नागपूरमध्ये पोलिसांना रस्त्यावर सापडले महत्त्वाचे पुरावे…

नागपूर: नागपूरमध्ये सोमवारी (ता. १७) दोन गटांमध्ये झालेल्या वादानंतर आज परिस्थिती नियंत्रणात असून सध्या तणावपूर्ण शांतता आहे. महाल भागात पोलिसांचा मोठा बंदोबस्त असून पोलिसांकडून रात्रभर कोम्बिंग ऑपरेशन करण्यात आले आणि 80 जणांना अटक केली आहे. हिंसाचार झालेल्या ठिकाणी पोलिसांना काही महत्त्वाचे पुरावे सापडले आहेत.

नागपूरच्या महाल भागात सोमवारी रात्री हिंसा उसळल्यानंतर वीज आणि इंटरनेट बंद करण्यात आले होते. त्यानंतर दोन गटांकडून एकमेकांवर आणि पोलिसांवर तुफान दगडफेक करण्यात आली होती. सध्या नागपूरमध्ये संचारबंदीचे कलम 144 लागू करण्यात आले असून, महाल परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त आहे. शिवाय, सोमवारी रात्रभर पोलिसांचे अटकसत्र सुरु होते. याशिवाय, सायबर पोलिसांकडून जवळपास 1800 सोशल मिडिया अकाऊंटस तपासण्यात आली आहेत. सोशल मीडियावरील आक्षेपार्ह मजकूर आणि 55 व्हिडीओ पोलिसांच्या रडारवर आहेत. नागपूरच्या महाल परिसरानंतर हंसपुरी भागातही तणाव निर्माण झाल्याची माहिती आहे. या भागात 20 ते 22 वाहनांची तोडफोड करण्यात आली. मात्र, पोलिसांनी येथील परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आणली आहे.

पोलिसांकडून जारी करण्यात आलेल्या एका पत्रकानुसार, सोमवारी नागपूरमधील गणेशपेठ आणि महाल परिसरात सकाळी शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यांच्याकडून औरंगजेबाची कबर हटवण्याच्या अनुषंगाने आंदोलन करण्यात आले. त्यावेळी औरंगजेबाचा फोटो आणि त्यामध्ये हिरव्या रंगाच्या कापडातील (गवताचा पेंडा भरुन) प्रतिकात्मक कबर जाळण्यात आली. संध्याकाळी 7.30 वाजता गणेशपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील भालदारपुरा येथे 80 ते 100 लोकांनी जमून पोलिसांवर दगडफेक केली. यावेळी वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली. एका पोलिस अधिकाऱ्यावर कुऱ्हाडीने हल्ला करण्यात आला. यामध्ये त्याचा हात जायबंदी झाली आहे.

नागपूर शहरातील झोन 3, 4 आणि 5 या भागातील 11 पोलिस ठाण्यांच्या हद्दीत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या भागांमध्ये लोकांना घराबाहेर निघू नये तसेच पाचपेक्षा जास्त लोकांनी जमू नये, असे आदेश पोलिसांकडून देण्यात आले आहेत. उर्वरित नागपूरमध्ये जनजीवन सामान्य आहे. सार्वजनिक वाहतूक सेवा सुरु असून नागरिक नेहमीप्रमाणे कामासाठी बाहेर पडत आहेत. मात्र, अद्याप नागपूर शहरातील वातावरणात तणाव कायम असल्याचे दिसत आहे.

नागपूरच्या कालच्या हिंसाचारानंतर रात्रभर पोलिसांकडून कोम्बिंग ऑपरेशन सुरु होते. सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हीडिओ पसरवणाऱ्या आणि घटनास्थळी दंगल भडकवणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तब्बल 65 संशयित दंगलखोरांना नागपूरमधील गणेशपेठ पोलिस ठाण्यात आणण्यात आले आहे. याठिकाणी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून त्यांची चौकशी केली जात आहे.

प्राथमिक माहितीनुसार, महाल परिसरातील हिंसाचारात असणारा अनेकजण उत्तर नागपूरमधील कळमना आणि इतवारी परिसरातील असल्याचे समजते. काल रात्रीपासून पोलिसांची विविध पथके आरोपींचा शोध घेत आहेत. हिंसाचार झाला त्याठिकाणी पोलिसांना काही वाहनं आणि आयकार्ड सापडली आहेत. पोलिस याठिकाणी आल्यानंतर संबंधित दंगलखोर तरुण आपल्या दुचाकी तेथेच सोडून पळून गेले. तसेच पळापळीत काही दंगलखोरांच्या खिशातील आधारकार्ड आणि ओळखपत्रं खाली पडली होती. ही ओळखपत्रं पोलिसांच्या हाती लागली आहेत. भालदारपुरा परिसरात हिंसाचाराचा जोर जास्त होता. मात्र, जमावाने आजुबाजूच्या चिटणीस पार्क, हंसापुरी परिसरातही वाहनांची जाळपोळ आणि दगडफेक केली. यामध्ये सामान्य नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. दंगलखोरांकडून वाहनांमध्ये कापडांच बोळे आणि पेट्रोल बॉम्ब टाकले जात होते. मोठा जमाव असल्याने पोलिसांना परिस्थिती नियंत्रणात आणण्यात अडचण आली, असे स्थानिक नागरिकांनी सांगितले. पोलिस पुढील तपास करत आहेत.

नागपूर शहरातील अनेक भागांमध्ये संचारबंदी; 80 जणांना अटक…

नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर ढाबा मालकाला बंदुकीच्या धाकावर लुटले…

नागपूरमध्ये ईव्हीएम घेऊन जाणाऱ्या एसयूव्ही कारवर हल्ला…

अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर पोलिसकाकाचा अपघाती मृत्यू…

नागपूर हादरलं! प्रियकर विवाहित तर प्रेयसी अनविवाहित अखेर…

नागपूरमध्ये स्वातंत्र्यदिनी पोलिस स्टेशनमध्ये डान्स करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांचे निलंबन मागे…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!