पुणे पोलिस आयुक्तांची दोघांविरोधात एमपीडीए अंतर्गत कारवाई…

पुणेः विमानतळ पोलिस ठाणे परिसरात दहशत माजविणाऱ्या दोन अट्टल गुन्हेगारांवर पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी एम.पी.डी.ए. अन्वये स्थानबध्दतेची कारवाई केली आहे.

पुणे शहरातील विमानतळ पोलिस स्टेशनचे हद्दीमध्ये गुन्हे करणारे अट्टल गुन्हेगार
१. गणेश उर्फ गणी सखाराम राखपसरे, वय-१९ वर्षे, रा.राखपसरे वस्ती, लोहगाव, पुणे
२. नितीन किसन सकट, वय-२१ वर्षे, रा. राखपसरे वस्ती, लोहगाव, पुणे हे अभिलेखावरील सराईत गुन्हेगार आहेत. त्यांनी त्यांच्या साथीदारांसह विमानतळ पोलिस स्टेशनच्या हद्दीत पिस्टल, लोखंडी रॉड, कोयता या सारख्या जीवघेण्या हत्यारांसह खुनाचा प्रयत्न, दुखापत, वाहनांची तोडफोड, दंगा, बेकायदेशीर हत्यार बाळगणे यासारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे केले आहेत.

गेल्या पाच वर्षामध्ये त्यांचेविरूध्द प्रत्येकी ०३ गुन्हे दाखल आहेत. त्यांच्या गुन्हेगारी कृत्यांमुळे सदर परिसरातील सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झालेली होती. तसेच त्यांच्यापासून जीविताचे व मालमत्तेचे नुकसान होईल या भितीमुळे नागरिक उघडपणे तक्रार करण्यास धजावत नव्हते. प्राप्त प्रस्ताव व सह कागदपत्रांची पडताळणी करुन पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी दोघां विरुध्द एम. पी. डी. ए. कायद्यान्वये अनुक्रमे नागपूर मध्यवर्ती कारागृह, नागपूर व अमरावती मध्यवर्ती कारागृह, अमरावती येथे ०१ वर्षाकरीता स्थानबध्दतेचे आदेश पारीत केले आहेत. दोघाना स्थानबध्द करण्यामध्ये विमानतळ पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विलास सोंडे, पी.सी.बी. गुन्हे शाखा, पुणे शहर यांनी कामगिरी पार पाडली.

पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी दहशत निर्माण करणाऱ्या व सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण करणाऱ्या अट्टल गुन्हेगारांवर कडक प्रतिबंधक कारवाई करण्याचे धोरण अवलंबिले आहे. पोलिस आयुक्त यांनी कार्यभार स्विकारल्यानंतर एम.पी.डी.ए. कायद्यान्वये स्थानबध्दतेच्या १७ वी कारवाई असून, यापुढेही सराईत व अट्टल गुन्हेगारांचे कृत्यांना आळा घालण्यासाठी प्रभावी प्रतिबंधक कारवाई करण्यात येणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!