
महाराष्ट्रात बेरोजगारी! MBA, MCA झालेले उच्चशिक्षित युवक पोलिस भरतीसाठी…
बीड : बीड पोलिस दलात 174 जागांसाठी तब्बल 8134 उमेदवारांनी अर्ज केले असून, या मध्ये इंजिनियर्स, एमबीए, बीएससी, बीकॉम, एमएससी, एमबीए आणि पदवीधारक आहेत. केवळ बारावी उत्तीर्ण पात्रता असलेल्या पोलिस शिपाई पदासाठी या उमेदवारांची रांग लागल्याने बेरोजगारीचे वास्तव समोर आले आहे.
बीड जिल्हा पोलिस दलातील 174 जागांसाठी यावेळी आठ हजाराहून अधिक अर्ज आले आहेत. या भरती प्रक्रियेत अर्जाची छाननी केल्यानंतर 2653 अर्जदार पदवीधर असल्याचे समोर आले आहे. यामध्ये कला शाखेचे सर्वाधिक 1428, विज्ञान शाखेचे 582 आणि वाणिज्य शाखेच्या 321 उमेदवारांचा सहभाग आहे. तर इंजीनियरिंग क्षेत्रातील 47 उमेदवार आणि औषधनिर्माण क्षेत्रातील 19 उमेदवार पोलिस भरतीच्या प्रक्रियेत आहेत.

केवळ पदवी नाही तर उच्च शिक्षणाची सर्वोच्च पदवी घेतलेले 388 पदव्युत्तर उमेदवार आहेत. 195 एम.ए, 59 एम.कॉम आणि 56 एम.एससी पूर्ण केलेल्या उमेदवारांचा समावेश आहे. कॉर्पोरेट क्षेत्रातील 19 एमबीए पदवीधर ही पोलिस दलात शिपाई म्हणून रुजू होण्यासाठी सज्ज आहेत. उच्च शिक्षण घेऊन रोजगाराच्या संधी उपलब्ध नसल्याने पोलिस भरती प्रक्रियेत नोकरी मिळवण्याचा प्रयत्न असल्याचं या उमेदवारांनी सांगितले.
दरम्यान ही पोलिस भरती प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत यांचा प्रयत्न दिसून येतो आहे. अत्याधुनिक तंत्राचा वापर या भरतीत केला जातो आहे. तसेच उत्तेजित पदार्थाचे सेवन करून मैदानात उतरणाऱ्या उमेदवाराला तंबी देण्यात आली. त्याबरोबरच पोलिस दलात नोकरी लावून देण्याचे अमिष देणाऱ्या एजंट पासून सावध राहण्याचे आवाहन पोलिस अधीक्षकांनी केले आहे. परभणी जिल्हा पोलिस दलातील केवळ 97 जागांसाठी तब्बल दहा हजार 679 अर्ज आले आहे आजपासून या भरती प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे. जवळपास महिना भर ही प्रक्रिया सुरू असणार आहे.
राज्यात पोलिस भरतीला सुरुवात; अर्जदारांची संख्या मोठी…
पुणे पोलिसांवरील ताण हलका होणार! मोठी पोलिस भरती…
पिंपरी-चिंचवड पोलिस दलात निघाली 322 पदांची भरती, अर्ज भरण्याची शेवटची तारीख…
राज्यात १५,६३१ पोलिसांची भरती; घ्या अधिक माहिती जाणून…

