्वराज वाडेकर आणि तुषार वाडेकर यांना धुळे आणि नंदुरबार कारागृहातून पुण्याच्या शिवाजीनगर न्यायालयात आणण्यात आले होते. रविवारी न्यायालयीन कामकाज संपवून पोलिस पथक या आरोपींना घेऊन पुन्हा कारागृहाच्या दिशेने निघाले होते. पोलिसांची गाडी न्यायालयातून बाहेर पडताच एका संशयास्पद दुचाकीने पोलिसांच्या वाहनाचा पाठलाग सुरू केला. पुणे शहरापासून ते थेट चाकणपर्यंत ही दुचाकी पोलिसांच्या गाडीच्या मागे धावत होती. पोलिसांना संशय येताच त्यांनी चाकणजवळ गाडी थांबवून दुचाकी अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांना पाहताच दुचाकीवरील दोन्ही शार्पशूटर दुचाकी तिथेच टाकून पसार झाले.
View this post on Instagram
दरम्यान, या थरारानंतर पुणे पोलिस आणि गुन्हे शाखेची चक्रे वेगाने फिरली. तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी वेदान्त रोहित सावंत (वय २१, रा. धनकवडी) आणि अथर्व दत्तात्रय खोपडे (वय २१, रा. कात्रज) या दोघांना कात्रज परिसरातून अत्यंत शिताफीने ताब्यात घेतले आहे. दोघेही पोलिसांच्या गाडीचे ‘लाइव्ह अपडेट्स’ म्हणजेच पोलिसांचे वाहन कुठे आहे, सोबत किती पोलिस आहेत, ताफा कोणत्या मार्गाने जात आहे, ही सगळी माहिती मोबाईलद्वारे सूरज अशोक ठोंबरे (वय २४, रा. नाना पेठ) याला देत होते. कृष्णा आंदेकरला रस्त्यातच गोळ्या घालण्याचा त्यांचा प्लॅन होता. या दोघांकडे पिस्तूल असल्याचा संशय पोलिसांना असून, सूरज ठोंबरे, मानव ढमाले आणि धीरज लखारा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुण्यातील नाना पेठेतील वर्चस्वाच्या वादातून दोन वर्षांपूर्वी माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांचा सोमनाथ गायकवाड टोळीने डोके तालमीजवळ निर्घृण खून केला होता. या खुनाचा सूड उगवण्यासाठी आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर याच्या सांगण्यावरून विरोधी गटातील आयुष कोमकर आणि गणेश काळे यांचे खून करण्यात आले. त्यानंतर दोन महिन्यांपूर्वी पुणे-सातारा रस्त्यावर अक्षय म्हस्केवर जीवघेणा हल्ला झाला. पण, आता उघडकीस आलेल्या या नवीन कटामुळे सूरज ठोंबरे आणि आंदेकर टोळीतील गँगवॉर आणखी पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
पुण्यात पुन्हा टोळीयुद्ध? वनराज आंदेकरच्या खुनातील आरोपीच्या भावावर झाडल्या गोळ्या…
पुणे पोलिसांनी बंडू आंदेकर याच्या तिन्ही पोरांची काढली धिंड…
आंदेकर X कोमकर! गणेश काळे हत्येबाबत पोलिस तपासात मोठी माहिती समोर…
पुणे पोलिसांची आंदेकर टोळीवर पाचवी मोठी कारवाई…
आंदेकर X कोमकर! कृष्णा आंदेकर पोलिसांना आला शरण…

