
३८ वर्षांपूर्वीच्या बँकेवरील दरोडा प्रकरणी केरळच्या ७६ वर्षीय व्यक्तीला १३ वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा…
कलपेट्टा (केरळम): वायनाड येथील नल्लूरनाड सर्विस कोऑपरेटिव्ह बँकेत १९८८ मध्ये पडलेल्या दरोड्यात सहभाग असल्याबद्दल दोषी ठरलेल्या, एका ७६ वर्षीय व्यक्तीला येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने १३ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा आणि १६,००० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
न्यायाधीश एल. जयवंत यांनी मंगळवारी कोल्लम येथील रहिवासी अब्दुल समद याला या प्रकरणात शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास त्याला आणखी १० महिने तुरुंगवासाची शिक्षा भोगावी लागेल.
पोलिसांच्या दिलेल्या माहितीनुसार, ८ जानेवारी १९८८ रोजी पहाटेच्या वेळी सहा जणांच्या टोळीने बँकेत घुसून हा दरोडा घातला होता. दरोडेखोर गाडीतून आले आणि कुलूप तोडून बँकेत घुसले. त्यांनी एक तिजोरी, जवळपास एक किलो सोन्याचे दागिने आणि ५,५४४ रुपये रोख रक्कम लुटून नेली होती. फिर्यादी पक्षाच्या म्हणण्यानुसार, आवाज ऐकून बँकेत पोचलेल्या दोन व्यक्तींवर लोखंडी सळीने हल्लाही करण्यात आला होता.
आरोपींपैकी सुबैर, सुरेश बाबू, अलीकुट्टी आणि नसीर यांना १९९३ मध्ये अटक करून शिक्षा सुनावण्यात आली. आणखी एक आरोपी, ओ. के. बाबू, फरार होता, त्याने २०१७ मध्ये न्यायालयासमोर आत्मसमर्पण केले आणि त्यानंतर त्याला शिक्षा सुनावण्यात आली.
समदला ऑक्टोबर २०२४ मध्ये पोलिसांनी अटक केली. न्यायालयीन कोठडीत असताना त्याच्यावर खटला चालवण्यात आला. न्यायालयाने या प्रकरणात सुमारे ४० साक्षीदारांची तपासणी केली. अभियोजन पक्षाने पुरावा म्हणून १६६ कागदपत्रे आणि पंचनाम्याअंतर्गत जप्त केलेल्या २१ वस्तू न्यायालयासमोर सादर केल्या. प्राथमिक तपास तत्कालीन मानंथवाडी पोलिसांनी केला होता आणि नंतर तो जिल्हा सीबीसीआयडीने ताब्यात घेतला.
सरकारी वकील ई. आर. संतोष कुमार हे अभियोजन पक्षातर्फे हजर होते.

