
एकोणिसाव्या मजल्यावरून पडल्याने गुरुग्राममध्ये एक मजूर मृत्यूमुखी; तर दुसरा गंभीर जखमी…
गुरुग्राम: बाजघेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सेक्टर-११३ मध्ये बांधकाम सुरू असलेल्या स्मार्ट वर्ल्ड बिल्डिंगच्या १९ व्या मजल्यावरून पडून एका कामगाराचा मृत्यू झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. ही घटना शुक्रवारी संध्याकाळी घडली. अपघातानंतर संतप्त कामगारांनी बिल्डर आणि कंत्राटदारावर निष्काळजीपणाचा आरोप करत गोंधळ घातला.
पोलीस घटनास्थळी दाखल झाले, त्यांनी हस्तक्षेप करून मृतदेह ताब्यात घेतला, शवविच्छेदनासाठी पाठवला असून तपास सुरू केला आहे. मृताची ओळख दिलखुश (वय १९ रा. कटिहार) अशी पटली आहे.
गंभीर जखमी कामगाराचे नाव वासुदेव (वय २९) असून, तो बंगालमधील दक्षिण परगणा येथील रहिवासी आहे. त्याचा हात मोडला आहे. कामगारांनी सांगितले की, सेक्टर ११३ मध्ये ‘स्मार्ट वर्ल्ड’ नावाची इमारत बांधकामाधीन आहे.
दिलखुश सरळ खाली कोसळला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. मात्र, खाली पडणारी एक लोखंडी सळई वासुदेवच्या हाती लागली, ज्यामुळे त्याच्या हाताला गंभीर दुखापत झाली. घटनास्थळी उपस्थित असलेल्या इतर कामगारांनी त्याला वाचविले.
कामगारांचा आरोप आहे की, घटनास्थळी पुरेशा सुरक्षा उपाययोजना नव्हत्या, ज्यामुळे हा अपघात घडला. दरम्यान, बाजघेरा पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक सुनील कुमार यांनी या घटनेला केवळ एक अपघात म्हटले आहे. त्यांनी सांगितले की, कुटुंबाकडून अद्याप कोणतीही तक्रार प्राप्त झालेली नाही. कामगारांनी कोणतेही आरोप दाखल केलेले नाहीत.
संतप्त कामगारांनी कंत्राटदार सद्दाम याच्यावर सुरक्षा उपकरणे न पुरवल्याचा आरोप करत पाठलाग करून मारहाण केली. मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या हेड कॉन्स्टेबल विनोद यांच्यावरही त्यांनी हल्ला केला.
घटनास्थळी आलेल्या पोलिसांच्या वाहनावरही हल्ला करण्यात आला आणि त्याच्या काचा फोडण्यात आल्या. परिस्थिती बिघडत असल्याचे पाहून, बाजघेरा पोलीस मोठ्या फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली.

