पुणे शहरातून चोरलेल्या थार मोटार चोरांना पाठलाग करून पकडले…
पुणे: पुणे शहरातून दोन चोरट्यांनी महिंद्रा कंपनीची महागडी थार गाडीच लांबवल्यानंतर कारमालने विमाननगर पोलिस ठाणे गाठून घटनेची माहिती दिली. पोलिसांनीही घटनेचं गांभीर्य ओळखत तसासाची चक्रे वेगाने फिरवत काही तासात आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. गुजरातला पळून जात असताना पालघर जिल्ह्यातील डहाणू येथे त्यांना अटक करण्यात आली.
पोलिसांनी दोन चोरट्यांना पाठलाग करून जेरबंद करण्यात तलासरी पोलिसांना यश आल आहे. पुणे येथील वैजनाथ खरमाटे यांची थार ही काळ्या रंगाची कार घेऊन दोन चोरटे पुण्याहून प्रसार झाले होते. यानंतर पुण्यातील विमाननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कार घेऊन चोरटे मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरून मुंबईकडून गुजरातमधील सुरतच्या दिशेने जात असल्याची माहिती फिर्यादीकडून पोलिसांना देण्यात आली होती. तलासरी पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार तलासरी पोलिसांनी गुजरातकडे जाणाऱ्या सर्व पोलिस चौक्यांवर नाकाबंदी सुरू केली.
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील डहाणूतील दापचारी येथील सीमा शुल्क विभागाच्या तपासणी नाक्यावरून ही कार भरधाव वेगात घेऊन दोन चोरटे गुजरातच्या दिशेने पसार झाले. यानंतर या कारचा पाठलाग करून तलासरी पोलिसांनी या दोन्ही चोरट्यांसह कार ताब्यात घेतली आहे. या प्रकरणात मिलन विजयभाई जेठवाल (वय 23) आणि शैलेश भिकुभाई हिंगु (वय 32) या दोघांना अटक करण्यात आली आहे. दोघेही सुरत येथील राहणारे असल्याची माहिती तलासरी पोलिसांनी दिली आहे.
विमाननगर पुणे शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, तलासरी पोलिस पुढील कायदेशीर कारवाई करत असल्याची माहिती तलासरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विजय मुतडक यांनी दिली. पोलिस पुढील तपास करत आहेत.