
महाराष्ट्र हादरला! शनी अमावस्येच्या पूजेनंतर भोंदूबाबाकडून युवक-युवतीचा खून; श्वान अन् रुमाल…
धुळे: साक्री तालुक्यातील जैताणे येथील भोंदूबाबा योगेश ऊर्फ भय्या बापू खैरनार याच्या आश्रमात शनी अमावस्येच्या रात्री पूजाविधीसाठी गेलेल्या एका मित्र आणि मैत्रिणीची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे.
जयश्री रजनीकांत काकुस्ते (वय २५) आणि अक्षय गंगाधर सोनवणे अशी खून झालेल्या दोघा मित्र-मैत्रिणींची नावे आहेत. मृत जयश्री ही एका फायनान्स कंपनीत काम करत होती, तर अक्षय हा स्थानिक ग्रामपंचायतीमध्ये शिपाई पदावर कार्यरत होता.
साक्री तालुक्यातील निजामपूर परिसरातील रायपूर-भडगाव रस्त्यावर शनिवारी सकाळी एका महिलेचा मृतदेह आढळून आला. या महिलेचे तोंड रुमालाने बांधलेले होते आणि तिच्या मृतदेहावर एक दुचाकी टाकून देण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी तपास केला असता हा मृतदेह जयश्री काकुस्ते हिचा असल्याचे निष्पन्न झाले.
View this post on Instagram
जयश्रीचे काका संजय हिरे यांनी निजामपूर पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, जयश्री आणि अक्षय हे दोघे शनी अमावस्येच्या रात्री पूजेसाठी भोंदू बाबा योगेश खैरनार याच्या आश्रमात गेले होते. तेथे पूजाविधी झाल्यानंतर त्यांच्यात काही कारणावरून जोरदार वाद झाला. या वादाचे पर्यावसान हत्येत झाले. भोंदू बाबाने अक्षयच्या डोक्यात लोखंडी वस्तूने जबर वार करून त्याचा खून केला, तर जयश्रीचा ओढणीने गळा आवळून तिचा जीव घेतला. घटनास्थळी पोलिसांना एक केशरी रंगाचा रुमाल आढळून आला होता. हा रुमाल या तपासात अत्यंत महत्त्वाचा दुवा ठरला. पोलिस श्वान पथकाला हा रुमाल सुंघवण्यात आला असता, श्वानाने थेट भोंदूबाबा योगेश खैरनार याच्या मठाचा रस्ता दाखवला. पोलिसांनी संशयावरून तातडीने भोंदूला ताब्यात घेतले आहे. सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली, मात्र पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
दरम्यान, भोंदू बाबाने अटक टाळण्यासाठी पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. “जयश्रीचा खून दुसराच एक जण करत होता, मी तिला वाचवायला गेलो आणि त्या झटापटीत माझ्या हातून त्या तरुणाचा खून झाला,” असा बनाव त्याने रचला. मात्र, पोलिसी चौकशीत हा बनाव टिकला नाही. त्याने अक्षयचा मृतदेह आश्रमाजवळ उभांरडी येथील वनक्षेत्रात पुरल्याचे कबूल केले. मृतदेह वाहून नेण्यासाठी त्याने बैलगाडीचा वापर केला होता, ज्याच्या चाकांचे निशाण जमिनीवर आढळून आले आहेत. पोलिसांनी अक्षयचा मृतदेह ताब्यात घेतला आहे.
निजामपूरचे पोलिस अधिकारी मयुर भामरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, “हे दोघे मृत नेमके कोणत्या पूजेसाठी भोंदू बाबाकडे आले होते, याचा सखोल तपास केला जात आहे. प्राथमिक तपासानुसार हा नरबळीचा प्रकार असल्याचे दिसून येत नाही. या गुन्ह्यात भोंदू बाबाला आणखी कोणी मदत केली आहे का? या दिशेने सध्या तपास सुरू आहे.” पोलिसांनी आरोपी भोंदू बाबाला बेड्या ठोकल्या असून पुढील तपास सुरू आहे.
मोठी बातमी! अशोक खरातप्रकरणात मोठी कारवाई; नामकर्ण आवारेला अटक…
भोंदू राजेंद्र गडगे याच्याकडे निघाले 200 व्हिडीओ अन् 90 गोळ्या…
पुणे जिल्ह्यात भोंदूबाबाने महिलेवर केला अत्याचार; पोलिसांनी ठोकल्या बेड्या…
महाराष्ट्रील आणखी एका भोंदूबाबाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या…
महाराष्ट्रात आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड; महिलेवर अत्याचार…

