गौतमी पाटील हिच्या वडिलांचे उपचारादरम्यान निधन…
पुणे : नृत्यांगणा गौतमी पाटील हिच्या वडिलांचे उपचारादरम्यान आज (सोमवार) निधन झाले. रवींद्र बाबुराव पाटील असे गौतमी पाटील हिच्या वडिलांचे नाव आहे.
गौतमी पाटील हिचे वडील रवींद्र पाटील हे धुळ्यात बेवारस स्थितीत आढळले होते. काही सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांना उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले होते. त्यानंतर गौतमी पाटील हिने वडिलांची जबाबदारी घेत त्यांना उपचारासाठी पुण्यात दाखल केले होते. पण, उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. गौतमीच्या वडिलांच्या दोन्ही किडन्या आणि लिव्हर निकामी झाले असल्याचे समोर आले आहे. जेव्हा ते बेवारस सापडले तेव्हा दोन दिवसांपासून त्यांच्या पोटात अन्न नव्हते. त्यांच्यावर उपचार सुरू होते. बरं झाल्या नंतर गौतमी ही वडिलांना व्यसनमुक्ती केंद्रात ठेवणार होती, अशी माहिती समोर आली आहे.
दरम्यान, गौतमी पाटील म्हणाली होती की, ‘माझे वडील धुळ्यात एका रुग्णालयात दाखल असल्याची बातमी पाहिली त्यानंतर मी माझ्या मावशीला या संदर्भात सांगितले की वडिलांची तब्येत आता कशी आहे व त्यांना पुढील उपचारासाठी पुण्याला घेऊन ये. वडिलांनी जरी आयुष्यभर आमच्यासाठी काहीही केले नसले तरी मात्र माणुसकीच्या नात्याने माझ्याकडून जेवढे शक्य होईल तेवढे मी नक्कीच करेल. पुढील उपचार त्यांचे मी पुण्यालाच करेल. धुळ्याच्या माजी महापौर जयश्रीताई अहिरराव यांनी मदतीचा हात दिल्याने त्यांचे आभार मानले आहेत.’
एका मुलाखतीमध्ये गौतमीने आपल्या वडिलांबाबत सांगितले आहे की, ‘तिच्या वडिलांनी आपल्याला चांगली नोकरी, घर असल्याचं सांगून तिच्या आईसोबत लग्न केले होते. मात्र लग्नाच्या पहिल्याच दिवशी ते घरी दारु पिऊन आले होते. त्यांनंतर सतत त्यांचे दारु पिऊन येणे, मारहाण करणं सुरु झाले होते. गौतमीची आई गरोदर असतानाही विचारपूस करत नव्हते. सततच्या मारहाणीला कंटाळून गौतमीच्या आजोबांनी तिच्या आईला माहेरी परत घेऊन आले होते.’
‘माहेरीच गौतमीच्या आईचे बाळांतपण झाले. आजोबांनीच गौतमी आणि तिच्या आईचा सांभाळ केला. त्यामुळे गौतमीने कधीही आपल्या वडिलांचे तोंडदेखील पाहिले नव्हते. परंतु, आपल्या बहिणीचा संसार पुन्हा रुळावर यावा यासाठी गौतमीच्या मामांनी प्रयत्न केले. आणि त्यांनी तिच्या वडिलांना बोलावून घेतले. त्यावेळी गौतमी आठवीत होती. गौतमी पाटीलने पहिल्यांदा आठवीत असताना आपल्या वडिलांना पाहिले होते. पहिल्यांदाच पाहिल्याने तिला हेच आपले वडील असल्याचे समजले नाही. परंतु, मामा आणि आजोबांनी हे तुझे बाबा असल्याचं सांगत ओळख करुन दिली होती. हा प्रसंग मुलाखतीत सांगताना गौतमी भावुक झाली होती.’
गौतमीने पुढे सांगितले की, ‘माझे बाबा आमच्यासोबत राहायला तयार झाले. पण, सोबत राहात असताना पुन्हा त्यांनी शिवीगाळ करणे, मारहाण करणे सुरु केले होते. त्यांचं घराकडे अजिबात लक्ष नव्हते. त्यांच्या या वाईट वागणुकीला कंटाळून घर मालकानेसुद्धा खोली सोडायला करायला सांगितली. अशाप्रकारे फक्त वर्षभरच वडील आमच्यासोबत राहिले. याकाळात आपण आणि आई छोटेमोठे काम करुन पन्नास रुपये मिळवत असे. पुढे आईचा अपघात झाला आणि ते पैसे पुरेनासे झाले. त्यामुळे गौतमीने हा मार्ग धरला.’
गौतमी पाटील हिने घेतली वडिलांची दखल; नात्याबाबत सांगितले की…
… तर मी कार्यक्रम करणं खरंच बंद करेन : गौतमी पाटील
गौतमी पाटील म्हणाली, माझ्या आडनावावर कार्यक्रमावर आक्षेप असेल तर…