
मिठी नदीतील गाळ काढण्याचा ६५ कोटी रुपयांचा घोटाळा; डिनो मोरियाची सहा तास चौकशी…
मुंबईः मिठी नदीतील गाळ काढण्याच्या सुमारे ६५ कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी, अभिनेता डिनो मोरिया याची मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेशी (ईओडब्ल्यू) संबंधित तपासासाठी सहा तास ६ तास कसून चौकशी करण्यात आली. चौकशी पूर्ण झाल्यानंतर संध्याकाळी सव्वासात वाजता त्याला घरी जाण्याची परवानगी देण्यात आली.
तपासादरम्यान सादर केलेल्या कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी, डिनो मोरियाला बोलावण्यात आल्याचे ईओडब्ल्यूच्या सूत्रांनी सांगितले. यावेळी त्याचा जबाब नोंदवण्यात आला असून, गरज भासल्यास त्याला पुन्हा समन्स बजावले जाऊ शकते. आम्हाला मोरियाने सादर केलेल्या कागदपत्रांबाबत त्याची चौकशी करायची होती. या चौकशीदरम्यान कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली आहे. आवश्यकतेनुसार त्याला पुन्हा चौकशीसाठी बोलावले जाऊ शकते, असे शाखेतील सूत्राने सांगितले. यापूर्वी गेल्या वर्षी डिनो मोरियाची या प्रकरणी दोनदा चौकशी केली होती.
आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासानुसार, कंत्राटदारांनी केतन कदम यांची पत्नी पुनिता कदम आणि डिनो मोरिया यांचा भाऊ सँटिनो मोरिया यांच्या संयुक्त मालकीच्या कंपनीत, कथितरित्या १८ लाख रुपये हस्तांतरित केले होते. तपासकर्त्यांनी डिनो मोरिया याच्या मालकीची असल्याचा आरोप असलेली सात बँक खाती आणि सँटिनो मोरिया याच्या मालकीची पाच खाती ओळखली आहेत.
यापूर्वी, ईओडब्ल्यूला असेही आढळून आले होते की, नोंदवहीनुसार, पुनिता कदम आणि संतिनो मोरिया हे यूबीओ राइड्झ प्रायव्हेट लिमिटेडमध्ये प्रत्येकी ५० टक्के भागीदारी धारण करतात.
ईओडब्ल्यूचे पोलीस सहआयुक्त राजेश प्रधान म्हणाले, चौकशीनंतर त्यांना जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. गरज आणि आवश्यकतेनुसार, कायद्यानुसार पुढील चौकशी आणि कार्यवाहीसाठी त्यांना पुन्हा बोलावले जाऊ शकते.

