महावितरणच्या कर्मचाऱ्याने 5 लाख रुपयांची लाच मागितली

पुणे : दोन लाखांची लाच घेताना रंगेहात पकडले. नव्याने बांधलेल्या इमारतींना इलेक्ट्रिक डीपी बसवून वीजपुरवठा सुरू करण्यासाठी पाच लाख रुपयांची लाच मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मागितलेल्या लाचेच्या रकमेपैकी दोन लाख रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या महावितरणच्या कार्यकारी अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. भाऊसाहेब मच्छिंद्र सावंत (वय ५१) असे आरोपी कार्यकारी अभियंत्याचे नाव आहे. याप्रकरणी एका विद्युत ठेकेदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) तक्रार केली होती. आरोपी महावितरणच्या बंड गार्डन विभागात कर्मचारी आहे.

एसीबीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हा शासनमान्य विद्युत कंत्राटदार आहे. त्याच्या ओळखीचे काही बांधकाम व्यावसायिक आहेत. या बिल्डरांनी पाच इमारती बांधल्या आहेत. तक्रारदाराने या 5 नवीन इमारतींसाठी इलेक्ट्रिक डीपी बसवणे आणि वीज सुरू करण्याचे काम हाती घेतले होते. त्यासाठी त्यांनी ५ फाईल्स तयार करून आरोपी भाऊसाहेब सावंत यांच्याकडे मंजुरीसाठी दिल्या होत्या.

तक्रारदाराने दाखल केलेल्या 5 फाईल्स प्रलंबित होत्या. त्यावर कारवाई करण्यासाठी आणि मांजरी परिसरातील नवीन इमारतींसाठी उभारलेल्या डीपीवरील वीज भारनियमन मंजूर करण्यासाठी सावंत यांनी पाच लाख रुपयांची लाच मागितली. त्यामुळे याप्रकरणी एसीबीकडे तक्रार करण्यात आली. तपासापूर्वी या तक्रारीची पडताळणी करण्यात आली. सावंत यांनी पाच लाखांची मागणी केली. या लाचेचा पहिला हप्ता म्हणून दोन लाख रुपये स्वीकारण्याची तयारी त्यांनी दर्शवली. ही लाच स्वीकारताना त्याला एसीबीच्या पथकाने रंगेहात पकडले. पुढील तपास एसीबीचे पोलीस निरीक्षक वीरनाथ माने करीत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!