Video: पुणे शहरात कोयता गॅंगने काढले पुन्हा डोके वर…

पुणेः पुणे शहरात कोयता गॅंगने पुन्हा डोके वर काढले आहे. येरवडा परिसरामध्ये काही युवकांनी कोयता व शस्त्र हातात घेऊन नागरिकांमध्ये दहशत पसरवण्याचे काम केले होते. संबंधित घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. येरवडा पोलिसांनी तत्काळ त्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत.

येरवडा परिसरातील गांधीनगर येथे रविवारी (ता. ४) सायंकाळी काही युवकांनी कोयता व शस्त्र हातात घेऊन नागरिकांमध्ये दहशत पसरवण्याचे काम केले. किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून पाच जणांच्या टोळक्याने पाठलाग करत कोयता व काठीने जखमी केल्याची घटना रविवारी संध्याकाळी घडली आहे. या प्रकरणी पाच आरोपींना येरवडा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. घटनास्थळी तात्काळ सहाय्यक पोलिस आयुक्त किशोर जाधव, वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळकृष्ण कदम, गुन्हे निरीक्षक जयदीप गायकवाड यांनी भेट देऊन तपासाच्या सूचना दिल्या.अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक अंकुश डोंबाळे करीत आहेत.

येरवडा परिसरामध्ये गेल्या काही दिवसांपासून कोयता व इतर शस्त्र बाळगून दहशत निर्माण करणे व परिसरामध्ये आपले वर्चस्व ठेवण्याकरिता काही टोळी आपले डोके वर काढण्याचा प्रयत्न करू लागले. स्थानिक नागरिक यामुळे त्रस्त झाले आहेत. आम्हाला गुन्हेगारांपासून संरक्षण द्यावे अन्यथा आम्हाला घर सोडून जाण्याशिवाय पर्याय नाही. दिवसाढवळे चौकात बसून ठवळकी करणे, दारू पिणे, शिवीगाळ करणे या सर्व गोष्टींचा नागरिकांना हाकणाक त्रास होत असल्याच्या तक्रारी स्थानिकांनी केल्या आहेत. शिवाय, परिसरामध्ये बहुंताश बाल गुन्हेगार असल्यामुळे पोलिसांचे कायद्यात हात बांधल्यासारखे झाले आहेत. याबाबतचा विचार वरिष्ठांनी करावी, अशीही मागणी नागरिक करत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!