वर्धा पोलिसांना सर्वोत्कृष्ट गुणात्मक अन्वेषणासाठीचे बक्षिस…

वर्धा (उमेशसिंग सुर्यवंशी): वर्धा जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक नूरुल हसन यांनी तपास पथकाला सातत्याने केलेल्या मार्गदर्शन व सुचनांचा गुन्हा उघडकीस आणण्यात मोलाचा वाटा होता. वर्धा पोलिसांना पोलिस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे सर्वोत्कृष्ट गुणात्मक अन्वेषणासाठीचे बक्षिस मिळाले आहे.

दिनांक १०-१२-२०२२ रोजी मौजा सत्याग्रही घाट, तळेगाव श्यामजीपंत, वर्धा या ठिकाणी साधारणतः ३० ते ३५ वर्ष वयोगटातील एका अनोळखी महिलेचा मृतदेह जळालेल्या व कुजलेल्या स्थितीत मिळून आला होता. त्यावरुन फिर्यादी भिमराव रमेशराव शिंगरे (वय ४६ वर्ष रा वार्ड क्र ४ आठवडी बाजार, तळेगाव शा पंत) यांनी दिलेल्या तोंडी रिपोर्टवरुन पोस्टे तळेगाव शा पंत. येथे अप क्र ६६३ / २०२२ कलम ३०२, २०१ भादवि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर मृतदेहाची ओळख पटवून आरोपीचा शोध घेण्याकरीता स्थानिक गुन्हे शाखा येथील ३, पोलिस स्टेशन तळेगाव येथील २ व आर्वी येथील १ अशी एकुण ६ पथके तयार करुन गुन्हयाचा सखोल तपास सुरु करण्यात आला होता.

पो.नि. स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा यांनी पथकासह तळेगाव येथे मुक्काम करुन सदर गुन्हयाचा अहोरात्र तपास केला होता. घटनास्थळावर मिळुन आलेले मयत महिलेचे दागिने, कपडयांचे तुकडे व चप्पल यावरुन वर्धा, नागपुर शहर,नागपुर ग्रामीण, अमरावती शहर, अमरावती ग्रामीण, यवतमाळ, वाशिम, अकोला, बुलढाणा तसेच मध्यप्रदेश राज्यातील छिंदवाडा, पांढरकवडा, मुलताई, आठनेर व बैतुल येथील अंदाजे २५०० ते ३००० मिसिंग महिलांबाबत पोलिस स्टेशन तसेच सीटीजन पोर्टलवर पाहणी करुन शोध घेण्यात आला होता. मृतदेहावर मिळालेल्या वस्तुंच्या आधारे अनेक बेनटेक्स दागिने विक्रते, कापड विक्रेते, टेलर व चप्पल विक्रेते यांच्याकडे शहानिशा करण्यात आली होती. घटनास्थळ परीसरातील गुरेढोरे चारणारे, जंगलातील लाकुडतोड करणारे इसम, वनविभागाचे कर्मचारी,हायवेवरील पेट्रोलपंप, हॉटेल्स, पंक्चर दुरुस्ती करणारे इसम यांचेकडे सखोल चौकशी करण्यात आली होती.

घटनास्थळाजवळुन जाणाऱ्या हायवेवरील २५ ते ३०ठिकाणांचे सी.सी.टी.व्ही फुटेज बारकाईने तपासण्यात आले होते. घटनास्थळी मिळुन आलेले कपडे व इतर वस्तु यावरुन विशिष्ट समाजाच्या अनेक ठिकाणच्या तांडे व बेडयांवर मतदार यादीच्या मदतीने १२०० ते १५०० महिलांची तपासणी करण्यात आली होती.आशावर्करकडील यादीवरुन साधारण २००० महिलांची चौकशी करुन शोध घेण्यात आला होता. सायबर सेलच्या मदतीने सखोल तांत्रीक तपास करण्यात आला होता. सदरचा गुन्हा अनैतीक संबंधातुन झाला असावा यावरुन त्याअनुषंगाने अनेक महिलांकडे सविस्तर चौकशी करण्यात आलेली होती. विदर्भातील उसतोड कामगार, संत्रातोड कामगार, कंपन्या, रस्ते व बांधकामावर काम करणाऱ्या महिला मजुरांबाबत अनेक ठिकाणी चौकशी करण्यात आली होती. दरम्यान दोन विवाहीत महिलांचा मिसींग तक्रारीवरुन मध्यप्रदेश व हैद्राबाद येथे शोध घेण्यात आला होता. परंतु, उपयुक्त माहिती मिळुन आली नव्हती.

सदर एकंदर तपासाबाबत पोलिस अधीक्षक, वर्धा नूरुल हसन हे दररोज रात्री व्हिडीओ कॉन्फरंसींगद्वारे तपासाची माहिती घेवून पुढील तपासाबाबत उपयुक्त सुचना देत होते. सदर गुन्हयाचा अशारीतीने सविस्तर व सखोल तपास करीत असताना नेर, जिल्हा यवतमाळ येथील गुप्त बातमीदाराकडुन अशी खात्रीशीर माहिती मिळाली की, मंगरुळ चव्हाळा, ता. नांदगाव (खंडेश्वर), जिल्हा अमरावती येथील एक महिला मागील बऱ्याच दिवसांपासुन वडाळी, अमरावती शहर येथे लग्नाकरीता गेल्यानंतर आजपावेतो मिसिंग आहे व तिचा काहीतरी घातपात झालेला असावा. सदर माहितीवरुन शोध घेत असताना पो.स्टे. फ्रेजरपुरा, अमरावती शहर येथे दिनांक ५/१२/२०२२ रोजी दाखल असलेल्या मिसिंग क्रमांक १०४/२०२२ मधील हरविलेली महिला ज्योत्सना मनिष भोसले (वय ३२) हिच्या मुंबई येथे राहात असलेल्या आई श्रीमती नशेरा चरपू पवार व भावजय श्रीमती यशोदा जोशिंग पवार यांना तळेगाव पोलिस स्टेशन येथे बोलावून घटनास्थळी मिळून आलेल्या वस्तु दाखविल्या असता त्यांनी सदरच्या वस्तु ज्योत्सना हिच्याच असल्याचे खात्रीपुर्वक सांगितले.

सदरबाबत सखोल तपास करीत असताना ज्योत्सना हिचा नवरा मनिष इंग्लीश भोसले व त्याचा मावसभाऊ प्रविण परमीट पवार यांच्या हालचाली संशयास्पद असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांचा नेर (परसोपंत), जि. यवतमाळ येथील वेगवेगळया फासेपारधी राहत असलेल्या बेडयांवर शोध घेत असताना ते दोघे मिळुन आले नाहीत. त्यांनतर गुप्त बातमिदारांच्या मदतीने त्यांचा सातेफळ, ता. नेर येथील जंगलात कसुन शोध घेवून त्यांना ताब्यात घेवून पोलिस स्टेशन तळेगाव येथे आणुन त्यांचेकडे घटनेबाबत सखोल, कसुन व सविस्तर चौकशी केली असता त्यांना सदर गुन्हयाची कबुली दिल्याने त्यांना सदर गुन्हयात रितसर अटक करण्यात आली आहे. तसेच सदर गुन्हयातील मुख्य आरोपीचा गुन्हे अभिलेख तपासला असता त्याचेवर जबरी चोरी, दरोडा, खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत व दारुबंदी अशाप्रकारचे एकुण १० गंभीर गुन्हे असल्याचे निष्पन्न झाले.

सदर गुन्हयाच्या केलेल्या उत्कृष्ठ तपासाबाबत गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचेकडे माहिती पाठविण्यात आली होती. एप्रिल २०२३ करीता संपुर्ण महाराष्ट्रातील विविध पोलिस आयुक्तालय व जिल्हयातून सर्वोत्कष्ट तपासाकरीता माहिती मागविण्यात आली होती. सदर बाबत अपर पोलिस महासंचालक, गुन्हे अन्वेषण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी नामनिर्देशन झालेल्या गुन्हयांबाबत व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे पुन्हा एकदा माहिती घेतली होती. पो.नि. संजय गायकवाड, स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा यांनी सदर तपास व गोळा केलेल्या पुराव्यांबाबत माहिती त्यांना सादर केली होती.

संपुर्ण महाराष्ट्रातून वर्धा पोलिसांना एप्रिल २०२३ करीता पोलिस महासंचालक,म.रा. मुंबई यांचे सर्वोत्कृष्ट गुणात्मक अन्वेषणासाठीचे रुपये १०,०००/- व प्रमाणपत्र असे बक्षिस जाहिर झाले आहे. विशेष पोलिस महानिरीक्षक, ना.प. नागपूर छेरिंग दोरजे व पोलिस अधीक्षक, वर्धा नूरुल हसन यांनी तपास पथकाला सातत्याने केलेल्या मार्गदर्शन व सुचनांचा सदर गुन्हा उघडकीस आणण्यात मोलाचा वाटा होता. पोलिस अधीक्षक, वर्धा नूरुल हसन यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तळेगाव पोलिस स्टेशनच्या संपुर्ण तपास पथकाचे विशेष कौतूक केलेले आहे.

समृद्धी महामार्गावर मृत्यूमुखी पडलेल्या २५ प्रवाशांना श्रद्धांजली; गुन्हा दाखल…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!