श्रीमंत घरातील मुलीच्या अपहरणाचा डाव फसला; पावतीमुळे अलगद अडकले…

छ. संभाजीनगर: काका-पुतण्याने झटपट श्रीमंत होण्यासाठी एका धनाढ्य व्यक्तीच्या ११ वर्षीय मुलीच्या अपहरणाचा कट रचला. अपहरण करून दीड कोटीची खंडणी मागण्याचा त्यांचा डाव होता. मात्र त्यांचा हा डाव फसला. ११ वर्षांच्या मुलीने दाखवलेलं प्रसंगावधान आणि नागरिकांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. यावेळी रस्त्यावर लागलेल्या ट्रॅफिकमुळे आरोपींचा प्लॅन फसला. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अवघ्या आठ तासांत अटक केली आहे.

बाळासाहेब अशोक मोरे (वय ३८, रा. विठ्ठलवाडी, ता. अंबड, जि. जालना) आणि संदीप ऊर्फ पप्पू साहेबराव पवार (वय ३५, रा. जामखेड, ता. अंबड, जि. जालना) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. अद्याप दोन आरोपी फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहे. आरोपींनी महिनाभरापूर्वी मुलीच्या अपहरणाचा कट रचला होता. त्यासाठी आरोपींनी नवीन कार देखील खरेदी केली होती. पण त्यांचा हा डाव फसला. पोलिसांनी वॉशिंग सेंटरच्या पावतीवरून आरोपींचा माग घेतला आणि दोघांना एका हॉटेलमधून जेवण करत असताना बेड्या ठोकल्या. अन्य दोघांचा शोध सुरू आहे.

संभाजीनगर शहरातील खासगी क्लासेसच्या आवारातून बुधवारी (ता. १६) सायंकाळी सातच्या सुमारास एका मुलीचे अपहरण करण्यात आले होते. क्लास संपवल्यानंतर पीडित मुलगी आपल्या घरी जात असताना तिला कारमध्ये अक्षरशः कोंबले. त्या वेळी तिने अपहरणकर्त्यांचा प्रतिकार केला. त्यांना बोचकारले, चावा घेतला. क्लासहून तिला घरी नेणाऱ्या नेहमीच्या वाहन चालकाने हा प्रकार पाहिला. त्याने अपहरणकर्त्यांच्या गाडीचा पाठलाग केला. त्या वेळी नागरिक सतर्क झाले आणि नागरिकांनी कारवर दगडफेक केली. शिवाय, त्या रस्त्यावर काहीसं ट्रॅफिक होते. त्यामुळे आरोपींनी पीडितेला रस्त्यात उतरवून घटनास्थळावरून पळ काढला.

अपहरणाचा डाव फसल्यानंतर गाडीतील चार आरोपींनी दोघांचे गट करून वेगवेगळ्या दिशेने पळ काढला. आरोपींनी घटनास्थळीच कार सोडली. पोलिसांनी कारची झडती घेतली असता पोलिसांना कारमध्ये वॉशिंग सेंटरची पावती मिळाली. त्यावर गणेश मोरे असे नाव आढळले. या पावतीच्या आधारे पोलिसांनी तपास केला असता ही कार अपहरणासाठी आरोपींनी १५ दिवसांपूर्वी खरेदी केल्याचे समोर आले. गाडीच्या आत वेगवेगळ्या नंबर प्लेट देखील पोलिसांना सापडल्या. चेसिस नंबरच्या आधारे पोलिस गाडीच्या मूळ मालकापर्यंत पोहोचले. तेव्हा ही गाडी मूळ मालकाने १५ ते २० दिवसांआधी अंबड तालुक्यातील विठ्ठलवाडी येथील काही जणांना विकल्याचे समोर आले.

या माहितीच्या आधारे पोलिसांनी तांत्रिक तपास करत आरोपींची ओळख पटवली. संबंधित आरोपी हे पीडित मुलीच्या आजोबांच्या गावचे असल्याचे निष्पन्न झाले. दोन आरोपी अंबड-पाचोड रोडवरील पिंपरखेड येथे एका हॉटेलमध्ये आरोपी जेवण करत असल्याची माहिती मिळाली. त्या ठिकाणी गुन्हे शाखेतील उपनिरीक्षक प्रवीण वाघ यांच्या पथकाने त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशीत त्यांनी अन्य २ साथीदारांची माहिती दिली असून त्यांचा शोध पोलिस घेत आहेत. दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

साखरपुडा पार पडल्यानंतर घरी निघालेल्या युवतीचे रस्त्यातच अपहरण…

बीड हादरलं! युवकाचे अपहरण करून झाडाला बांधून बेदम मारहाण अन् मृत्यू…

बीड! परळीत मुंडे गँगकडून युवकाचे अपहरण अन् बेदम मारहाण, पाहा भयानक Video…

सायबर मर्डर! पुण्यातील उद्योगपतीचं पटना एअरपोर्टवरून अपहरण अन् हत्या…

पुणे पोलिसांनी हिरे व्यापाऱ्याचे अपहरण झालेबाबतचा खोटा बनाव केला उघड…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!