
मुलाला कार्यालयात आणण्यावरून झालेल्या वादानंतर सीआयएसएफच्या जवानाने केला गोळीबार; चार सहकारी मृत्यूमुखी
जम्मू: हिमाचल प्रदेशाच्या सीमेवरील माश्का जलविद्युत प्रकल्पामध्ये आपल्या मुलाला आणण्यावरून, सहकाऱ्यांशी झालेल्या वादाचे पर्यवसान गोळीबार करण्यामध्ये झाला. वादानंतर संतप्त झालेल्या या मुलाचे पिता आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलातील (सीआयएसएफ) हेड कॉन्स्टेबल अवधेश कुमार सिंह या जवानाने आपल्याच चार सहकाऱ्यांवर एके-४७ असॉल्ट रायफलमधून १८ फैरी झाडून त्यांची हत्या केली, अशी माहिती सीआयएसएफच्या एका अधिकाऱ्याने दिली. या जवानाची पत्नीही याच प्रकल्पात काम करते.
या गोळीबारात असिस्टंट कमांडंट अंकित कुमार पांडे, सब-इन्स्पेक्टर लक्ष्मण सिंग आणि कॉन्स्टेबल रफीक अहमद व संदीप कुमार या चार सीआयएसएफ अधिकारी आणि जवान ठार झाले आहेत, अशी माहिती या अधिकाऱ्याने दिली.
ही घटना हिमाचल प्रदेशच्या सीमेला लागून असलेल्या बसोहली जिल्ह्यातील माश्का गावातील सेवा-३ जलविद्युत प्रकल्पात घडली. सिंह आणि त्यांची पत्नी, हेड कॉन्स्टेबल पूजा देवी, या दोघांचीही नेमणूक एकाच प्रकल्पस्थळी होती आणि त्यांना वेगवेगळ्या शिफ्टमध्ये काम सोपविण्यात आले होते.
घटनेचा तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ते जोडपे वारंवार त्यांच्या लहान मुलाला कामाच्या ठिकाणी आणत असल्यामुळे त्यांच्यात वाद सुरू झाला. ते जोडपे एकाच ठिकाणी वेगवेगळ्या शिफ्टमध्ये काम करत होते. जेव्हा एक पालक कामावर हजर झाला, तेव्हा ते घरी परतणाऱ्या जोडीदाराकडे मुलाला सोपविण्यासाठी त्याला सोबत घेऊन येत असत. मुलाला प्रकल्पाच्या ठिकाणी आणू नये, असे एका अधिकाऱ्याने स्पष्ट बजावले होते.
जेव्हा सिंह कर्तव्यावर असायचा, तेव्हा देवी आपल्या मुलासोबत क्वार्टर गार्डच्या कर्तव्यावर यायच्या. युनिट प्रशासनाने तिला मुलासोबत क्वार्टर गार्ड परिसरात प्रवेश करण्यास किंवा थांबण्यास परवानगी दिलेली नव्हती. आजही, त्यांच्यापैकी एकाने मुलाला जोडीदाराकडे सुपूर्द करण्यासाठी घटनास्थळी आणले होते आणि कोणीतरी त्याबद्दल कंपनी कमांडरकडे तक्रार केली. यामुळे वाद झाला, असे या अधिकाऱ्याने पुढे सांगितले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, असिस्टंट कमांडंट अंकित कुमार पांडे यांच्याकडे केलेल्या तक्रारीमुळे अवधेश कुमार सिंह संतापला. संतापाच्या भरात, तो मुख्य प्रवेशद्वाराजवळ असलेल्या ऑपरेशन्स सेक्शनच्या कार्यालयात घुसला. तिथे चार कर्मचारी उपस्थित होते. आत येताच त्याने गोळीबार केला. गोळीबारानंतर, इतर सीआयएसएफ जवानांनी अवधेश कुमारला ताब्यात घेऊन अटक केली.
सीआयएसएफने दिलेल्या माहितीनुसार, अवधेश कुमारकडे १५० काडतुसे होती. या घटनेनंतर त्याचे सर्व्हिस वेपनही जप्त करण्यात आले आहे. जखमी झालेल्या चार जवानांना हिमाचल प्रदेशातील एनएचपीसी रुग्णालयात नेण्यात आले. दुर्दैवाने उपचार चालू असतानाच त्यांचा मृत्यू झाला.

