
दोन कोटी रुपयांचे घर आणि सोने गमावले; दिल्लीतील असा एक सायबर घोटाळा की जो केवळ डिजिटल नव्हता…
नवी दिल्ली: दिल्लीतील एका ७५ वर्षीय महिलेने एका सायबर घोटाळ्यात आपले २ कोटी रुपयांचे घर, दागिने आणि आयुष्यभराची बचत गमावली. हा घोटाळा केवळ डिजिटल स्वरूपाचा नव्हता. तपास यंत्रणेचे अधिकारी असल्याचे भासवून आणि ही महिला मनी लाँड्रिंग प्रकरणाशी संबंधित असल्याचा दावा करून, घोटाळेबाजांनी एक पाऊल पुढे टाकले आणि तिला लुटण्यासाठी थेट तिच्या घरी हजेरी लावली!
कर्करोगावर उपचार घेत असलेल्या त्या महिलेला ६ एप्रिल रोजी तिच्या लँडलाईनवर एका अनोळखी क्रमांकावरून फोन आला. फोन करणाऱ्यांनी स्वतःला सीबीआय आणि अंमलबंदी संचालनालयाचे अधिकारी भासवून, तिचा क्रमांक एका मनी लाँड्रिंग प्रकरणात वापरलेल्या दुसऱ्या नंबरशी जोडलेला असल्याचा दावा केला. त्यानंतर त्या वृद्ध महिलेसाठी प्रचंड नुकसान आणि भावनिक आघाताने भरलेले अत्यंत क्लेशदायक २२ दिवस आले.
ही घटना उघडकीस आली, तेव्हा त्या महिलेची मुलगी नेदरलँड्समध्ये राहणारी राधिका रल्हन हिने २७ एप्रिल रोजी तिच्या आईला व्हीडिओ कॉल केला आणि तिला एका अनोळखी पुरुषासोबत गाडीत पाहून धक्काच बसला. राधिकाच्या म्हणण्यानुसार, फोनवर परिस्थितीबद्दल सांगताना तिची आई खूप घाबरलेली दिसत होती. त्यानंतर राधिकाने तिला त्वरित पोलीस ठाण्यात येण्यास सांगितले.
राधिकाच्या म्हणण्यानुसार, जेव्हा फसवणूक करणाऱ्यांनी तिला मनी लाँड्रिंग प्रकरणाबद्दल सांगितले, तेव्हा तिने त्यांना सांगितले की पोलिसात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया तिला माहीत नाही आणि ती घरी एकटीच राहते. त्यानंतर फोन करणाऱ्यांनी तिला ऑनलाइन तक्रार दाखल करण्यास मदत करण्याचे आश्वासन दिल्याचे म्हटले जाते.
त्यानंतर, त्यांनी त्या महिलेच्या व्हॉट्सॲप नंबरवर व्हिडिओ कॉल केला. तक्रारीनुसार, कॉल करणारे पोलिसांच्या गणवेशात होते आणि त्यांचे चेहरे कॅमेऱ्यात स्पष्ट दिसत होते, जेणेकरून त्या महिलेला खात्री पटावी, की ती खऱ्या पोलिसांशी किंवा सरकारी अधिकाऱ्यांशी बोलत आहे. तसेच, त्या महिलेवर सतत पाळत ठेवण्यासाठी एका मोबाईल क्रमांकाचा वापर करण्यात आला, असेही त्यात म्हटले आहे.
त्यानंतर फसवणूक करणाऱ्यांनी, आपण डीसीपींकडे जाणार असल्याचे सांगून त्या महिलेला धमकावण्यास सुरुवात केली. एका व्यक्तीने आपण सीबीआय अधिकारी असल्याचा दावा केला आणि त्या महिलेला सांगितले की, तिला व तिच्या मुलांना पुढील ३० मिनिटांत अटक केली जाईल. तिच्या मुलांना अंमलबारी संचालनालयाकडून (ईडी) अटक केली जाईल आणि तिला जामीन मिळणार नाही. या प्रकरणात राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न असल्याने तिने ही माहिती कोणालाही देऊ नये, असेही तिला बजाविण्यात आले.
एका बनावट इन्स्पेक्टरने दुसऱ्या बनावट सीबीआय अधिकाऱ्याला असेही सांगितले की, ती महिला निर्दोष दिसत असून, तो तिच्याशी स्वतंत्रपणे बोलेल.
सुरुवातीला, फसवणूक करणाऱ्यांनी त्या महिलेला विचारले की तिच्याकडे किती पैसे, सोने आणि मालमत्ता आहे. गुन्हेगारांच्या सूचनेनुसार, ती महिला वसंत कुंज येथील बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये गेली आणि फोन करणाऱ्यांनी सांगितलेल्या खात्यात ३ लाख रुपये हस्तांतरित केले. ७ एप्रिल रोजी, फोन करणाऱ्यांनी तिला मुथूट फिनकॉर्पमध्ये जाऊन ८३.५ ग्रॅम सोने जमा करण्यास सांगितले. त्यात दोन बांगड्या, एक सोनसाखळी, लॉकेट असलेली एक सोन्याची साखळी आणि कानातले चार डूल यांचा समावेश होता. सोन्याच्या बदल्यात त्या महिलेने अंदाजे ४,९५,२५० रुपयांचे सुवर्ण कर्ज घेतले.
तक्रारीनुसार, फसवणूक करणाऱ्यांनी दिलेल्या खात्यात रक्कम हस्तांतरित करण्यात आली होती. तोपर्यंत ती महिला प्रचंड घाबरली होती आणि तिने फोन करणाऱ्यांना तिला एकटे सोडण्याची विनंती केली. त्यानंतर गुन्हेगारांनी तिला सांगितले की उरलेले काम तिच्या घरी केले जाईल.
फोन करणाऱ्यांनी त्या महिलेला सांगितले की, तिच्या २ कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या घरासंदर्भात एक अधिकृत प्रॉपर्टी डीलर तिच्याशी संपर्क साधेल. तिला असेही सांगण्यात आले की, मालमत्तेच्या विक्रीशी संबंधित कागदपत्रे तयार केली जातील आणि निर्देशानुसार तिला ती कागदपत्रे सादर करावी लागतील.
८ एप्रिल रोजी, दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास, त्या महिलेला व्हॉट्सॲपवर एक कॉल आला, कॉल करणाऱ्याने स्वतःची ओळख सुशांत कुमार म्हणून सांगितली. त्याने त्या स्त्रीला तिचा पत्ता विचारला. तो तिला भेटायला येईल असे त्याने सांगितले. १३ एप्रिल रोजी कुमार त्या महिलेच्या घरी आला आणि त्याने मालमत्तेची मूळ कागदपत्रे व त्यांच्या सर्व प्रती घेतल्या. कागदपत्रे स्वीकारल्याची कोणतीही पावती देण्यात आली नाही, असा आरोप आहे.
तक्रारीनुसार, १५ एप्रिल रोजी कुमार, खरेदीदार अनिल कपूर आणि साक्षीदार प्रवीण चड्ढा असल्याचे भासवणाऱ्या इतर दोघांसोबत त्या महिलेच्या घरी आला, जिथे तिच्याकडून घर विकण्याच्या आगाऊ पावती-सह-करारनाम्यावर सही करून घेण्यात आली. पीडितेला त्या दस्तऐवजाबद्दल संपूर्ण माहिती देण्यात आली नाही आणि तिच्याकडून इतर अनेक कागदपत्रांवरही सह्या करून घेण्यात आल्या.
त्या महिलेला वारंवार आश्वासन देण्यात आले की तिच्याकडून घेण्यात येत असलेले पैसे, सोने आणि मालमत्तेची कागदपत्रे नंतर परत केली जातील. १७ एप्रिल रोजी त्या महिलेच्या बँक खात्यात दोन चेक जमा झाले. एक चेक २३ लाख रुपयांचा आणि दुसरा १० लाख रुपयांचा होता. त्यानंतर, त्याच दिवशी त्या महिलेच्या खात्यातून २१ लाख रुपये काढण्यात आले. दुसऱ्या दिवशी आणखी ३ लाख रुपये काढण्यात आले.
ही रक्कम पुढे सावित्री बाई फुले एज्युकेशनल वेल्फेअर सोसायटी नावाच्या खात्यात हस्तांतरित करण्यात आली. कुमार हा अशा लोकांच्या संपर्कात होता, जे डिजिटल अटकेच्या बहाण्याने त्या महिलेला सूचना देऊन धमक्या देत होते, असा आरोप आहे.
त्या महिलेला तिचा शेवटचा कॉल २३ एप्रिल रोजी आला. यानंतर त्या महिलेला आपली फसवणूक झाल्याचा संशय आला. त्यानंतर त्या महिलेने कुमारला विचारले की, त्याला कथित अधिकाऱ्यांकडून काही फोन किंवा संदेश आले होते का. त्यालाही काही आले नसल्याने, तिने त्याला तिच्यासोबत पोलीस ठाण्यात येण्यास सांगितले.
२७ एप्रिल रोजी या प्रकरणात ई-एफआयआर नोंदवण्यात आला, जो दाखल करण्यासाठी कुमारने त्या महिलेला मदत केली. दोन दिवसांनंतर, त्या महिलेची मुलगी दिल्लीत आली आणि मूळ मालमत्तेची कागदपत्रे परत करण्याची मागणी करत कुमार यांच्या कार्यालयात गेली. तिने आरोप केला की, कागदपत्रे परत करण्याच्या बदल्यात कुमार यांनी २४ लाख रुपयांची मागणी केली.
पत्रकारांनी कुमार यांच्याशी संपर्क साधला, तेव्हा त्यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावले. त्यांच्या म्हणण्यानुसार, एका व्यक्तीने त्यांना फोन करून स्वतःची ओळख पीडितेचा मुलगा नितीन म्हणून करून दिली. त्याने सांगितले की, त्याची आई आजारी असून तिला तिची मालमत्ता विकायची आहे आणि खुद्द त्या वृद्ध महिलेनेच त्याला फोन केला होता. नंतर कळले की ती एक फसवणूक होती, असे कुमार म्हणाले.
पीडितेच्या मुलीने या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी करत दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायालयात सादर करण्यात आलेल्या दिल्ली पोलिसांच्या स्थिती अहवालात म्हटले आहे की, फसवणुकीच्या प्रकरणात कुमार यांची भूमिका आढळून आली नाही.

