
पुणे पोलिसांची मोठी कारवाई; रात्रीत 159 गुन्हेगारांना अटक…
पुणे : पुणे पोलिसांनी मोठी कारवाई करत एका रात्रीत 159 गुन्हेगारांना अटक केली आहे. पुणे पोलिसांनी ऑल आऊट ऑपरेशनला सुरुवात केली आहे. यामार्फत अनेक परिसरात चौकशी आणि कारवाई केली जात आहे.
पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी शहरातील गुन्हेगारांचा बंदोबस्त करण्यासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांच्या कारवाई वाहनांची तोडफोड आणि नागरिकांमध्ये भीती निर्माण करणाऱ्या या गुन्हेगारांची यादी तयार करण्यात आली आहे. त्यांच्यावर तातडीने कारवाई सुरू करण्यात आली आहे. सोमवारी (ता. 3) मध्यरात्री राबविलेल्या कारवाईत पोलिसांनी शहरातील विविध भागातून एकूण 159 गुन्हेगारांना अटक केली. यासोबतच आयुक्त रितेश कुमार यांनी गुन्हे शाखा आणि सर्व पोलिस ठाण्यांना या गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
गुन्हे शाखा आणि पोलिस ठाण्याच्या पथकांनी बसस्थानक आणि रेल्वे स्थानकांसह 455 हॉटेल्स, लॉज, ढाबे, सार्वजनिक ठिकाणी कसून झडती घेतली. 3 जुलै रोजी रात्री 10 ते 4 जुलै रोजी पहाटे 2 वाजेपर्यंत चाललेल्या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये संशयितांची ओळख पटवणे आणि त्यांना पकडण्याचे धोरण हाती घेतले होते. त्यात अनेकांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान, 11 जणांना अटक करण्यात आली असून पोलिसांनी शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत एक पिस्तूल, दोन जिवंत काडतुसे आणि 10 अन्य शस्त्रे जप्त केली आहेत. शिवाजीनगर, भारती विद्यापीठ, खडकी, विश्रांतवाडी, चतुश्रृंगी, चंदननगर, येरवडा, विमानतळ, लोणीकंद, हडपसर, मुंढवा आणि कोंढवा पोलिस ठाण्यांनी या गुन्हेगारांविरुद्ध वॉरंट बजावले आहेत.
स्थानिक पोलिस ठाण्यांनी 28 चौक्या स्थापन केल्या आणि 3,282 संशयित वाहनचालकांची तपासणी केली. त्यापैकी 475 व्यक्तींना दंड ठोठावण्यात आला, परिणामी 1,22,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. याव्यतिरिक्त वाहतूक शाखेने 1,129 वाहनचालकांची तपासणी केली. त्यापैकी 496 वाहनचालकांना एकूण चार लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. गुन्हे शाखेने 13 गुन्हेगारांवरही कारवाई केली.